१ ते ४ जानेवारी या कालावधीत सातारा येथे पार पडलेल्या ९९ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चा गोषवारा…
गेल्या २ दशकांपासून पुरोगामीत्वाची झूल पांघरलेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’ने ९९ व्या संमेलनात निश्चित कात टाकली. या संमेलनात दिंडी आणि प्रत्यक्ष विविध कार्यक्रमांमधून संत साहित्याचा गौरव, इतिहासाचा जागर, शिवछत्रपतींचा कार्याचा गौरव निश्चित सुखावणारा होता; मात्र ‘श्री सरस्वतीपूजन न होणे, पुरोगामी विचारवंतांना (?) अकारण मानाचे स्थान आणि मराठीसाठी ठोस कृतीशीलतेचा अभाव’, या गोष्टी मात्र प्रकर्षाने या संमेलनात जाणवल्या. जवळपास २ दशकांनंतर संमेलनाला मराठी आणि इतिहास यांवर ठामपणे अन् ठोस भूमिका मांडणारे संमेलनाध्यक्ष ‘पानिपतकार’ विश्वास पाटील मिळाले, ही संमेलनातील सर्वांत जमेची बाजू. पुढचे संमेलन हे १०० वे संमेलन असून या चुका सुधारून आतापासूनच संमेलनाने निश्चित दिशा घेऊन प्रयत्न केले, तर पुण्यात होणारे संमेलन हे खरोखरच मराठीजनांना काहीतरी देणारे असेल !
संकलक : श्री. अजय केळकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, कोल्हापूर.

१. श्री सरस्वतीपूजन न करणे अनाकलनीय !
गेल्या काही वर्षांपासून संमेलनात श्री सरस्वतीपूजन करण्यात येत नाही. कुठली तरी संघटना येते, कुठला तरी लोकप्रतिनिधी श्री सरस्वतीपूजन अयोग्य असल्याचे मत व्यक्त करतो आणि संमेलनाचे संयोजक ते ऐकतात, हे त्याहून अधिक धक्कादायक होते. यंदाच्या संमेलनातही तीच ‘री’ ओढत संयोजकांनी सोयिस्कररित्या ते टाळले. वास्तविकपणे संयोजकांनी ठाम भूमिका घेत श्री सरस्वतीपूजन करणे अपेक्षित होते. आतापर्यंत शासनकर्ते त्या विचारसरणीचे नव्हते. आता केंद्रात अन् राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीकडे झुकणारे सरकार असल्याने संयोजकांना कुणाला तसे घाबरण्याचे काहीच कारण नव्हते.
२. संमेलनाध्यक्षांचा ठामपणा आणि शिवभूपतींचा जागर !

गेले काही दशके संमेलनाचे अध्यक्ष हे पुरोगामी विचारांनी भारलेले आणि ‘मराठी जणू काही पुरोगाम्यांनीच समृद्ध केली’, अशा विचारांचे होते. मग ते सांगलीतील संमेलनाध्यक्ष म.द. हातकणंगलेकर असो वा डॉ. श्रीपाल सबनीस असो आणि या सगळ्याचा परिपाक असलेल्या डॉ. तारा भवाळकर असो वा लक्ष्मीकांत देशमुख असतील. सगळ्यांनी संमेलनाच्या आडून हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांवर तोंडसुख घेण्यात धन्यता मानली. यांतील बहुतांश संमेलनाध्यक्षांनी वर्षभर मराठीसाठी ठोस कृती केल्याचे ऐकिवात नाही. यामुळे संमेलनाची एकूण दिशाच भरकटलेली असायची. गेल्या २ दशकांहून अधिक काळ मराठीसाठी काही न करणारे केवळ तोंडाची वाफ दवडणारे असेच होते. यंदाचे संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी मात्र प्रारंभीपासूनच ठाम भूमिका घेत ज्या राष्ट्रसंत समर्थ रामदासस्वामी यांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला जात होता, तो उदाहरणासहित पहिल्या दिवशीच्या भाषणात मांडला. गड-दुर्गांचे महत्त्व उद्धृत करतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधीची दुरवस्था दूर करण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कुठलाही विषय सामाजिक माध्यमांवर कसा भरकटवला जातो, हे सोदाहरण स्पष्ट करत दैनिकांनी काय आचारसंहिता पाळणे अपेक्षित आहे, याचाही जागर केला.
समर्थ रामदासस्वामी यांच्याविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून गौरवोद्गार !

