Bangladesh Hindu Murder : बांगलादेशात ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या माजी पदाधिकार्‍याने हिंदु तरुणाला गाडीखाली चिरडून ठार मारले !

हत्या झालेला हिंदू तरुण रिपन साहा (वर्तुळात)

ढाका (बांगलादेश) : बांगलादेशातील राजबाडी जिल्ह्यातील सदर उपजिल्ह्यात रिपन साहा या हिंदु तरुणाची मुसलमानांकडून हत्या करण्यात आली. रिपन येथे पेट्रोल पंपावर काम करत होता. इंधनाचे पैसे मागितल्यामुळे वाहनचालकाने पैसे देण्याऐवजी रिपन याला गाडीखाली चिरडले. पोलिसांनी संबंधित वाहन जप्त केले असून त्याचा मालक अबुल हाशेम याला अटक केली आहे. तो ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या राजबाडी जिल्हा घटकाचा माजी कोषाध्यक्ष असल्याचे सांगितले जात आहे. वाहनचालक कमाल हुसेन यालाही कह्यात घेण्यात आले आहे.

रिपन साहा राजबाडीतील गोलांदा मोड येथे असलेल्या करीम फिलिंग स्टेशनवर काम करत होता. काळ्या रंगाच्या लँड क्रूझर गाडीने पेट्रोल भरून पैसे न देता निघून जाण्याचा प्रयत्न केला. रिपन साहा याने गाडी अडवून पेट्रोलचे पैसे मागितले असता चालकाने मुद्दाम गाडी पुढे नेली आणि त्याला चिरडले. यात रिपन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आरोपी वाहनासह पळून गेले.

अपघात नव्हे, तर जाणीवपूर्वक केलेली हत्या !

राजबाडी सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी खोंदकार जियाउर रहमान यांनी घटनेला दुजोरा देतांना ‘ही घटना अपघात नसून जाणीवपूर्वक केलेली हत्या आहे’, असे सांगितले. पेट्रोलचे पैसे न दिल्यामुळे पीडित गाडीसमोर उभा होता आणि त्याच वेळी त्याला चिरडण्यात आले.

संपादकीय भूमिका

बांगलादेशात १२ फेब्रुवारीला होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ सत्तेत येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच पक्षाच्या लोकांकडून हिंदूंच्या हत्या होत आहेत. सत्तेवर आल्यावर काय होणार आहे ?, हे यावरून लक्षात येते !