श्री गणेशाची विविध आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे महत्त्व !

सुश्री मधुरा भोसले यांनी रेखाटलेले रिद्धिसिद्धिसहित श्री गणेशाचे चित्र

१. श्री गणेशाचे उपरूप असणार्‍या विनायकांचे प्रकार

‘श्री गणेशाच्या गणांना ‘विनायक’ म्हणतात. श्री गणेश हा विनायकांचा स्वामी आणि अधिपती असल्यामुळे त्याला ‘श्री विनायक’ हे नाव प्राप्त झाले आहे. श्री विनायक हे श्री गणेशाचे एक रूप असून त्याची पुढील उपरूपे आहेत.

१ अ. वरदविनायक : श्री विनायकाचे हे रूप त्याच्या भक्तांवर प्रसन्न झाल्यावर त्यांना विविध प्रकारचे वरदान देणारे आहे.

१ आ. सिद्धिविनायक : श्री विनायकाचे हे रूप दशमहासिद्धींनी युक्त आहे. त्यामुळे श्री सिद्धिविनायकाची उपासना करणार्‍या परम भक्ताला दशमहासिद्धींची प्राप्ती होते.

१ इ. सत्यविनायक : हे श्री गणेशाच्या ज्ञानदायीरूपाचे नाव आहे. याच्या उपासनेने त्याच्या परम भक्ताला विश्वातील गूढ रहस्य, दुर्लभ सिद्धी, दैवी कला आणि अलौकिक विद्या यांची प्राप्ती होते.

१ ई. श्री रिद्धिसिद्धिविनायक : श्री विनायकाचे हे रूप त्याच्या ‘रिद्धि’ आणि ‘सिद्धि’ या दोन शक्तींसहित असते. त्यामुळे त्याला ‘श्री रिद्धिसिद्धिविनायक’ हे नाव प्राप्त झाले आहे. श्री रिद्धिसिद्धिविनायकाची उपासना करणार्‍या भक्तांना श्री गणेशासह रिद्धिदेवी आणि सिद्धिदेवी यांची कृपा प्राप्त होते.

१ ई १. रिद्धिदेवी आणि सिद्धिदेवी यांच्यातील आध्यात्मिक भेद    

टीप – जेव्हा श्री गणेशाने सिंधुरासुर, गणासुर, देवान्तक आणि नरान्तक यांसारख्या बलाढ्य असुरांशी युद्ध केले, तेव्हा त्याला सिद्धिदेवीने पुष्कळ साहाय्य केले.

२. अष्टविनायकांच्या उपासनेमुळे त्यांच्या भक्तांना होणारे विविध प्रकारचे लाभ !

पुराणात श्री गणेशाने घेतलेल्या श्री विनायकाच्या ८ रूपांचे वर्णन केले आहे. भारतातील महाराष्ट्र राज्यात हे ८ विनायक ‘अष्टविनायक’ या नावाने संबोधले गेले आहेत. त्यांच्या उपासनेमुळे त्यांच्या उपासकांना होणारे विविध प्रकारचे लाभ पुढीलप्रमाणे आहेत.

३. श्री गणेशाची उपासना केल्यावर त्याचे तत्त्व कार्यरत होऊन भक्तांच्या

विविध देहांची शुद्धी झाल्यामुळे गणेशभक्तांना होणारे विविध प्रकारचे लाभ !

४. विविध साधनामार्गांनुसार केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेमुळे विविध प्रकारच्या उपासकांना होणारे लाभ !

४ अ. शक्तीपातयोग : श्री गणेशाच्या उपासनेमुळे उपासकाच्या देहातील कुंडलिनीचक्रांपैकी सर्वांत प्रथम असणार्‍या मूलाधारचक्राचे भेदन होऊन कुंडलिनीशक्ती जागृत होते.

४ आ. ध्यानयोग : श्री गणेशाच्या निर्गुण आणि निराकार, म्हणजे ‘ओंकार’ स्वरूपाचे ध्यान केल्यास उपासकाला प्रथम काही क्षणांसाठी धारणा, त्यानंतर काही घंट्यांसाठी ध्यान आणि काही आठवड्यांसाठी समाधी अवस्था प्राप्त होते.