‘मोगलांच्या सत्तेच्या विरोधात सडेतोड प्रहार करणारे आणि चंचल मनाला उपदेश करणारे राष्ट्रसंत समर्थ रामदासस्वामी यांचे आद्यस्मरण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. देशभर भ्रमंती करून सज्जनगडावर देह ठेवलेल्या समर्थांनी केलेली साहित्यनिर्मिती अनेक शतकांनंतरही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. प्रतिदिनच्या जगण्यातील तत्त्वज्ञासह राष्ट्र उद्धारासाठी समर्थांनी दिलेले योगदान विसरता न येण्यासारखे आहे’, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांच्या भाषणात समर्थ रामदासस्वामी यांच्याविषयी काढले.
– श्री. अजय केळकर

३. ‘अन्न हे अपूर्ण ब्रह्म’सारख्या पुस्तकांवर निरर्थक आणि समाजाला विभागणारे परिसंवाद टाळणे अपेक्षित !
संमेलनात मराठी भाषेवरील आक्रमणे, त्यासाठी करावयाची उपाययोजना, नवीन मराठी लेखकांनी काय करणे अपेक्षित आहे, मराठी समृद्ध होण्यासाठी काय करावे ?, यांसह अन्य विषयांवर प्रकाशझोत टाकणे अपेक्षित असतांना त्यात ‘अन्न हे अपूर्ण ब्रह्म’सारख्या पुस्तकांवर, ज्यातून मराठीजनांना काहीच लाभ नाही, असे निरर्थक परिसंवाद आयोजकांनी टाळणे अपेक्षित आहे. मांसाहार करावा कि शाकाहार ? या गोष्टींची चर्चा आणि या निमित्ताने मांसाहार योग्य कसा ? आणि शाकाहार आमच्यावर थोपवला गेला, अशा चर्चांमुळे अगोदर विभागालेल्या हिंदूंमध्ये भोजनावरून आणखीन विभागलेपणा वाढेल !
४. ‘बोलतो मराठी’ याद्वारे शुद्ध मराठी बोलण्याची स्पर्धा !
मराठी बोलतांना परकीय भाषेतील शब्दांचा आधार न घेता ती पूर्णपणे मराठी बोलली जावी, यासाठी मराठी भाषा विभागाने ‘बोलतो मराठी’ या नावाने १ मिनिटांत मराठी बोलण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या उपक्रमाला भाषाप्रेमी, साहित्यिक आणि विशेषतः शालेय विद्यार्थी यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या निमित्ताने अनेकांना आपल्या बोलण्यात आपण कशा प्रकारे सहज परकीय शब्द वापरतो ?, ते लक्षात आले.
संकलक : श्री. अजय केळकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, कोल्हापूर.
धार्मिक ग्रंथांकडे वाचकांचा ओढा : कथित पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, निधर्मी आणि साम्यवादी यांचा चपराक !

संमेलनात एकूण २६४ हून अधिक ग्रंथप्रदर्शन कक्ष होते. यांपैकी अनुमाने ४० टक्क्यांहून अधिक प्रदर्शनावर संत, महंत, अध्यात्म आणि धर्मविषयक ग्रंथ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ४ दिवसांत ग्रंथ प्रदर्शनात विद्यार्थी, वाचक आणि साहित्यप्रेमी यांनी मोठी गर्दी केली होती. धार्मिक प्रकाशन संस्थेच्या प्रदर्शनात ‘सार्थ ज्ञानेश्वरी’, ‘श्रीचिंतामणी विजय’, ‘सार्थ एकनाथी भागवत’, ‘श्री देवी भागवत’ आदी धाार्मिक ग्रंथ खरेदीसाठी वाचकांनी गर्दी केली होती. मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भ यांसह राज्याबाहेरून आलेल्या प्रकाशकांच्या धार्मिक ग्रंथांना संमेलनाच्या चारही दिवसांत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. धार्मिक विचारधारेमुळे ग्रंथांना पसंती मिळाल्याने प्रकाशक आणि विक्रेते यांच्यात समाधानाचे वातावरण होते. विशेष म्हणजे या प्रदर्शनांकडे तरुणांचाही ओढा दिसून आला. ग्रंथ प्रदर्शनामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची तत्कालीन पत्रे’, ‘समग्र राजवाडे चारित्र्याचे खंड’, ‘सोर्स ऑफ मराठी हिस्ट्री’, ‘इतिहासाचे साक्षीदार’, अशा पुस्तकांना वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला ! सर्वच पुस्तक प्रदर्शनांची विक्री ८ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली.
– श्री. अजय केळकर
संमेलनातील काही स्तुत्य प्रयत्न !
अ. संमेलनस्थळी संत आणि साहित्यिक यांचे विचार, तसेच इतिहास पोचवण्याचा प्रयत्न !





