‘क्रेडिट कार्ड’द्वारे होणारी फसवणूक !

सध्या ‘ऑनलाईन’ खरेदीचे प्रमाण सर्वाधिक आहे. वेगवेगळ्या ‘ई-कॉमर्स’ (व्यापारी ऑनलाईन) संकेतस्थळांद्वारे आकर्षक ‘ऑफर’ (सवलती) दिल्या जातात आणि त्यामध्ये सर्वाधिक सूट या ‘क्रेडिट कार्ड’द्वारे केलेल्या खरेदीवर दिली जाते. आपल्याकडे एखाद्या बँकेचे ‘क्रेडिट कार्ड’ असेल, तर त्या व्यतिरिक्त अन्य बँकेच्या ‘क्रेडिट कार्ड’वर आकर्षक सूट दिलेली असते. त्यामुळे साहजिकच त्या बँकेचे ‘क्रेडिट कार्ड’ घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले जाते. या व्यतिरिक्त मोठ्या मॉलच्या (व्यापारी संकुलाच्या) बाहेर, आस्थापनांच्या बाहेर, बँकांमध्ये गेल्यास तेथे ‘क्रेडिट कार्ड’ देणारे ‘एजंट’ (दलाल), बँकेचे कर्मचारी आपल्यामागे सतत ते घेण्यासाठी तगादा लावतात. या ‘क्रेडिट कार्ड’विषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया.

१. ‘क्रेडिट कार्ड’ म्हणजे काय ?

‘क्रेडिट कार्ड’ हे बँकांद्वारे दिले जाणारे एक आर्थिक साधन आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे नसतांनाही खरेदी करू शकता. सोप्या भाषेत सांगायचे, तर हे बँकेने तुम्हाला दिलेले एक अल्प मुदतीचे विनाव्याजी कर्ज असते.

श्री. यज्ञेश सावंत

२. ‘क्रेडिट कार्ड’ कशासाठी वापरतात ?

‘क्रेडिट कार्ड’चा वापर प्रामुख्याने खालील गोष्टींसाठी केला जातो :

अ. दैनंदिन खरेदी ज्यामध्ये घरातील साहित्य, कपडे किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्यासाठी केला जातो. वीज, पाणी आणि भ्रमणभाष यांचे देयक किंवा विम्याचे हप्ते भरण्यासाठी केला जातो.

आ. विमान किंवा रेल्वे यांची प्रवास देयके आणि हॉटेलमध्ये आरक्षण (बुकींग) करण्यासाठी होतो.

इ. मोठ्या खरेदीसाठी उदाहरणार्थ एखादी महागडी वस्तू घ्यायची असेल, तर तिचे रूपांतर सोप्या हप्त्यांमध्ये करण्यासाठी.

ई. आपत्कालीन स्थितीच्या वेळी, म्हणजे अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय व्ययासाठी किंवा पैशांची आवश्यकता असल्यास याचा वापर होतो.

३. ‘नो कॉस्ट ई.एम्.आय.’ आणि ‘क्रेडिट कार्ड’ यांचा सापळा

‘नो कॉस्ट ई.एम्.आय.’ हा एक असा फसवणुकीचा प्रकार आहे, जो बहुतेक ‘क्रेडिट कार्ड’ देणारी आस्थापने करतात. (‘नो कॉस्ट ई.एम्.आय.’, म्हणजे कोणतेही अतिरिक्त व्याज किंवा शुल्क न भरता केवळ  वस्तूची किंमत हप्त्यांमध्ये भरत आहात; पण कंपन्या हे व्याज इतर ‘ऑफर्स’ (प्रस्ताव) किंवा उत्पादनाच्या मूळ किमतीत समायोचित (ॲडजस्ट) करतात.) बँकांची सुप्त इच्छा असते की, तुमचा ‘ई.एम्.आय.’ चुकावा, जेणेकरून त्यांचे उत्पन्नाचे इतर मार्ग मोकळे होतील.

‘क्रेडिट कार्ड’वरील ‘ई.एम्.आय.’, म्हणजे ‘इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट’ (समान मासिक हप्ता), ज्यात तुम्ही मोठी खरेदीची परतफेड एकाच वेळी न करता ठराविक कालावधीसाठी (उदाहरणार्थ ३ ते २४ मास) छोट्या मासिक हप्त्यांमध्ये विभागून करू शकता, ज्यामुळे व्यय व्यवस्थापित करणे सोपे होते; यात मुद्दल आणि व्याज दोन्ही समाविष्ट असतात अन् प्रक्रिया शुल्कसुद्धा लागू शकते.

बँक तुम्हाला ‘क्रेडिट कार्ड’ घेण्यासाठी जेवढा आग्रह धरते, ते काही कारणाविना नसते. तिथे बँक तुम्हाला सर्वकाही विनामूल्य देऊ शकते का ? तुमची खरेदी करण्याची क्षमता वाढवून त्यांनी व्यक्तीची सवय बिघडवली आहे, जेणेकरून तुम्ही अशा गोष्टीसुद्धा खरेदी करता, ज्या तुम्ही करायला नको होत्या. ‘आयफोन’चे मूल्य १ लाख रुपयांहून अधिक असते; मात्र ‘नो कॉस्ट ई.एम्.आय.’चा भूलभूलय्या असा असतो की, त्यामुळे २० सहस्र ते ३० सहस्र रुपये वेतन असलेला माणूससुद्धा आज ‘ई.एम्.आय.’वर ‘आयफोन’ खरेदी करत आहे. यात व्यक्ती पिचला जात असल्याने शेवटी ‘नो कॉस्ट ई.एम्.आय.’विषयी रिझर्व्ह बँकेला एक नोटीस जारी करावी लागली.

