आज (पौष कृष्ण एकादशी) ‘मकरसंक्रांत’ आहे. त्या निमित्ताने…

१. ‘मकरसंक्रांती’ची तिथी
‘मकरसंक्रात’ हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक (अयनकाळ म्हणजे दक्षिणायण आणि उत्तरायण हा ६ महिन्यांचा कालावधी) आहे. या दिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते. प्रतिवर्षी मकरसंक्रांत १४ जानेवारीला असते. या दिवशी सूर्य विषुववृत्ताकडून मकरवृत्ताकडे प्रयाण करतो. त्यामुळे उत्तरायणाला प्रारंभ होतो.
२. संक्रांती आणि किंक्रांती या जुळ्या देवींची निर्मिती होणे
सत्ययुगाच्या प्रारंभी जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करत होता, तेव्हा दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी संकरासुर आणि किंकरासुर या जुळ्या दैत्यांना सूर्याचा मार्ग अवरुद्ध करण्यासाठी पाठवले. हे दोन्ही दैत्य अत्यंत बलशाली आणि पराक्रमी होते. त्यांना रोखण्यात इंद्रादिक देवता निष्फळ ठरल्या. तेव्हा मोठ्याने विजा कडाडल्याचा आवाज झाला आणि शिवाच्या घामातून एक प्रकारची सात्त्विक मारक शक्ती प्रगट झाली. तिच्याकडे दैवी बळ आणि शिवाचे पाशुपतास्त्र होते. त्यानंतर या शक्तीने देवीचे रूप धारण केले आणि ती सूर्यदेवाच्या जवळ आली. तेव्हा तिच्यावर सूर्यकिरण पडल्यामुळे तिच्या देहाची सावली भूमीवर पडली. या सात्त्विक देवीच्या सावलीतून काळसर रंगाची एक तमोगुणी शक्ती प्रगट झाली आणि तिने काळसर कांती असलेल्या एका तामसिक देवीचे रूप धारण केले. सात्त्विक देवीने संकरासुर आणि तामसिक देवीने किंकरासुर यांच्याशी युद्ध करून या दोन्ही दैत्यांना ठार केले. त्यामुळे सूर्याच्या मार्गातील अडथळा दूर होऊन सूर्याला सहजरित्या मकर राशीत प्रवेश करता आला. त्यामुळे सर्व देवतांनी हा विजयोत्सव ‘मकरसंक्रांत’ या नावाने साजरा केला. सूर्यनारायणाने या दोन्ही देवींचे ‘संक्रांतीदेवी’ आणि ‘किंक्रांतीदेवी’ असे नामकरण केले. तेव्हा अन्य देवदेवतांनी या दोन्ही देवींवर दैवी पुष्पवृष्टी करून त्यांना ओवाळले आणि त्यांच्या गळ्यात पुष्पमाला घालून अन् मंगल वाद्ये वाजवून त्यांचा सन्मान केला.
३. संक्रांती आणि किंक्रांती या देवींची आध्यात्मिक वैशिष्ट्ये अन् महत्त्व !

टीप १ : संक्रांतीदेवीने तिच्या हातातील त्रिशूळाने संकरासुराच्या देहाचे अवयव छाटले आणि त्यानंतर त्याच्यावर पाशुपतास्त्र अन् सूर्यास्त्र ही अस्त्रे सोडून त्याचे प्राणहरण केले. किंक्रांतीदेवीने तिच्या हातातील खड्गाने किंकरासुराच्या देहाचे अवयव छाटले आणि त्यानंतर त्याच्यावर पाशुपतास्त्र अन् सूर्यास्त्र ही अस्त्रे सोडून त्याचे प्राणहरण केले.
टीप २ : संक्रांतीदेवी सत्त्वप्रधान असल्यामुळे ती सत्त्वगुणवर्धिनी आहे. त्यामुळे संक्रांतीची तिथी शुभ मानली जाते. किंक्रांतीची तिथी किंवा करिदिन, म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस असतो. या दिवशी किंक्रांतीदेवीने किंकरासुराला ठार मारले. किंक्रांतीदेवी तमोगुणी आहे. त्यामुळे किंक्रांतीच्या दिवशी वातावरणात तमोगुण वाढलेला असतो; म्हणून किंक्रांतीची तिथी ‘सण’ म्हणून साजरी केली जात नाही. उलट हा दिवस अशुभ मानला जातो.
४. शिवकृपेमुळे संक्रांती आणि किंक्रांती देवी शांत होणे

