मनुष्याच्या व्यक्तीमत्त्वाच्या विविध पैलूंवर ग्रहांचा असलेला प्रभाव !

ज्योतिषशास्त्र हे वेदांचे अंग असून ‘मनुष्य जीवनावर ग्रहांचा प्रभाव पडतो’, हे सिद्ध करणार्‍या महान शास्त्रकारांना नमन !

‘सूर्यमालेतील ग्रह हे विशिष्ट सूक्ष्म ऊर्जांचे वाहक आहेत. ते मनुष्याच्या अंतःकरणावर, म्हणजेच पर्यायाने व्यक्तीमत्त्वावर प्रभाव पाडतात. व्यक्तीचे विचार आणि कृती हे तिच्या व्यक्तीमत्त्वावर आधारित असतात. ग्रह हे मनुष्याच्या व्यक्तीमत्त्वाचे कोणते पैलू दर्शवतात, हे या लेखाद्वारे समजून घेऊया.    

(भाग १)

१. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे महत्त्व

१ अ. सतत गतीशील असणारे ग्रह हे परिवर्तनाचे सूचक असणे : ज्योतिषशास्त्रात मुख्य ३ घटक आहेत – कुंडलीतील स्थाने, आकाशातील नक्षत्रे आणि सूर्यमालेतील ग्रह. त्यांपैकी कुंडलीतील स्थाने आणि आकाशातील नक्षत्रे हे घटक स्थिर आहेत. (कुंडलीतील स्थाने म्हणजे आकाशाचे १२ विभाग असल्याने ते कधी पालटत नाहीत. आकाशातील नक्षत्रेही स्थिर आहेत; मात्र पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे नक्षत्रे प्रतिदिन पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात, असे दिसते). सूर्यमालेतील ग्रह मात्र सतत गतीशील असतात. ग्रह हे गतीशील असल्यामुळे ते परिवर्तनाचे सूचक असतात.

१ आ. ग्रहांच्या स्थितीनुसार त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या ऊर्जेचा जिवाच्या अंतःकरणावर परिणाम होणे : ग्रहांमध्ये त्यांचा आकार, रंग, गती आदींच्या अनुसार विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. ही ऊर्जा त्रिगुण (सत्त्व, रज आणि तम) आणि पंचतत्त्वे (पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश) यांच्या स्तरावरील असते. ही ऊर्जा ग्रहांमधून सतत प्रक्षेपित होत असते. २ ग्रहांमध्ये विशिष्ट योग (कोन) आल्यावर त्या २ ग्रहांच्या ऊर्जांचा समन्वय होऊन तिसरी ऊर्जा निर्माण होते. पृथ्वीवरील स्थळानुसार एखादा ग्रह हा आकाशातील कोणत्या भागात (स्थानात) आहे, यानुसारही त्याच्या ऊर्जेच्या तीव्रतेत पालट होतो. ग्रहांकडून प्रक्षेपित होणारी ऊर्जा मनुष्याचे शरीर, प्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांवर परिणाम करते. बालकाच्या जन्माच्या वेळी ग्रहांच्या स्थितीनुसार त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या ऊर्जांचा बालकाच्या अंतःकरणावर (मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांवर) परिणाम होतो.

२. ग्रहांच्या विशिष्ट ऊर्जेचा मनुष्याच्या व्यक्तीमत्त्वावर असलेला प्रभाव

२ अ. मनावरील संस्कार दर्शवणारा चंद्र : पृथ्वीपासून सर्वांत जवळ असलेला (उप)ग्रह म्हणजे चंद्र. चंद्र हा आपतत्त्वाशी संबंधित आहे. ग्रहणशीलता, संवेदनशीलता आणि संस्कारक्षमता ही चंद्राची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे चंद्र मनाचा कारक मानला जातो. मनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर कोणत्याही चांगल्या-वाईट गोष्टीचा संस्कार सहजपणे होतो. त्या गोष्टीसंबंधी कारणमीमांसा करण्याची क्षमता मनाकडे नसते; ती क्षमता बुद्धीमध्ये असते. मन ज्या गोष्टीच्या संपर्कात येईल, ती गोष्ट ते आहे तशी स्वीकारते. ज्योतिषशास्त्रात चंद्राला बालपणाचा कारक मानला आहे. मूल १२ वर्षांचे होईपर्यंत ते त्याचे आई-वडील, कुटुंब, सभोवतालची स्थिती आदींकडून होणारे संस्कार आहे तसे ग्रहण करत असते. त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा पाया या काळात घडत असतो.

