‘तमिळगा वेट्री कळघम्’चे जोसेफ विजय यांचा हा क्षण : एका अभिनेत्याच्या विजयापलीकडचे काहीतरी !

(टीप : तमिळगा वेट्री कळघम्, म्हणजे तमिळनाडू विजय पक्ष)

भारतीय राजकीय इतिहास दाखवतो की, प्रसिद्धीचे वलय दार उघडते; पण त्यातून कोण आत जाईल, हे रचना, विचारधारा आणि स्पष्टता ठरवतात.

भारतीय राजकारणाचे सिनेमाशी नेहमीच एक विलक्षण नाते राहिले आहे. पडद्यावरील पौराणिक देवतांपासून खर्‍या आयुष्यातील तारणहार नेत्यांपर्यंत पडद्यावरून वास्तवात आलेल्या या स्थित्यंतराने अनेकदा नाट्यमय परिणाम घडवले आहेत; पण क्वचितच टिकाऊ राजकीय यश मिळवले आहे. ही सूची मोठी आहे. वैयक्तिक आकर्षणाच्या वलयामुळे अनेक अभिनेत्यांना राजकारणात प्रवेश मिळाला आहे; पण त्यापैकी केवळ काही मोजक्याच जणांनी या प्रसिद्धीच्या वलयाचे रूपांतर दीर्घकाळ टिकणार्‍या राजकीय सत्तेत केले आहे.

चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचा नेहमीच जवळचा संबंध राहिला आहे. यात २ नावे प्रकर्षाने समोर येतात. एम्.जी. रामचंद्रन (एम्.जी.आर्.) यांनी तमिळनाडूत कल्याणकारी योजनांवर आधारित राजकीय चळवळ उभी केली, ज्याने राज्याचे राजकारणच पालटले. एन्.टी. रामाराव (एन्.टी.आर्.) हे यातील सर्वांत उल्लेखनीय उदाहरण ! त्यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर लगेचच आंध्रप्रदेशामध्ये सत्तेची सूत्रे हाती घेतली. तेलुगु स्वाभिमान अन् सत्तेविरोधातील असंतोष या लाटेवर स्वार होऊन त्यांनी हे यश मिळवले; पण त्यांच्यानंतर आतापर्यंतचा इतिहास निराशाजनक आहे. अभिनेते चिरंजीवी जनसमर्थनाचे सत्तेत रूपांतर करण्यात अयशस्वी ठरले. अभिनेते कमल हासन निवडणुकीच्या दृष्टीने अजूनही अप्रचलित आहेत. अभिनेते पवन कल्याण यांना यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.

जोसेफ विजय थलपती

१. द्रविड राजकारणातील खोल निराशेमुळे जोसेफ विजय थलपती यांचा उदय

जेव्हा आपण जोसेफ विजयच्या उदयाचे परीक्षण करतो, तेव्हा हा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यांचा उदय हा राजकारणातील केवळ एक प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वाविषयीचा प्रयोग नाही. तो राजकारण आणि व्यवस्था यांच्याविषयीच्या सर्वसामान्यांच्या खोल निराशेचे अन् पालटत्या मागणीचे प्रतिबिंब आहे. हा राजकीय स्थित्यंतराचा संदर्भ समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ सत्ताविरोधी लाटच नाही, तर गेल्या अनेक दशकांपासून तमिळनाडूच्या राजकीय-वैचारिक चौकटीवर अधिराज्य गाजवणार्‍या द्रविडी राजकारणाविषयीच लोकांमध्ये आता एक खोल वैचारिक निराशा आणि चीड निर्माण झाली आहे.

एक गोष्ट स्पष्ट होते की, विजय यांची ही घटना केवळ एका चित्रपट अभिनेत्याच्या राजकारणातील प्रवेशापुरती मर्यादित नाही किंवा ही केवळ एका नव्या पक्षाने जुन्या पक्षाला आव्हान देण्यापुरतीही नाही. ही घटना म्हणजे खुद्द द्रविड राजकारणाचाच आलेला कंटाळा आहे. हा कंटाळा, पुनरावृत्ती, स्थिरता आणि राजकीय कल्पनाशक्तीच्या संकुचिततेतून जन्मलेला आहे. इथेच विजय यांचा प्रवेश होतो; पण इथेच खरा प्रश्न आहे की, विजय या निराशेवर मात करतील कि त्यातच गुरफटून जातील ?

२. राजकारणाच्या इतिहासातून मिळालेली चेतावणी

शंतनू गुप्ता

ममता बॅनर्जी यांनी विकास होण्याविषयीचे आश्वासन देऊन बंगालमधील साम्यवाद्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले होते; मात्र सत्तेवर आल्यावर त्यांनी जुनी व्यवस्था मोडण्याऐवजी तिचीच पुनरावृत्ती केली. राजकीय हिंसाचार चालूच राहिला आणि उद्योगांविषयीची विरोधी भावना कायम राहिली. केवळ व्यवस्थेचा चेहरा पालटला, तिचे मूळ चरित्र नाही. हाच तो सापळा आहे, जो विजय थलपती यांनी टाळला पाहिजे; कारण प्रलोभने पुष्कळ तीव्र असतील.

३. द्रविड राजकारणाची रणनीती स्वीकारणे; हा यशस्वी परंतु परिवर्तन न घडवणारा मार्ग !

तमिळनाडूमधील सर्वांत सोपा राजकीय मार्ग, म्हणजे द्रविड राजकारणाची रणनीती स्वीकारणे, तीच भाषा कायम ठेवणे, तिचा सूर पालटणे आणि स्वतःला त्याच राजकारणाची नवीन आवृत्ती म्हणून सादर करणे. हा मार्ग सुरक्षित आहे. तो परिचित आहे आणि अल्पकाळात तो यशस्वीही होतो; पण ते परिवर्तन घडवणारे नाही. जर विजयने तो मार्ग निवडला, तर त्याचा उदय लक्षणीय असेल; पण ऐतिहासिक नाही.

४. जोसेफ विजय थलपती यांनी करावयाची पुढील वाटचाल

विजयने जर तो मार्ग निवडला, तर त्याचा उदय महत्त्वपूर्ण ठरेल; पण ऐतिहासिक नाही. ऐतिहासिक ठरण्यासाठी त्याने काहीतरी अधिक कठीण केले पाहिजे. हे दुष्टचक्र चालू ठेवण्याऐवजी ते मोडून काढले पाहिजे. याचा अर्थ केवळ द्रविडी राजकारणाच्या पलीकडे जाणे नव्हे, तर ज्याला आपण आता ‘फुटीरतावादी निराशा’ म्हणू शकतो, त्या पलीकडे जाणे होय. भाषिक आणि प्रादेशिक असुरक्षिततेची सतत आठवण करून देणे, हिंदीविरोधी भूमिकांचा अतीवापर करणे आणि तमिळ अस्मितेची मांडणी भारतीय अस्मितेच्या विरोधात करणे, यांचा लाभ घेणे, हे आता झपाट्याने पालट होणार्‍या भारतात न्यून होत चालले आहे.

नवीन तमिळ मतदार स्वतःची प्रादेशिक अस्मिता सोडत नाही; पण त्यासह तो वाढत्या प्रमाणावर आकांक्षांची पूर्तता शोधत आहे. नोकर्‍या, उद्योग, आर्थिक वृद्धी आणि जागतिक पातळीवरील एकत्रीकरण या गोष्टी त्यांना आता हव्या आहेत. विजय यांच्याकडे तमिळ राजकारणाला प्रतिकाराकडून प्रासंगिकतेकडे नेण्याची आणि त्याची नवी व्याख्या मांडण्याची एक खरी संधी आहे. यासाठी त्यांचे केंद्र सरकारसमवेतचे संबंध अत्यंत महत्त्वाचे ठरतील.

५. तमिळनाडूचा विकास साधण्यासाठी देहलीशी समन्वय ठेवणे आवश्यक !