४ इ. कर्मयोग : कोणत्याही शुभ कर्माच्या पूर्वी श्री गणेशाचे पूजन, स्मरण आणि ध्यान केल्यामुळे उपासकाला चांगले कर्म करण्यासाठी प्रेरणा मिळते, तसेच त्याची बुद्धी सात्त्विक होते अन् कर्मातील विघ्ने विघ्नहर्ता श्री गणेश दूर करतो.

४ ई. ज्ञानयोग : श्री गणेशगीतेचे पारायण करून त्यानुसार आचरण केल्यास परम ज्ञानाची प्राप्ती होते.

४ उ. भक्तीयोगानुसार केलेली उपासना   

४ उ १. भक्तीयोगांतर्गत कर्मकांडानुसार श्री गणेशाची उपासना करणे : श्री गणेशाच्या सात्त्विक मूर्तीची पंचोपचारे किंवा षोडशोपचारे (१६ पद्धतींनी) पूजन केल्याने, तसेच श्री गणेश अथर्वशीर्ष इत्यादी स्तोत्रे म्हटल्याने किंवा वैदिक किंवा पौराणिक पद्धतीने श्री गणेशहोम केल्याने श्री गणेशाची कृपा प्राप्त होऊन धर्माधिष्ठित सकाम कामना पूर्ण होतात.

४ उ २. भक्तीयोगांतर्गत उपासना कांडानुसार श्री गणेशाची उपासना करणे : श्री गणेशाची भक्तीयोगांतर्गत उपासना कांडानुसार भावपूर्णरित्या मानसपूजा केल्यास श्री गणेशाप्रतीचा भाव जागृत होण्यास साहाय्य होते.

४ ऊ. नामसंकीर्तन योगानुसार गणपतीचे विविध प्रकारचे नामजप करणे : प्राथमिक अवस्थेतील साधकाने ‘श्री गणेशाय नमः ।’ हा नामजप केल्यास त्याला श्री गणेशाची शक्ती प्राप्त होते. साधनेतील पुढच्या अवस्थेतील साधकाने ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हा नामजप भावपूर्णरित्या केल्यास त्याला श्री गणेशाच्या शक्तीसह चैतन्याचीही प्राप्ती होते.

४ ए. मंत्रयोगानुसार श्री गणेशाची उपासना करणे : मंत्रयोगानुसार श्री गणेशाच्या ‘गँ’ या बीजमंत्राचा जप केल्यास उपासकाला श्री गणेशाची तारक किंवा मारक शक्ती आवश्यकतेनुसार प्राप्त होते.

४ ऐ. गुरुकृपायोगानुसार श्री गणेशाची उपासना करणे : व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील त्रास दूर होण्यासाठी श्री गणेशाचा नामजप आणि श्री गणेशयाग करणे अत्यंत फलदायी असते. त्याचप्रमाणे उपासकाची प्राणशक्ती वाढण्यासाठी त्याने, तसेच लहान मुलांनी अभ्यास करण्यापूर्वी श्री गणेशाचा नामजप केल्यास त्यांना विशेष लाभ होतो.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

५. श्री गणेशाच्या चरणी कृतज्ञता

‘हे अष्टविनायका, हे गणराया, शब्द थिटे पडतात वर्णन करण्या तुझा महिमा ! हे श्री गणेशा, तुझ्या कृपेनेच तुझ्या विविध रूपांचे माहात्म्य आम्हाला उमजले. ‘तुझ्या ठायी आमची भक्ती अशीच वृद्धींगत होवो आणि तुझी अपार कृपा आम्हा साधकांना प्राप्त होवो’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

६. श्री गणेशाच्या चरणी वाहते ही काव्य सुमनांजली !

अंतःकरणातून करते प्रार्थना,

गणराया, तुम्ही द्यावे दर्शना ।
श्री मंगलमूर्ती तू गणेश गजानना ।
उद्धारिसी तू सर्व भक्तजना ।।

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०२६)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक