इस्रायलचे पुढील लक्ष्य पाकिस्तान ! – Najam Sethi

पाकिस्तानचे राजकीय विश्‍लेषक नजम सेठी यांचा दावा

नजम सेठी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – इराणमधील अस्थिरतेचा लाभ घेत अमेरिका आणि इस्रायल यांच्याकडून इराणवर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. या संघर्षात इस्रायलचे पुढचे लक्ष्य पाकिस्तान असू शकतो, असा दावा पाकिस्तानचे प्रसिद्ध राजकीय विश्‍लेषक नजम सेठी यांनी केला आहे.

इराणमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पाकिस्तान लक्ष्य

सेठी यांनी पाकमधील ‘दुनिया न्यूज’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अनेकदा उघडपणे सांगितले आहे की, त्यांना कोणत्याही इस्लामी देशाकडे अण्वस्त्रे असलेली आवडत नाहीत. जरी पाकिस्तानचे अण्वस्त्र कार्यक्रम प्रामुख्याने भारताला केंद्रस्थानी ठेवून आखलेले असले, तरी जागतिक स्तरावर पाकिस्तानवर सतत दबाव टाकला जात आहे. इराणमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्यास इस्रायल त्याचे लक्ष पाकिस्तानच्या अण्वस्त्रांंकडे वळवू शकतो, अशी भीती सेठी यांनी व्यक्त केली आहे.

पाक भारताविरोधात अण्वस्त्रांचा वापर करू शकतो !

सेठी यांनी पुढे म्हटले की, पाकिस्तान पारंपरिक युद्धात भारताचा सामना करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. भारताच्या वाढत्या सैनिकी शक्तीमुळेच पाकिस्तानने अद्याप अण्वस्त्रांच्या ‘नो फर्स्ट यूज’ (प्रथम वापर करणार नाही) या धोरणावर स्वाक्षरी केलेली नाही. जर भारताने पारंपरिक पद्धतीने आक्रमण केले, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी पाकिस्तान अण्वस्त्रांंचा वापर करण्याच्या मानसिकतेत आहे.

पाक आखाती देशांना देऊ शकतो अण्वस्त्र तंत्रज्ञान

पाकिस्तान त्याचे अण्वस्त्र तंत्रज्ञान आखाती देशांना देऊ शकतो, अशी भीती पाश्‍चिमात्य देशांना आणि इस्रायलला वाटत आहे. यामुळेच पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर आंतरराष्ट्रीय संघटनांचे बारीक लक्ष आहे.