४. कर्जाचा सापळा

आर्थिक क्षमता अधिक नसतांना ‘क्रेडिट कार्ड’द्वारे व्यक्ती महागडी वस्तू खरेदी करून ती व्यक्ती कर्जाच्या सापळ्यात एक प्रकारे अडकली जाते. याला जाणीवपूर्वक ‘नो कॉस्ट ई.एम्.आय.’, असे नाव दिले आहे. याला कधीही ‘व्याजमुक्त ई.एम्.आय.’ म्हटले जात नाही. आपण बँकेचा वापर पैसे काढण्यासाठी, जमा करण्यासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी करतो. बँकेत जावे लागू नये; म्हणून डेबिट कार्ड (डेबिट कार्ड, म्हणजे एक बँक कार्ड जे तुमच्या बँक खात्याला थेट जोडलेले असते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या खात्यातील उपलब्ध पैशांमधून रोख रक्कम काढू शकता किंवा वस्तू खरेदी करू शकता) उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही खरेदी करायचे असेल, तर अल्प मुदतीच्या रोख कर्जासाठी ‘क्रेडिट कार्ड’ उपलब्ध असतात. हे सर्वांना दिले जात नाही, तर केवळ अशाच लोकांना दिले जाते, ज्यांच्यावर बँकेचा विश्वास आहे, जे लोक प्रतिमास काम करून वेतन मिळवतात.

५. बँकेकडून कर्ज घेण्यातील क्लिष्टता आणि पर्याय !

लोक त्यांचे पैसे बँकेत जमा करतात आणि बँक तेच पैसे कर्ज म्हणून देते अन् त्यावर व्याज कमावते. व्याज हा बँकांसाठी पैसे कमावण्याचा मुख्य मार्ग आहे. म्हणूनच जितके अधिक लोक कर्ज घेतील, तितका बँकेला लाभ होईल. बँकेकडून कर्ज घेणे, ही एक अत्यंत जटिल प्रक्रिया आहे. आपल्याला वारंवार बँकेत जावे लागते, स्वतःच्या माहितीची बँकेकडून निश्चिती (व्हेरिफिकेशन) केली जाते, ‘कॅन्सल चेक’ (रहित केलेला धनादेश) द्यावे लागतात. म्हणूनच व्यक्ती जेव्हा मोठी अडचण असते, तेव्हाच कर्ज घेतो. म्हणूनच बँकेने ‘क्रेडिट कार्ड’ द्यायला प्रारंभ केला, जे कर्जाचे एक छोटे स्वरूप आहे आणि ते मिळवणे अत्यंत सोपे आहे. बँकेने आपल्या विश्वासू ग्राहकांना एक सोपे डिजिटल कार्ड दिले आहे, जेणेकरून लोकांच्या सवयी बिघडतील; कारण जेव्हा कुणी व्यक्ती ‘क्रेडिट कार्ड’ घेते, तेव्हा त्याला आपण कर्ज घेत आहोत, असे वाटत नाही. त्यांना वाटते की, हे आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक आहे, म्हणून व्यक्ती ते जवळ ठेवतो.

६. ‘क्रेडिट कार्ड’च्या आकर्षक सवलती

‘क्रेडिट कार्ड’ घेताच बँक आकर्षक सवलती (ऑफर्स) देऊ लागते. ‘५० दिवस बिनव्याजी कर्ज आणि वर्षभर ‘ई.एम्.आय.’ भरत रहा’, अशा या सवलती असतात. ‘कॅशबॅक’ (काही पैसे परत मिळणे), ‘रिवॉर्ड पॉईंट्स’ (खरेदीवर बक्षिसी गुण), चित्रपटाचे विनामूल्य तिकीट, ‘नो कॉस्ट ई.एम्.आय.’ इत्यादी; मात्र याचा विचार करणे आवश्यक नाही का की, बँक सर्वकाही विनामूल्य का देत आहे ? १ लाख रुपयांचा ‘आयफोन’ तुम्हाला वर्षभरासाठी कोणत्याही व्याजाविना का दिला जातो ? यात त्यांचा काय लाभ ? कर्मचारी आणि विज्ञापने यांवर व्यय केल्यानंतर बँक काही समाजसेवा करत नाही. जोपर्यंत बँक स्वत: कमावत नाही, तोपर्यंत ती ग्राहकाला काहीही देणार नाही.

७. अधिकाधिक खरेदी करण्यासाठी वेळ

या सर्व गोष्टींसाठी लागणारे पैसे तुमच्याच खिशातून काढले जातात. ‘क्रेडिट कार्ड’ वापरण्याचे काही नियम असतात, ज्याला बँकेने ‘क्रेडिट कार्ड सायकल’, असे नाव दिले आहे. समजा, एखाद्या कार्डची सायकल १ मार्च ते १ एप्रिल असेल, तर १ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत आपण खरेदी केलेल्या सर्व खरेदीचे देयक २ एप्रिल या दिवशी सिद्ध होईल आणि आपण ते २० दिवसांनी भरू शकतो. याचाच अर्थ २ मार्चला काही खरेदी केली, तर आपल्याला पैसे भरण्यासाठी ४७ दिवस मिळतात. बँक आपल्याला हा वेळ देते; कारण या काळात आपण अधिकाधिक खरेदी करावी आणि आपल्या प्रत्येक व्यवहाराचा बँकेला लाभ व्हावा.

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

(क्रमश : पुढच्या रविवारी)

– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (१०.१.२०२६)


लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1001360.html