मनुष्याच्या व्यक्तीमत्त्वाच्या विविध पैलूंवर ग्रहांचा असलेला प्रभाव !

‘सूर्यमालेतील ग्रह हे विशिष्ट सूक्ष्म ऊर्जांचे वाहक आहेत. ते मनुष्याच्या अंतःकरणावर, म्हणजेच पर्यायाने व्यक्तीमत्त्वावर प्रभाव पाडतात. व्यक्तीचे विचार आणि कृती हे तिच्या व्यक्तीमत्त्वावर आधारित असतात. ग्रह हे मनुष्याच्या व्यक्तीमत्त्वाचे कोणते पैलू दर्शवतात, हे या लेखाद्वारे समजून घेऊया. 

११ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे महत्त्व’, हा भाग वाचला. त्यासह ‘ग्रहांच्या विशिष्ट ऊर्जेचा मनुष्याच्या व्यक्तीमत्त्वावर असलेला प्रभाव’, यांमधील काही सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/996572.html


२. ग्रहांच्या विशिष्ट ऊर्जेचा मनुष्याच्या व्यक्तीमत्त्वावर असलेला प्रभाव

२ ऊ. जिवाची आंतरिक आकांक्षा दर्शवणारा रवि : ‘ज्योतिषशास्त्रात चंद्र हा बाह्य मनाच्या चंचल इच्छा दर्शवतो, तर रवि हा अंतर्मनाची स्थिर आणि सूक्ष्म आकांक्षा दर्शवतो. जिवामध्ये असलेली आंतरिक आकांक्षा त्याला जीवनातील सत्यता, उदात्तता, व्यापकता, ज्ञान, प्रीती आदी उच्चतम तत्त्वांकडे आकर्षित करते. ही जाणीव मनुष्याला जीवनातील सार्थकता शोधण्यासाठी प्रेरित करते. या जाणीवेमुळे मनुष्यात अल्पसंतुष्टता येत नाही आणि तो अधिकाधिक उन्नती करण्यास उत्सुक असतो. मंगळ आणि रवि हे दोन्ही अग्नितत्त्वाशी संबंधित ग्रह आहेत; परंतु मंगळ ग्रह रज-तमोगुणी असून बाह्यमनाच्या चंचल कामनांच्या पूर्तीसाठी लागणारी शक्ती पुरवतो, तर रवि हा सत्त्व-रजोगुणी असून अंतर्मनातील सूक्ष्म तळमळीच्या पूर्तीसाठी लागणारे चैतन्य पुरवतो. जिवाला चेतनेच्या पुढच्या स्तरावर नेण्यास रवीची भूमिका महत्त्वाची असते.

२ ऊ १. रवीचा अन्य ग्रहांशी योग : कुंडलीतील रवीचा अन्य ग्रहांशी असलेल्या योगांवरून व्यक्तीची उच्च ध्येयाकडे जाण्याची तळमळ कोणत्या स्वरूपाची आहे, याचा बोध येतो.

अ. रवीचा शुक्राशी योग असल्यास व्यक्ती प्रेम, सौंदर्य, विविधता आदींद्वारे जीवनातील अर्थ शोधते.

आ. रवीचा मंगळाशी योग असल्यास व्यक्ती शक्ती, कार्य, दायित्व आदींद्वारे व्यापक होण्याचा प्रयत्न करते.

इ. रवीचा गुरूशी योग असल्यास व्यक्तीला ज्ञान, चिंतन, अभ्यास आदींद्वारे जीवनातील सत्य जाणून घेण्याची तळमळ असते.

ई. रवीचा शनीशी योग असल्यास व्यक्ती सेवा, त्याग, समर्पण आदींद्वारे जीवनातील सार्थकता शोधते.