२ अ १. चंद्राचा अन्य ग्रहांशी योग : कुंडलीतील चंद्राचा अन्य ग्रहांशी असलेल्या योगावरून व्यक्तीच्या मनावर कोणत्या प्रकारचे संस्कार असू शकतात, हे कळते, उदा. चंद्राचा बुधाशी योग असल्यास मनावर जिज्ञासा, चौकसपणा, तर्क, चंचलता आदींचे संस्कार असतात. चंद्राचा शुक्राशी योग असल्यास मनावर प्रेम, सौंदर्य, वात्सल्य, सर्जनशीलता आदींचे संस्कार दिसून येतात. चंद्राचा मंगळाशी योग असल्यास मनावर क्रियाशीलता, उत्साह, धैर्य, बळ आदींचे संस्कार असू शकतात. चंद्राचा गुरूशी योग असल्यास मनावर सात्त्विकता, व्यापकता, इतरांचा विचार, धार्मिकता आदींचे संस्कार असतात. चंद्राचा शनीशी योग असल्यास मनावर संयम, उदासीनता, विचारीपणा आदींचे संस्कार असतात.

श्री. राज कर्वे

२ आ. आकलनशक्तीचा कारक बुध : चंद्रानंतर व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाचा पाया घडवणारा दुसरा महत्त्वाचा ग्रह म्हणजे बुध. चंद्र हा मनाचा कारक आहे, तर बुध हा बुद्धीचा कारक आहे. बुद्धीकडे कारणमीमांसा करण्याची क्षमता असल्याने ती कोणतीही गोष्ट आहे तशी न स्वीकारता, त्या गोष्टीचे ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे जिज्ञासूवृत्ती, आकलनशक्ती, स्मरणशक्ती आदी बुध ग्रहाची वैशिष्ट्ये आहेत. बुध ग्रह किशोरावस्थेशी संबंधित आहे. किशोरवयात, म्हणजे वय वर्षे १२ ते १८ या कालावधीत मुलांमध्ये जिज्ञासा आणि समज वाढत असते. या काळात मुलांना त्यांच्या आवडी-निवडी, क्षमता आणि कौशल्य यांचा काही प्रमाणात बोध होऊ लागतो. त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होत असते.

२ आ १. बुधाचा अन्य ग्रहांशी योग : कुंडलीतील बुधाचा अन्य ग्रहांशी असलेल्या योगावरून व्यक्तीच्या बुद्धीचे स्वरूप आणि तिची दिशा यांचा अनुमान लावता येतो. बुधाचा शुक्राशी योग असल्यास व्यक्तीचा कल कला, कौशल्य, सौंदर्य, सृर्जनशीलता (कल्पनाशक्तीचा वापर करून काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता) आदींकडे असतो. बुधाचा मंगळाशी योग असल्यास व्यक्तीची बुद्धी तीक्ष्ण असल्याने तिला गणित, तंत्रज्ञान, विज्ञान, सांख्यिकी-विवेचन आदींमध्ये गती असते. बुधाचा गुरूशी योग असल्यास व्यक्तीमध्ये अभ्यासूवृत्ती असल्याने विद्या, शास्त्र, इतिहास, न्याय, समाज, धर्म आदींची आवड असते. बुधाचा शनीशी योग असल्यास व्यक्तीमध्ये प्रगल्भता असल्याने संशोधन, चिंतन, तत्त्वज्ञान, सामाजिक सुधारणा आदींसाठी ती अनुकूलता असते.

२ इ. जीवनातील रसाचा (सुखाचा) कारक शुक्र : शुक्र हा व्यक्तीची मानसिक जडणघडण करणारा एक महत्त्वाचा ग्रह आहे.

१. शुक्र हा जीवनातला ‘रस’ आहे. हा रस आनंद, सौंदर्य, प्रेम, हर्ष, सुख आदी विविध रूपांनी व्यक्त होतो.

२. कुटुंबियांकडून मिळणारी मानसिक सुरक्षितता आणि सहानुभूती; वैवाहिक जोडीदाराकडून मिळणारे प्रेम अन् आधार.

३. घर, वाहन, धन आणि सुविधा यांच्यामुळे मिळणारे सुख आदी शुक्र ग्रहाशी संबंधित आहेत.

४. गायन, वादन, नृत्य, शिल्प आदी विविध कलांमधून व्यक्त होणारे सौंदर्य, आनंद आदींवर शुक्र ग्रहाचा अंमल आहे.

५. शुक्र हा तारुण्याशी संबंधित आहे. व्यक्तीला तारुण्यात सुख आणि प्रेम मिळवण्याची अभिलाषा अधिक असते.

२ इ १. शुक्राचा अन्य ग्रहांशी योग : कुंडलीतील शुक्राचा अन्य ग्रहांशी असलेल्या योगावरून व्यक्ती कोणत्या गोष्टीत सुख शोधते, याचा बोध होतो.

अ. शुक्राचा चंद्राशी योग असल्यास व्यक्तीला वात्सल्य, शुश्रूषा, सौंदर्य, कला आदींमध्ये आनंद वाटतो.

आ. शुक्राचा मंगळाशी योग असल्यास व्यक्तीला वस्त्रालंकार, भौतिक वस्तू, धन, इंद्रियसुख आदींमध्ये अधिक सुख वाटते.