दैत्यांचा वध केल्यानंतरही संक्रांतीदेवी आणि किंक्रांतीदेवी शांत होत नव्हत्या आणि सर्वत्र विनाश करत होत्या. त्यामुळे श्री गणेशाने त्यांना पाशामध्ये बांधले आणि शिवाने संक्रांतीला स्वतःच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या नखात स्थान दिले, तसेच किंक्रांतीला शिवाने त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या खाली दाबून ठेवले. अशा प्रकारे संक्रांती आणि किंक्रांती या दोन्ही देवी शांत झाल्या.
५. ‘मकरसंक्रांत’ या सणाचे महत्त्व
सूर्याच्या संक्रमणानुसार ‘दक्षिणायन’ आणि ‘उत्तरायण’ असे दोन ‘अयन’ काळ असतात. भारतीय कालगणनेनुसार संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते.
६. संक्रांतीचा सण साजरा करण्याची पद्धत आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !
६ अ. पाच सुगडांचे पूजन करून त्यांचे दान करण्यामागील अध्यात्मशास्त्र ! : ‘संक्रांतीच्या सणात ‘सुगड’ वापरले जाते. ‘सुगड’ म्हणजे मातीचे छोटे मडके.(छायाचित्र पुढे दिले आहे) सुगडांना बोटांनी हळद-कुंकू लावून दोरा गुंडाळतात. त्यामुळे सुगडांवर लावलेल्या हळदीमध्ये संक्रांतीदेवीच्या तारक आणि कुंकवामध्ये मारक शक्तीच्या लहरी आकृष्ट होतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे (कांड्या), शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, हळदी-कुंकू इत्यादी भरतात. त्यामुळे सुगडात सात्त्विक लहरी कार्यरत होतात. भूमीवर रांगोळी काढून त्यावर पाट मांडतात. त्या पाटावर पाच सुगड ठेवून त्यांचे पूजन करतात. त्यामुळे सुगडांमधून संक्रांतीदेवीच्या तारक आणि मारक शक्तीच्या संमिश्र लहरी वातावरणात प्रक्षेपित होऊन घरातील वातावरणाची शुद्धी होते अन् घरातील वातावरण सात्त्विक आणि साधनेसाठी पोषक बनते. त्यानंतर पूजन केलेल्या ५ सगुडांपैकी ३ सुगड सुवासिनींना दान (वाण) देतात. त्यामुळे सुवासिनींमध्ये श्री दुर्गादेवीचे तारक तत्त्व जागृत होऊन दान देणार्या स्त्रीला श्री दुर्गादेवीचे कृपाशीर्वाद लाभतात. त्यानंतर एक सुगड तुळशीजवळ ठेवतात. त्यामुळे या सुगडामध्ये श्रीविष्णुतत्त्वाच्या आशीर्वादाच्या लहरी कार्यरत होऊन घराभोवती श्रीविष्णूच्या चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होते. त्यानंतर शेष सुगड व्यक्ती स्वतःसाठी ठेवते. त्यामुळे तिच्याभोवती संक्रांतीदेवीच्या तारकशक्तीचे चैतन्यमय संरक्षककवच निर्माण होते.

६ आ. मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तीळगूळ देण्याचे आणि तिळाचा विविध प्रकारे उपयोग करण्यामागील आध्यात्मिक महत्त्व !
६ आ १. संक्रांतीला पांढर्या रंगाच्या तिळाचा उपयोग केल्याने व्यक्तीचे पापक्षालन होणे : तीळ रज-तम लहरी स्वतःकडे खेचून सत्त्वलहरींचे प्रक्षेपण करतात. त्यामुळे तिळाचा उपयोग केल्याने व्यक्तीतील रज-तमात्मक पापाच्या लहरी नष्ट होतात. या दिवशी ‘तिळाचे तेल आणि उटणे अंगाला लावणे, तीळमिश्रित जलाने स्नान करणे, तीळमिश्रित पाणी पिणे, तीळहोम करणे अन् तिळाचे दान करणे’, या पद्धतीने तिळाचा उपयोग करणार्यांची सर्व पापे नष्ट होतात.
६ आ २. तीळगूळ खाण्याचे आणि एकमेकांना देण्याचे आयुर्वेद अन् अध्यात्म या दोन्ही शास्त्रांनुसार असलेले महत्त्व ! : पांढर्या तिळात सत्त्वलहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्याने तीळगुळाचे सेवन केल्याने व्यक्तीतील रज-तम लहरी न्यून होऊन सात्त्विक लहरी वाढतात. त्यामुळे अंतःशुद्धी होऊन साधना चांगली होण्यास साहाय्य होते. त्याचप्रमाणे पांढर्या तिळाच्या सेवनामुळे देहाची उष्णता वाढते. त्यामुळे आयुर्वेदानुसार हिवाळ्यात येणार्या संक्रांतीला तीळ खाणे लाभदायक असते. तीळगूळ एकमेकांना वाटल्याने सात्त्विकतेचे आदान-प्रदान होते आणि एकमेकांशी स्नेहाचे नाते निर्माण होते.
६ इ. एकमेकींना वाण देणे : संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदीकुंकवाचा समारंभ करून विविध वस्तूंचे दान करतात. त्याला ‘वाण देणे’, असे म्हणतात. एकमेकींना प्लास्टिकच्या वस्तू, उदा. चमचे, कंगवे, डबे इत्यादी मायेतील आणि असात्त्विक वाण देण्यापेक्षा धार्मिक ग्रंथ, देवतांची चित्रे, देवतांच्या नामपट्ट्या इत्यादी सात्त्विक वस्तू ‘वाण’ म्हणून देऊ शकतात. त्यामुळे वाण देणारा आणि घेणारा या दोघांनाही संक्रांतीदेवीचे कृपाशीर्वाद लाभतात.
७. संक्रांत आणि किंक्रांत या दिवशी कोणती कर्मे करू नयेत ?
संक्रांतीच्या पर्वकाळात वृक्ष तोडणे, गवत कापणे, कठोर बोलणे इत्यादी कृती करणे टाळावे. जर या दोन दिवशी कुणी निषिद्ध असणारी कर्मे केली, तर त्यांना संक्रांतीदेवीचा शाप लागतो आणि मृत्यूत्तर नरकात जावे लागते.
८. श्री गुरुचरणी कृतज्ञता
‘श्री गुरुदेवांच्या कृपेने ‘मकरसंक्रांत’ या सणाचे महत्त्व समजले’, याबद्दल मी श्री गुरुचरणी लक्ष लक्ष वेळा कृतज्ञतापुष्पे समर्पित करते.’
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(८.११.२०२५)
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !