सध्या ‘ऑनलाईन’ खरेदीचे प्रमाण सर्वाधिक आहे. वेगवेगळ्या ‘ई-कॉमर्स’ (व्यापारी ऑनलाईन) संकेतस्थळाद्वारे आकर्षक ‘ऑफर’ (सवलती) दिल्या जातात आणि त्यामध्ये सर्वाधिक सूट या ‘क्रेडिट कार्ड’द्वारे केलेल्या खरेदीवर दिली जाते. आपल्याकडे एखाद्या बँकेचे ‘क्रेडिट कार्ड’ असेल, तर त्या व्यतिरिक्त अन्य बँकेच्या ‘क्रेडिट कार्डव’र आकर्षक सूट दिलेली असते. त्यामुळे साहजिकच त्या बँकेचे ‘क्रेडिट कार्ड’ घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले जाते. या व्यतिरिक्त मोठ्या मॉलच्या (व्यापारी संकुलाच्या) बाहेर, आस्थापनांच्या बाहेर, बँकांमध्ये गेल्यास तेथे ‘क्रेडिट कार्ड’ देणारे ‘एजंट’ (दलाल), बँकेचे कर्मचारी आपल्यामागे सतत ते घेण्यासाठी तगादा लावतात. या ‘क्रेडिट कार्ड’विषयीची माहिती या लेखातून जाणून घेत आहोत.
१८ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘‘क्रेडिट कार्ड’ म्हणजे काय ?, ते कशासाठी वापरतात ? ‘नो कॉस्ट ई.एम्.आय.’ आणि ‘क्रेडिट कार्ड’ यांचा सापळा, अन् ‘क्रेडिट कार्ड’च्या आकर्षक सवलती’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/998841.html

८. ‘नेटवर्क’ आस्थापनांचा बँकिंग व्यवहारात प्रवेश

हा खेळ समजून घेण्यासाठी आपल्याला ‘नेटवर्क आस्थापन’ समजून घ्यावे लागेल. ‘व्हिसा’, ‘मास्टरकार्ड’, ‘अमेरिकन एक्सप्रेस’ इत्यादी ‘नेटवर्क आस्थापने’ आहेत आणि भारतातील ‘नेटवर्क’ आस्थापनाचे नाव ‘रुपे’ (RuPay) आहे. पूर्वी ज्या बँकेचे ‘ए.टी.एम्. कार्ड’ असायचे, त्याच बँकेच्या ‘ए.टी.एम्.’मधून पैसे काढता येत असत. बँका एकमेकांची माहिती एकमेकांना देण्यास (डेटा ‘शेअर’ करण्यास) सिद्ध नसत. येथे ‘नेटवर्क’ आस्थापनांनी मध्यस्थ म्हणून भूमिका बजावली. त्यांनी बँकांना सांगितले, ‘डेटा आम्हाला द्या, आम्ही तो सुरक्षित ठेवू आणि पडताळणी करू.’ यामुळेच आज तुम्ही कोणत्याही बँकेच्या कार्डने कोणत्याही ‘ए.टी.एम्.’मधून पैसे काढू शकता.
९. नेटवर्क आस्थापने आणि बँका यांचे अर्थकारण
जेव्हा आपण ‘क्रेडिट कार्ड’ने खरेदी करतो, तेव्हा ४ घटक सहभागी असतात, १. ‘नेटवर्क’ आस्थापन २. देणारी बँक (ज्याचे कार्ड तुमच्याकडे आहे), ३. ‘ॲक्वायरिंग बँक’ (ज्याचे यंत्र दुकानदाराकडे आहे) आणि ४. दुकानदार
समजा आपण १०० रुपयांची वस्तू घेतली. ‘इश्यूअर बँक’ (ग्राहकाची देणारी बँक) ‘ॲक्वायरिंग बँके’ला ९८ रुपये देते आणि स्वतः २ रुपये ठेवते. ‘ॲक्वायरिंग बँक’ ९८ रुपयांपैकी ९७ रुपये दुकानदाराला देते आणि १ रुपया स्वतःकडे ठेवते (ज्यातून ५० पैसे नेटवर्क आस्थापनाला दिले जातात). अशा प्रकारे तुमच्या १०० रुपयांच्या व्यवहारातून कार्ड देणार्या बँकेने २ रुपये कमावले. म्हणूनच दुकानदार ‘क्रेडिट कार्ड’वर अधिक पैसे मागतात किंवा मॉलमध्ये आधीच किंमत वाढवून लावलेली असते. म्हणूनच ‘व्हिसा’ आणि ‘मास्टरकार्ड’ ही आस्थापने वेगाने वाढत आहेत.