इ. शुक्राचा गुरूशी योग असल्यास व्यक्तीला समृद्धी, धर्माचरण, संस्कृती, सामाजिक एकता, ईश्वरभक्ती आदींमध्ये आनंद वाटतो.

ई. शुक्राचा शनीशी योग असल्यास व्यक्तीला ज्ञान, वैराग्य, त्याग आदींमध्ये समाधान वाटते.

२ ई. इच्छाशक्ती आणि बळ यांचा कारक मंगळ : मनुष्याच्या जीवनाचा एकंदर उत्कर्ष साधण्यात मंगळ ग्रहाची भूमिका महत्त्वाची आहे. मंगळ ग्रह अग्नितत्त्वाशी संबंधित आहे. एखादे कर्म करण्यासाठी लागणारी ‘इच्छाशक्ती’ आणि ‘बळ’ हे मंगळ ग्रहाचे विशेष गुण आहेत. त्यामुळे कर्तृत्व, पराक्रम, साहस, धैर्य, आत्मविश्वास, क्रियाशीलता आदी मंगळ ग्रहाशी संबंधित वैशिष्ट्ये आहेत. मंगळ ग्रह तारुण्यावर प्रभाव पाडतो. व्यक्ती तरुण असतांना तिच्यात असणारे बळ, उत्साह, उन्नतीची प्रेरणा, स्वतःतील क्षमता प्रकट करण्याची इच्छा, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची सिद्धता आदी मंगळाच्या शक्तीच्या अभिव्यक्ती आहेत.

२ ई १. मंगळाचा अन्य ग्रहांशी योग : कुंडलीतील मंगळ ग्रहाचा अन्य ग्रहांशी असलेल्या योगावरून व्यक्तीमध्ये कोणत्या स्वरूपाची क्षमता आहे, हे लक्षात येते.

अ. मंगळाचा बुध ग्रहाशी योग असल्यास व्यक्तीला संवाद, विश्लेषण, तर्क, तंत्रज्ञान आदींमध्ये गती असते.

आ. मंगळाचा शुक्राशी योग असल्यास व्यक्तीची सृर्जनशीलता, कला, सुशोभीकरण, सादरीकरण आदींमध्ये निपुणता असते.

इ. मंगळाचा रवीशी योग असल्यास व्यक्तीमध्ये नेतृत्व, अधिकार, व्यवस्थापन आदींची क्षमता असते.

ई. मंगळाचा गुरूशी योग असल्यास व्यक्तीला धर्म, न्याय, शिक्षण यांमध्ये रुची असून ती समाजकार्यात योगदान देते.

उ. मंगळाचा शनीशी योग असल्यास व्यक्तीमध्ये परिश्रमीवृत्ती आणि चिकाटी असते.

२ उ. मायेचा परिपूर्ण विकास साधणारा राहू : व्यक्त करणे, वृद्धी करणे, स्थूलतेकडे जाणे आदी राहू ग्रहाचे कार्य आहे. त्यामुळे राहू ग्रहाचा स्वभाव बहिर्मुख आहे; त्याची गती ‘आतून बाहेर’ अशी आहे. राहूच्या दृष्टीत आत्म्यापेक्षा शरीर, गाभ्यापेक्षा पृष्ठभाग, सूक्ष्मतेपेक्षा स्थूलता आणि एकापेक्षा अनेकता यांस अधिक महत्त्व आहे. त्यामुळे राहूला ‘भ्रमित करणारा, मायाजाल रचणारा’, असे म्हटले जाते; पण राहू ग्रह ही स्वतःला व्यक्त करणारी, बहुविधता निर्माण करणारी आणि कार्याला मूर्तरूप देणारी ईश्वराची एक शक्तीच आहे. राहू ग्रह हा धन, बुद्धी, सुख, प्रसिद्धी आदी भौतिक गोष्टींचा दाता आहे.

२ उ १. राहूचा अन्य ग्रहांशी योग : कुंडलीतील राहूचा अन्य ग्रहांशी असलेल्या योगांवरून व्यक्ती कोणत्या गोष्टींतून स्वतःला व्यक्त करील, हे लक्षात येते.

अ. राहूचा बुधाशी योग असल्यास व्यक्ती बुद्धी, संवाद, वाङ्मय आदींतून स्वतःला व्यक्त करते.

आ. राहूचा शुक्राशी योग असल्यास व्यक्ती सौंदर्य, कला, कल्पकता आदींतून स्वतःला व्यक्त करते.

इ. राहूचा मंगळाशी योग असल्यास व्यक्ती कर्तृत्व, नेतृत्व, बल आदींतून स्वतःला व्यक्त करते.

ई. राहूचा गुरूशी योग असल्यास व्यक्ती पांडित्य, विद्वत्ता, विद्या आदींतून स्वतःला व्यक्त करते.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.११.२०२५)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/998938.html