२ ए. उदात्ततेचा (महानतेचा) कारक गुरु : गुरु ग्रह आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; त्यामुळे ‘उदात्तता’ (महानता) हे त्याचे वैशिष्ट्य आहे. जीवनातील उदात्त तत्त्वे, उदा. धर्म, नीतीमूल्ये, न्याय, ज्ञान आदींवर गुरु ग्रहाचा अंमल आहे. गुरु ग्रह हा मनुष्याला देवत्वाकडे घेऊन जातो. ‘विवेक’ हा गुरु ग्रहाचा स्थायी भाव आहे. मनुष्याची बुद्धी सात्त्विक झाल्यावर तिच्यात विवेक प्रकट होतो. त्यामुळे मनुष्याला योग्य-अयोग्य, सत्-असत्, धर्म-अधर्म आदींमधील भेद जाणता येतो. विवेकामुळे मनुष्यात संयम, सामंजस्य, विचारीपणा, चिंतनशीलता, समभाव, इतरांचा विचार, प्रीती आदी सद्गुण निर्माण हाेतात. या सद्गुणांमुळे मनुष्याची चेतना व्यापक होत जाते. चेतना व्यापक झाल्याने त्याच्या ज्ञानात आणि आनंदात वाढ होते. गुरु ग्रह प्रौढावस्थेशी संबंधित आहे. व्यक्तीच्या वयानुसार तिचे अनुभव वाढत जातात आणि अनुभवांमुळे तिच्यात प्रगल्भता निर्माण होते.

२ ए १. गुरूचा अन्य ग्रहांशी योग : कुंडलीतील गुरूचा अन्य ग्रहांशी असलेल्या योगांवरून व्यक्तीचा व्यापकतेकडे जाण्याचा मार्ग लक्षात येतो.

अ. गुरूचा बुधाशी योग असल्यास व्यक्ती जिज्ञासा, वाचन, मनन, अभ्यास आदींद्वारे स्वतःला प्रगल्भ करते.

आ. गुरूचा शुक्राशी योग असल्यास प्रेमभाव, भक्ती, इतरांचा विचार आदींद्वारे व्यक्ती ईश्वराच्या निकट जाते.

इ. गुरूचा मंगळाशी योग असल्यास समष्टीच्या हितासाठी कार्य करण्यातून व्यक्ती व्यापकतेकडे जाते.

ई. गुरूचा रवीशी योग असल्यास व्यक्ती अध्ययन, अध्यापन, मार्गदर्शन, ज्ञान आदींद्वारे समाजाला दिशादर्शन करते.

उ. गुरूचा शनीशी योग असल्यास व्यक्ती त्याग, निष्कामता, सेवा आदींद्वारे समाजाशी एकरूप होते.

२ ऐ. त्यागाचा कारक शनि : शनि ग्रह वायूतत्त्वाशी संबंधित आहे. त्यामुळे ‘अनासक्ती’ आणि ‘त्याग’ ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. गुरु ग्रहामुळे व्यक्ती विवेकी आणि ज्ञानी होते, तर शनि ग्रहामुळे ती अंतर्मुख अन् त्यागी होते. तिला ‘चित्तात असलेल्या कामना आणि इच्छा न्यून झाल्याविना ‘शांती’ अन् ‘आत्मिक समाधान’ यांची अनुभूती होत नाही’, याची जाणीव होऊन ती त्याग करण्यास प्रवृत्त होते. तिच्यात निष्कामता, सेवाभाव, त्यागी वृत्ती आणि समर्पणभाव निर्माण होतो, म्हणजे ती अहंशून्यतेकडे जाऊ लागते. त्यामुळे खर्‍या अर्थाने चित्तशुद्धी होऊन तिला शांती आणि कृतकृत्यता लाभते. शनि ग्रह जीवनाची वृद्धावस्था दर्शवतो. वृद्धावस्थेत शारीरिक दुर्बलता आल्यामुळे, कौटुंबिक आणि सामाजिक दायित्वे न्यून झाल्यामुळे, तसेच जीवनातील सर्व प्रकारचे अनुभव घेतल्यामुळे व्यक्तीत वैराग्य लवकर निर्माण होऊ शकते.

२ ऐ १. शनीचा अन्य ग्रहांशी योग आणि त्यामुळे होणारे लाभ : कुंडलीतील शनीचा अन्य ग्रहांशी असलेल्या योगांवरून व्यक्तीच्या त्यागाचे स्वरूप समजते.

श्री. राज कर्वे

अ. शनीचा चंद्र किंवा बुध यांच्याशी योग असल्यास व्यक्तीत चंचलता, लहरीपणा आणि मनस्वीपणा अल्प असतो.

आ. शनीचा शुक्राशी योग असल्यास व्यक्ती सुखासीनता, भावनिकता, व्यक्तीनिष्ठता आदींचा त्याग करते.

इ. शनीचा रवीशी योग असल्यास व्यक्ती मान-सन्मान, प्रसिद्धी, अधिकार आदींचा त्याग करते.

ई. शनीचा गुरूशी योग असल्यास व्यक्ती केवळ बौद्धिक स्तरावर न रहाता अध्यात्म प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न करते.

२ ओ. मुक्तीकारक केतू : अव्यक्त असणे, लय करणे, सूक्ष्मत्त्वाकडे जाणे आदी केतू ग्रहाचे कार्य आहे. त्यामुळे केतू ग्रहाचा स्वभाव अंतर्मुख आहे; त्याची गती ‘बाहेरून आत’ अशी आहे. केतूच्या दृष्टीत शरिरापेक्षा आत्मा, पृष्ठभागापेक्षा गाभा, स्थूलतेपेक्षा सूक्ष्मता आणि अनेकतेपेक्षा एकता यांस अधिक महत्त्व आहे. त्यामुळे केतूला मुक्तीदायक आणि मोक्षदायक म्हटले जाते. ईश्वराकडून व्यक्त झालेला समस्त सृष्टीचा व्यापार ईश्वर पुन्हा स्वतःत सामावून घेतो. केतू ही ईश्वराची लयकारक शक्ती आहे. केतू ग्रह हा भौतिक गोष्टी देत नाही; उलट भौतिक गोष्टींचा त्याग घडवून आणतो अन् जिवाला त्याच्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जातो.

२ ओ १. केतूचा अन्य ग्रहांशी योग आणि त्यामुळे होणारे लाभ :  कुंडलीतील केतूचा अन्य ग्रहांशी असलेल्या योगांवरून व्यक्ती कोणत्या गोष्टींद्वारे स्वतःला अंतर्मुख करेल, हे लक्षात येते.

अ. केतूचा बुधाशी योग असल्यास व्यक्ती विचार, जिज्ञासा आदींद्वारे स्वतःला अंतर्मुख करेल.

आ. केतूचा शुक्राशी योग असल्यास व्यक्ती ईश्वरभक्ती, ईश्वराशी अनुसंधान आदींद्वारे स्वतःला अंतर्मुख करेल.

इ. केतूचा मंगळाशी योग असल्यास व्यक्ती इतरांसाठी कार्य, ईश्वरासाठी कर्म आदींद्वारे स्वतःला अंतर्मुख करेल.

ई. केतूचा गुरूशी योग असल्यास व्यक्ती आत्मज्ञान, विवेक आदींद्वारे स्वतःला अंतर्मुख करेल.

२ औ. हर्षल आणि नेपच्यून : ‘हर्षल’ ग्रहाचा शोध १८ व्या शतकात आणि ‘नेपच्यून’ ग्रहाचा शोध १९ व्या शतकात लागला. हर्षल ग्रह नाविन्यता, आधुनिकता, संशोधन आदींचा कारक आहे; तर नेपच्यून ग्रह संवेदनशीलता, सूक्ष्मता, अंतःस्फूर्ती आदींचा कारक आहे.

२ औ १. हर्षल आणि नेपच्यून ग्रहांमुळे मिळणारे ज्ञान : आध्यात्मिक दृष्टीने विचार केल्यास हर्षल आणि नेपच्यून हे अंतर्ज्ञान किंवा सूक्ष्मज्ञान यांच्याशी संबंधित ग्रह आहेत. साधनेमुळे व्यक्तीचे अंतःकरण सात्त्विक होऊन तिची चेतना व्यापक होते. त्यामुळे तिला विश्वमन आणि विश्वबुद्धी यांतून ज्ञान प्राप्त होते. हे ज्ञान दैवी, अचूक आणि अनुभूतीजन्य असते. हर्षल आणि नेपच्यून अशा प्रकारचे सूक्ष्मज्ञान दर्शवतात. कुंडलीत आध्यात्मिक योग चांगले असून जर चंद्र, बुध, शुक्र, रवि, गुरु आदींचा हर्षल आणि नेपच्यून यांच्याशी शुभयोग असल्यास व्यक्तीला सूक्ष्मज्ञान प्राप्त होण्याची शक्यता असते.

३. भौतिक प्रकृतीचे आणि आध्यात्मिक प्रकृतीचे ग्रह

वरील विवेचनावरून लक्षात येते की चंद्र, बुध, शुक्र, मंगळ आणि राहू हे भौतिक प्रकृतीचे ग्रह आहेत; तर रवि, गुरु, शनि, केतू, हर्षल आणि नेपच्यून हे आध्यात्मिक प्रकृतीचे ग्रह आहेत. चंद्र, बुध, शुक्र, मंगळ आणि राहू हे ग्रह जीवनाचा पाया दर्शवतात, उदा. संस्कार, प्रवृत्ती, इच्छा, आकांक्षा, आकलनशक्ती, क्रियाशक्ती आदी. या गोष्टींवर व्यक्तीमत्त्वाची मूलभूत चौकट आधारलेली असते, तर रवि, गुरु, शनि, केतू, हर्षल आणि नेपच्यून हे ग्रह जीवनातील उदात्त आणि दूरगामी उन्नती दर्शवतात. हे ग्रह जीवनातील सत्य आणि अर्थ शोधण्यास जिवाला प्रवृत्त करतात. या ग्रहांमुळे व्यक्तीमत्त्व व्यापक, विवेकी आणि सत्यनिष्ठ बनते.

४. कुंडलीतील विविध ग्रह हे जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे दिशादर्शक !

अशा प्रकारे जन्मकुंडलीतील ग्रहयोगांवरून व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व चांगल्याप्रकारे कळते. कुंडलीतील ज्या ग्रहांमध्ये एकमेकांशी महत्त्वाचे योग असतात, त्या ग्रहांशी संबंधित शक्ती किंवा वैशिष्ट्ये व्यक्तीमध्ये प्रकर्षाने असतात. व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहयोगांवरून स्वतःचा आत्मिक विकास घडवण्याची व्यक्तीची क्षमता किती आहे आणि तिचा मार्ग कोणता आहे, हे लक्षात येते. जन्मोजन्मीच्या प्रवासात व्यक्तीतील जीवात्मा वर्तमान जन्मात कोणत्या स्तरापर्यंत पोचला आहे, हे ग्रहयोगांवरून लक्षात येऊ शकते आणि पुढील उन्नतीसाठी व्यक्तीला दिशादर्शन करता येऊ शकते. अशा प्रकारे विशिष्ट ऊर्जेचे वहन करणारे ग्रह हे जिवाच्या आत्मिक विकासाचा मार्ग दाखवणारे दिशादर्शक आहेत !’

(समाप्त)

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.११.२०२५)

ज्योतिषशास्त्र हे व्यक्तीमत्त्वाचा अभ्यास करण्याचे उत्कृष्ट माध्यम असून सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण !