‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा ! – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

सामाजिक ऐक्य, सेवा आणि प्रेरणा यांचा ऐतिहासिक सोहळा

पत्रकार परिषदेत बोलतांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (डावीकडे)

नांदेड – ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारीला मोदी मैदान येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा, तसेच सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, कार्यकारी अधिकारी तथा समन्वयक डॉ. जगदीश सकवान, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था संघटनांचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

मोदी मैदानावर कार्यक्रमस्थळी सुमारे ३५० कक्ष उभारण्यात येणार असून प्रत्येक सामाजिक संघटनेने किमान ५ ते १० कक्ष उभारून भाविकांना सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले. हे कक्ष दोन्ही दिवस सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत चालू रहातील. प्रत्येक कक्षावर संबंधित संघटनेचा फलक लावण्यात येणार असून भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाद, अल्पाहार, माहिती आणि सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘२४ जानेवारीला तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथून निघणार्‍या पालखी मिरवणुकीचे स्वागत करून मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. या कार्यक्रमासाठी २ दिवसांत ८ ते १० लाख भाविक नांदेडमध्ये येण्याची शक्यता असून त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांसह सामाजिक संघटनांनी सज्ज रहाणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचा शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक माध्यमे यांतून व्यापक प्रचार करण्यात येत आहे.’’