१०. ‘नो कॉस्ट ई.एम्.आय.’चे छुपे सत्य !

‘नो कॉस्ट ई.एम्.आय.’मध्ये अनेक गोष्टी ग्राहकांपासून लपवल्या जातात. ‘व्याजमुक्त’ म्हटल्यास बँक न्यायालयात कायदेशीररित्या चुकीची ठरू शकते, म्हणून याला ‘नो कॉस्ट’ असे गोंडस नाव दिले आहे.
अ. विक्री वाढवणे : ‘ई.एम्.आय.’मुळे (‘इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट’ (समान मासिक हप्त्यामुळे)) लोकांची खरेदी क्षमता वाढते. जेव्हा आस्थापन ३० सहस्र रुपये कमावत होते, तिथे आता ते ५० सहस्र रुपये कमावते; कारण ई.एम्.आय.मुळे लोकांची खरेदी करण्याची वृत्ती वाढते. विक्री वाढली की, आस्थापने बँकेला अधिक ‘कमिशन’ (दलाली) देतात.
आ. ‘लोन प्रोसेसिंग फी’ (कर्ज प्रक्रिया शुल्क) : आपल्याला व्याजाविषयी सांगितले जात नाही; पण छुप्या स्वरूपात ‘लोन प्रोसेसिंग फी’ घेतली जाते, जी आपल्या देयकात दिसते.
इ. सवलती रहित होणे : ‘ई.एम्.आय.’चा पर्याय निवडताच वस्तूवर मिळणार्या इतर रोख सवलती रहित होतात.
ई. ‘जी.एस्.टी.’ (वस्तू आणि सेवा कर) : व्याजाच्या रकमेवर ‘जी.एस्.टी.’ द्यावा लागतो, जो ग्राहकालाच भरावा लागतो. हे तुम्हाला देयक पाहिल्यावर समजते.
काही आस्थापने प्रारंभीचे ६ मास व्याज घेत नाहीत; पण उर्वरित ६ मासांसाठी व्याजाचा दर दुप्पट करतात. थोडक्यात ‘नो कॉस्ट ई.एम्.आय.’ हा जुना आणि न विकला जाणारा माल ग्राहकांच्या माथी मारण्याचा एक मार्ग आहे.
‘क्रेडिट कार्ड’ म्हणजे आधुनिक काळातील सावकार !

‘क्रेडिट कार्ड’ हे आजच्या काळातील आधुनिक सावकार आहे. जर आपण ‘ई.एम्.आय.’ भरण्यास चुकलो, तर त्यावर प्रत्येक मासाला २ ते ३ टक्के दंड लागतो, जो वर्षाला २४ ते ३६ टक्के होतो. जर तुम्ही १ दिवस जरी विलंब केला, तर बँक १ दिवसाचे नाही, तर पूर्ण ४५ दिवसांचे व्याज आकारते. जुन्या चित्रपटांमध्ये सावकार गरिबांच्या भूमी गहाण ठेवून त्यांना आयुष्यभर गुलाम बनवायचा, ‘क्रेडिट कार्ड’ हे त्याचेच आधुनिक स्वरूप आहे, असे लक्षात येते.
– श्री. यज्ञेश सावंत
११. योग्य वापर कसा करू शकतो ?
‘क्रेडिट कार्ड’ने केवळ तेच विकत घ्या, ज्याचे पैसे तुमच्याकडे आधीच उपलब्ध आहेत. समजा आपल्याला दीड लाख रुपयांचा ‘आयफोन’ घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे ते पैसे आहेत, तर कार्डने खरेदी करून ते पैसे ५० दिवसांसाठी मुदत ठेवीमध्ये (एफ्.डी.मध्ये) ठेवू शकता, त्या व्याजातून तुमची किंमत काही प्रमाणात न्यून होईल.
नेहमी पूर्ण पैसे चुकते करावेत, कधीही ‘किमान रक्कम’ भरण्याच्या सापळ्यात अडकू नये. जर आपण आधीच या सापळ्यात अडकलो असू, तर मोठ्या, म्हणजेच ३६ टक्के व्याजाचे ‘क्रेडिट कार्ड’ देयक भरण्यासाठी १४ ते १५ टक्के दराचे ‘पर्सनल लोन’ (वैयक्तिक कर्ज) घेऊ शकतो किंवा अन्य उपलब्ध स्रोतांतून पैसे भरू शकतो; कारण ‘किमान रक्कम’ भरून स्वतःचे कर्ज कधीच संपणार नाही. कोणतेही कर्ज (कार, घर किंवा वैयक्तिक) संपवण्याआधी ‘क्रेडिट कार्ड’चे कर्ज संपवणे आवश्यक असते; कारण त्याचे व्याज सर्वांत अधिक असते.
१२. ‘क्रेडिट कार्ड’चे काही लाभ
जर ‘क्रेडिट कार्ड’चा वापर शिस्तबद्ध पद्धतीने केला, तर त्याचे काही लाभ होतात.
अ. ‘क्रेडिट कार्ड’वर तुम्हाला साधारणपणे ४५ ते ५० दिवसांचा व्याजमुक्त कालावधी मिळतो, म्हणजे आज व्यय केलेले पैसे आपण दीड मासानंतर परत करू शकतो, त्यावर कोणतेही व्याज लागत नाही.
आ. ‘क्रेडिट स्कोअर’ (CIBIL Score – पतमानांकन) सुधारतो : वेळेवर देयक भरल्यामुळे स्वतःचा ‘सिबिल स्कोअर’ सुधारतो, ज्यामुळे भविष्यात गृहकर्ज किंवा इतर कर्जे सहज आणि अल्प व्याजदरात मिळतात.
इ. विनामूल्य विमा : अनेक ‘क्रेडिट कार्ड’सह अपघाती विमा किंवा विमानातून प्रवासाचा विमा (एअर ट्रॅव्हल इन्शुरन्स) विनामूल्य मिळतो.
ई. ‘लाउंज’मध्ये प्रवेश : ‘प्रीमियम क्रेडिट कार्ड’वर विमानतळावरील ‘लाउंज’मध्ये (बसण्यासाठी विशेष कक्ष) विनामूल्य प्रवेश मिळतो, जिथे तुम्ही आरामात बसून जेवण आणि विश्रांती घेऊ शकता.
थोडक्यात सांगायचे, तर ‘क्रेडिट कार्ड’ हे एक ‘दुधारी शस्त्र’ आहे. जर तुम्ही शिस्तबद्ध असाल आणि प्रत्येक मासाला पूर्ण देयक भरू शकत असाल, तरच त्याचा वापर करणे लाभदायक ठरते, अन्यथा या आधुनिक सावकाराच्या पाशात अडकणे अटळ !
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
(समाप्त)
– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (१०.१.२०२६)
‘क्रेडिट कार्ड’ कधी वापरू नये?
१. पेट्रोल पंपावर (जिथे १ टक्का शुल्क आणि ७.२ टक्के ‘जी.एस्.टी.’ लागतो)
२. रेल्वेच्या ‘आय.आर्.सी.टी.सी.’ या संकेतस्थळावर तिकीटाचे आरक्षण करतांना
३. ‘पे.टी.एम्.’, ‘ॲमेझॉन पे’ यांसारख्या वॉलेटमध्ये पैसे भरतांना.
४. विमा किंवा भारतीय जीवन बीमा निगम (एल्.आय.सी.) यांचा हप्ता (प्रीमियम) भरण्यासाठी.
५. धनादेश किंवा रोखीने ‘क्रेडिट कार्ड’चे देयक भरण्यासाठी (३०० ते ५०० रुपये अतिरिक्त पैसे भरावे लागतात)
– श्री. यज्ञेश सावंत
संपादकीय भूमिका‘क्रेडिट कार्ड’ म्हणजे आधुनिक काळातील ‘सावकार’ असल्याने ग्राहकांनी त्याचा वापर सावधगिरीने करणे आवश्यक ! |
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !