Croatia Indian Embassy : युरोपमधील क्रोएशिया देशातील भारतीय दूतावासात खलिस्तानींकडून तोडफोड

  • तिरंगा काढून खलिस्तानी ध्वज फडकावला

  • आतंकवादी पन्नू याची प्रजासत्ताक दिनी देहलीत घातपात करण्याची धमकी

  • भारताची नेहमीप्रमाणे मुळमुळीत प्रतिक्रिया

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

जाग्रेब (क्रोएशिया) – युरोपमधील क्रोएशिया देशाची राजधानी जाग्रेब येथे खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घातलेल्या खलिस्तानी फुटीरतावादी संघटनेने भारतीय दूतावासात तोडफोड केली. भारताचा राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानी झेंडा फडकावून प्रजासत्ताक दिनी भारतावर आक्रमण करण्याची धमकी त्याने दिली. या वेळी खलिस्तान समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, हा विषय भारत आणि क्रोएशिया, दोन्ही ठिकाणी क्रोएशियाच्या अधिकार्‍यांसमोर कठोरपणे मांडण्यात आला आहे. या निंदनीय कृत्यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने चेतावणी दिली आहे की, अशा घटनेने ‘आतंकवादी गट किती धोकादायक असू शकतात ?’, हे स्पष्ट होते. या कृत्यांमुळे दोषींचे खरे रूप आणि त्यांचे वाईट हेतू दिसून येतात. त्यामुळे जगभरातील पोलिसांनी सावध रहाण्याची आवश्यकता आहे. क्रोएशिया सरकार दूतावासाची सुरक्षा वाढवेल अशी अपेक्षा आहे, जेणेकरून अशी घटना पुन्हा घडू नये.

या आक्रमणाचे दायित्व स्वीकारत ‘सिख फॉर जस्टिस’चा नेता गुरपतवंत सिंह पन्नूने व्हिडिओ प्रसारित  केला. तो भारतातील पसार आतंकवादी आहे.

ही घटना २१ जानेवारी २०२६ या दिवशी रात्री उशिरा घडली. क्रोएशियातील भारतीय दूतावासामध्ये अशी ही पहिलीच घटना आहे. दूतावासाच्या कुंपणाच्या भिंतीवर ‘खलिस्तान झिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद’ अशी घोषणा लिहिण्यात आली. दूतावासाच्या फलकावरही ‘खलिस्तान झिंदाबाद’ असे लिहिले होते.

पन्नूची उघड धमकी

आतंकवादी पन्नूने २६ जानेवारी या दिवशी देहलीला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. त्याने देहलीतील ‘इंडिया गेट’वर ‘स्नायपर’चे (लांब अंतरावरून बंदुकीद्वारे अचूक नेम साधणारी विशेष प्रशिक्षित शस्त्रधारी व्यक्ती) चिन्ह असलेले चित्रही दाखवले. पन्नूने वर्ष १९८४ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात भारतीय सैन्याने केलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा उल्लेख केला. व्हिडिओमध्ये पन्नू याने म्हटले की, पंजाबला भारतीय नियंत्रणातून मुक्त केल्यानंतर भारतीय दूतावासाचा वापर ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ खलिस्तान’ म्हणून केला जाईल.

युरोपातील खलिस्तान समर्थकांचा वाढता प्रभाव

ही तोडफोड दर्शवते की, ‘सिख फॉर जस्टिस’ आणि खलिस्तानी घटक अधिक देशांमध्ये त्यांची उपस्थिती वाढवत आहेत; कारण यापूर्वी क्रोएशियामध्ये खलिस्तान समर्थकांच्या उपस्थितीची कोणतीही नोंद नव्हती. भारत युरोपसमवेत संबंध भक्कम करत असतांना ही घटना घडली आहे. युरोपीयन युनियनसमवेत लवकरच ऐतिहासिक व्यापार करार होणार असून सुरक्षा आणि संरक्षण भागीदारीही होणार आहे. क्रोएशिया हा युरोपीयन युनियन आणि ‘नाटो’ (‘नाटो’ म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना) यांचा सदस्य आहे.

संपादकीय भूमिका

खलिस्तान्यांचा विदेशातील वाढता उपद्रव रोखण्यासाठी भारताने मुळमुळीत भूमिकेत न रहाता कठोर होऊन खलिस्तान्यांवर कारवाई करण्यासाठी दबाव आणणे आवश्यक आहे !