गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अद्वितीयत्वाची अल्प कालावधीत प्रचीती घेणारे रायगड येथील सुप्रसिद्ध गायक श्री. रूपेश देशमुख !

श्री. रूपेश देशमुख यांचा सनातनशी संपर्क आणि साधनेला आरंभ !

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील धर्मप्रेमी श्री. रोशन खंडागळे मागील १ वर्षापासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत. त्यांनी कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू केला. त्यांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना केल्यामुळे जीवनात सकारात्मक पालट होतो’, याची प्रचीती घेतली. ‘ज्याप्रमाणे स्वतःच्या जीवनातील समस्या दूर झाल्या, त्याप्रमाणे इतरांच्या जीवनातील समस्या दूर व्हाव्यात’, या तळमळीमुळे ते इतरांनाही साधना सांगतात. 

श्री. रूपेश देशमुख

गायनक्षेत्रातील स्वतःचे गुरु आणि प्रसिद्ध गायक श्री. रूपेश देशमुख यांनाही त्यांनी ४ मासांपूर्वी साधना सांगितली. त्यानुसार श्री. देशमुख यांनी साधना चालू केली. साधनेला आरंभ केल्यानंतर त्यांच्या जीवनातही आमूलाग्र पालट झाला.


श्री. रूपेश देशमुख यांचा परिचय

श्री. रूपेश देशमुख हे नारंगी (तालुका खोपोली, जिल्हा रायगड) येथे रहातात. ते सुप्रसिद्ध गायक आहेत. मागील १५ वर्षांपासून ते गायनक्षेत्रात आहेत. ‘श्रीहरीची भजने, नामजपाचे महत्त्व, श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची भक्तीगीते, श्रीकृष्णाची लीला असलेल्या गवळणी’, अशा प्रकारची गीते ते सादर करतात.

श्री. देशमुख हे रायगड जिल्ह्यातील सुधागड, पेण, मुरबाड आणि खालापूर या तालुक्यांतील भजनांच्या स्पर्धांमध्ये भाग घेतात. रायगडप्रमाणे मुंबई आणि ठाणे या ठिकाणीही त्यांच्या भजनांचे कार्यक्रम होतात. त्यांना  ‘रायगडभूषण’, ‘रायगडरत्न’ हे पुरस्कार, तसेच भजनांच्या राज्य स्तरीय आणि जिल्हा स्तरीय स्पर्धांमध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

१. श्री. रूपेश देशमुख यांच्या मनाची स्थिती नकारात्मक असल्याचे समजल्यावर त्यांना साधनेचे महत्त्व सांगणे आणि त्यांनी साधनेला त्वरित प्रारंभ करणे 

श्री. रोशन खंडागळे

‘मी अनेक वर्षांपासून भजने गातो. श्री. रूपेश देशमुख हे माझे भजन-संगीतातील गुरु आहेत. भजनातील स्वरांविषयी ते मला मार्गदर्शन करतात. एकदा मी श्री. रूपेश देशमुख यांना दूरभाष केला असता त्यांच्या मनावरील ताण आणि नकारात्मक स्थिती यांविषयी त्यांनी मला सांगितले. श्री. देशमुख यांची ही स्थिती पाहून ‘हे त्रास आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण झालेले असू शकतात’, असे माझ्या लक्षात आले. ‘हा त्रास दूर व्हावा’, यासाठी मी त्यांना साधनेचे महत्त्व सांगितले. कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’, या नामजपांचे महत्त्वही सांगितले. साधनेविषयी सांगतांना ‘१ घंटा कधी निघून गेला ?’, हे आम्हाला समजलेच नाही. त्यांनी जिज्ञासेने साधना समजून घेतली आणि साधनेला त्वरित प्रारंभही केला.

२. श्री. देशमुख यांनी साधनेला आरंभ केल्यावर अल्पावधीत ते नकारात्मक स्थितीतून बाहेर पडणे आणि त्याबद्दल त्यांना कृतज्ञता वाटणे 

साधनेला प्रारंभ केल्यावर अल्प कालावधीतच ते नकारात्मक स्थितीतून बाहेर आले. ‘अनमोल अशी साधना समजली’, याविषयी त्यांच्या मनात कृतज्ञता होती. जेव्हा मी त्यांना साधना सांगितली, तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘रोशन, आजपर्यंत संगीतक्षेत्रात तू माझा शिष्य होतास; पण अध्यात्मात तू माझा गुरु झाला आहेस.’’ ‘साधनेविषयीचे हे सर्व ज्ञान तुला कुणी सांगितले ?’, असे त्यांनी मला विचारले. तेव्हा मी त्यांना सनातन संस्थेची माहिती सांगितली आणि सनातनचे साधक श्री. राजेंद्र पावसकर यांच्याशी त्यांची भेट घालून दिली.’

– श्री. रोशन खंडागळे, खोपोली, जिल्हा रायगड.

३. सनातनचे श्री गणेशाविषयीचे प्रवचन ऐकल्यानंतर भाव जागृत होणे आणि संतांविषयी सांगितल्यावर संतभेटीची ओढ लागणे 

श्री. रोशन खंडागळे यांनी श्री. रूपेश देशमुख यांच्याशी माझी भेट घालून दिली. आमची साधनेविषयी चर्चा झाल्यानंतर श्री. रूपेश देशमुख यांच्या घरी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्मशास्त्र’ या विषयावरील प्रवचन करण्याचे ठरले. त्यानंतर लवकरच श्री गणेशोत्सव येणार होता. त्यापूर्वी गणेशाविषयी शास्त्र सांगणार्‍या प्रवचनाचे आयोजनही त्यांच्या घरी झाले. श्री गणेशाचा विषय ऐकल्यानंतर श्री. देशमुख यांचा भाव जागृत झाला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. त्या वेळी ‘त्यांची संतांशी भेट घालून द्यायला हवी’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. संतांविषयी सांगितल्यावर त्यांनाही संतांना भेटण्याची ओढ लागली.’

– श्री. राजेंद्र पावसकर, ठाणे सेवाकेंद्र

(क्रमशः पुढील रविवारी)

(सर्व सूत्रांचा मास आणि वर्ष : सप्टेंबर २०२५)

या लेखाचा उर्वरित भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1001353.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक