EU–India Summit 2026 : युरोपीयन युनियनची भारतासमवेच्या संरक्षण कराराला संमती

काजा कल्लास

नवी देहली – युरोपीयन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कल्लास यांनी युरोपीयन संसदेत सांगितले की, भारतासमवेतच्या नवीन संरक्षण कराराला (सुरक्षा आणि संरक्षण करार) संमती देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात नवी देहलीत होणार्‍या भारत-युरोपीयन युनियन यांच्या शिखर परिषदेत यावर स्वाक्षर्‍या होतील. ही भागीदारी एका मोठ्या धोरणात्मक कार्यसूचीचा भाग असेल. यात मुक्त व्यापार करार, संरक्षण आणि सुरक्षा करार, सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि आतंकवादविरोधी उपाययोजना यांचा समावेश आहे.

‘युरोपीयन कौन्सिल’चे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि ‘युरोपीयन कमिशन’च्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन भारतात येत आहेत. ते २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे असणार आहेत. शिखर परिषद दुसर्‍या दिवशी २७ जानेवारीला  होणार आहे. भारतात येणार्‍या युरोपीयन युनियनच्या शिष्टमंडळात अनुमाने ९० सदस्य असतील.