संमेलनस्थळी विविध प्रदर्शन कक्ष, स्टेडियमच्या भिंती, विविध फलक यांच्या माध्यमातून सातार्याचा इतिहास, संतांचे विचार, साहित्यिक यांचे विचार पोचवण्याचा चांगला प्रयत्न करण्यात आला होता. संमेलनाच्या द्वारातून आत गेल्यावर प्रारंभीच ‘साहित्यिक, ऐतिहासिक अणि पर्यटन दालन’ हे सिद्ध केले होते, ज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक चित्रे, त्यांच्या पत्रावरील शिवमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी, विविध गड-दुर्ग, वैशिष्ट्यपूर्ण विहिरी-तलाव, शिरवळ लेणी, शिवमंदिर, सातारा परिसरातील लेणी, तसेच विविध सरदार यांचे वाडे यांची चित्रे आणि त्यांची माहिती देण्यात आली होती.

साहित्य मंडपाच्या सभोवताली जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे अभंग लिहिण्यात आले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे पसायदान, संत तुकाराम यांच्या गाथेचे महत्त्व सांगणारी चित्रे, पंढरपूर येथे जाणारे वारकरी आणि त्या संदर्भातील संत तुकाराम महाराज यांचा अभंग, विविध गड-दुर्ग, साहित्यासाठी योगदान देणारे साहित्यिक जसे बा.सी. मर्ढेकर, कवी कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, विं.दा. करंदीकर यांसारख्या अनेक कवी, साहित्यिक यांची रेखाचित्रे रेखाटून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कविता देण्यात आल्या होत्या. याच समवेत शाहूनगरीचे संस्थापक छत्रपती थोरले शाहू महाराज, सातारा शहराच्या जडणघडणीत ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, अशांचीही विशेष माहिती आणि फलक संमेलनस्थळी लावण्यात आले होते.
आ. दिंडीच्या माध्यमातून संतांच्या विचारांचा जागर आणि इतिहासाचे जतन

संमेलनातील सर्वांत भावणारा कोणता भाग असेल, तर ती संमेलनाच्या पूर्वसंध्येला निघालेली दिंडी. संत आणि अध्यात्म हीच महाराष्ट्राची खरी ओळख असून ती अनेक रथांच्या माध्यमातून नेमकेपणाने मांडण्यात आली होती. यात विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल तो, म्हणजे यात शालेय शिक्षण विभागाचा पुढाकार होता. टाळ-मृदंग घेतलेले वारकरी, देवतांचा नामजप करणारे भाविक, इतिहासाचा जागर, डोक्यावर तुळशी-वृदांवन घेतलेल्या महिला यातून महाराष्ट्राची संस्कृती बिंबवण्यात दिंडी यशस्वी झाली.
इ. मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देणे

संमेलनासाठी माजी संमेलनाध्यक्ष, साहित्यिक आणि जे उपस्थित होते, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देण्याची अत्यंत स्तुत्य कल्पना आयोजकांनी राबवली. या निमित्ताने छत्रपतींचे स्मरण झाले आणि ते सतत होईल ! यासमवेत व्यासपिठापासून अनेक गोष्टींना शिवकालीन आधार देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला गेला.
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?