भारतीय राजकारणात विरोधी पक्ष, म्हणजे अडवणूक असा अर्थ होत नाही. या संदर्भात नवीन पटनायक यांचे उदाहरण एक उत्तम आदर्श आहे. त्यांनी स्वतःचे राजकीय स्वातंत्र्य जपले, केंद्रातील सत्ताधारी आघाडीशी अधिकृतपणे हातमिळवणी केली नाही, तरीही ओडिशाच्या विकासासाठी त्यांनी केंद्र सरकारशी अत्यंत व्यावहारिकतेने काम केले. राजकारणातील तो समतोल राखणेच सर्वांत महत्त्वाचे आहे. विजय यांना कोणत्याही राष्ट्रीय आघाडीचा भाग होण्याची आवश्यकता नाही; परंतु त्यांना सतत विरोधाची भूमिका घेणेही परवडणारे नाही. तमिळनाडूच्या प्रगतीची गाथा ही देशाच्या प्रगतीशी जोडलेली आहे. पायाभूत सुविधा, गुंतवणूक, उत्पादन आणि जागतिक पुरवठा साखळी यांसाठी नवी देहलीशी म्हणजेच (केंद्र सरकारशी) समन्वय राखणे आवश्यक आहे.

६. नरेंद्र मोदी यांच्या सरकारसह विधायक पद्धतीने काम करण्याची संधी

राजकीय स्वायत्तता न गमावता नरेंद्र मोदी सरकारसह विधायक पद्धतीने काम करणे, म्हणजे तडजोड नव्हे, तर ते सुशासन आहे. त्याच वेळी विजय यांनी सध्याच्या द्रविडी राजकारणातील टोकाच्या भूमिकेपासून विशेषतः हिंदु विरोध, हिंदी विरोध, उत्तर भारत विरोध आणि आक्रमक अस्मितेच्या ध्रुवीकरणापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवले पाहिजे. एम्.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील राजकीय व्यवस्थेवर अशा भूमिकेला खतपाणी घालण्याचे आरोप वारंवार होत असतात. असा मार्ग राजकारणाची व्याप्ती वाढवण्याऐवजी ती संकुचित करतो. तमिळनाडूला त्याच जुन्या वैचारिक संघर्षांच्या मोठ्या आवाजातील आवृत्तीची आवश्यकता नाही. राज्याला आता एका नव्या समन्वयाची आवश्यकता आहे, असा समन्वय जो सांस्कृतिक अभिमान तर जपेलच; पण त्यासह आर्थिक महत्त्वाकांक्षा आणि राष्ट्रीय एकात्मतेची सांगड घालेल. ही निश्चितपणे विजय यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे; पण केवळ संधी मिळणे, म्हणजे नियती नव्हे.

७. …तर तमिळ राजकारणाच्या परिभाषेत मोठे स्थित्यंतर शक्य !

भारतीय राजकीय इतिहास हेच दर्शवतो की, लोकप्रियता केवळ यशाची दारे उघडू शकते; परंतु त्यातून नक्की कोण पुढे जाणार, हे पक्षाची रचना, विचारधारा आणि दिशा यांच्या स्पष्टता ठरते. एन्.टी. रामाराव यशस्वी झाले, ते केवळ ते ‘अभिनेते’ होते म्हणून नाही, तर त्यांनी जनभावनेचे रूपांतर एका संघटनेत केले आणि प्रादेशिक अस्मितेचे रूपांतर राजकीय वेगवान प्रवाहात केले. इतर अनेक नट अपयशी ठरले; कारण ते केवळ लोकप्रियतेपाशीच थांबले. जोसेफ विजय आज अगदी त्याच टप्प्यावर उभे आहेत.

जर ते केवळ द्रविडी चौकटीतील आणखी एक खेळाडू बनून राहिले, तर त्यांची प्रगती लक्षणीय; पण मर्यादित असेल; मात्र जर त्यांनी ही चौकट मोडली, जर त्यांनी सध्याच्या द्रविडी राजकारणाविषयीचा निराशेला एका व्यापक तमिळ महत्त्वाकांक्षेत पालटले, कालबाह्य झालेला द्वेष सोडून दिला, केंद्र सरकारसह व्यावहारिकपणे काम केले आणि भविष्याचा वेध घेणारी राजकीय मांडणी केली, तर त्यांचा हा प्रवेश केवळ नेतृत्वातील पालट ठरणार नाही, तर तो तमिळ राजकारणाची परिभाषाच पालटेल. तीच खरी संधी आहे आणि तीच खरी कसोटीही आहे.

लेखक : शंतनू गुप्ता, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चरित्रलेखन करणारे प्रसिद्ध लेखक आणि राजनैतिक विश्लेषक, उत्तरप्रदेश.