वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक ९
वास्तूशास्त्राविषयी जाणून घेतांना अगोदरच्या लेखांमध्ये आपण जाणून घेतले की, ‘भूरेव मुख्यं वास्तू’ (संदर्भ : ‘समराङ्गणसूत्रधार’ ग्रंथ), म्हणजेच भूमी हीच मुख्य वास्तू आहे. त्यामुळे भवन उभारण्यापूर्वी भूमी निर्दाेष असणे महत्त्वाचे आहे. त्याचा आकार, वर्ण, प्रत ही भवनाच्या आणि तेथे रहाणार्या व्यक्तींच्या दृष्टीने योग्य असणे आवश्यक आहे. यासाठी भूमीचे प्रकार त्यांची वैशिष्ट्ये, भूमी परीक्षण आणि भूमीची निवड यांविषयी शास्त्रकारांनी सखोल लिखाण केलेले आहे. त्यामध्ये भूमीचे तिच्या गुणांनुसार ४ वर्णांमध्ये विभाजन केले आहे.
मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/993715.html
१. चार वर्ण आणि त्यांचे गुण-कर्म यांविषयीची माहिती सर्वप्रथम आपण ४ वर्णांविषयी जाणून घेऊया.
भगवंताने ‘श्रीमद्भगवद्गीते’मध्ये सांगितले आहे, ‘चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश: ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक १३), म्हणजेच ४ वर्ण (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र) हे गुण अन् कर्म यांनुसार माझ्याद्वारे निर्माण झाले आहेत.
मनुष्याच्या प्रगतीमध्ये या ४ वर्णांचा महत्त्वाचा सहभाग आहे. हे ४ वर्ण जातीव्यवस्थेशी संबंधित नसून गुण आणि कर्म यांवर आधारित आहेत. भगवंताने प्रत्येक वर्णानुसार त्याचे नियम, कर्तव्ये आणि कर्म निश्चित करून दिले आहे. त्यानुसार त्याने आचरण केल्यास त्याला प्रगतीपथावर जाण्यास साहाय्य होते. ही वर्णव्यवस्था समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी नसून समाजव्यवस्थेमध्ये प्रत्येकाच्या गुणकर्मानुसार समतोल साधण्यासाठी भगवंताने निर्माण केली आहे. प्रत्येक जिवामध्ये असलेल्या रज-तम गुणांचा प्रभाव त्याच्या कर्मावर दिसून येतो. काही कार्यांसाठी सत्त्वगुणाची, तर काही कार्यांसाठी रज-तम गुणांची आवश्यकता असते. यासाठी भगवंताने या ३ गुणांच्या आधारे ४ वर्णांना त्यांची कर्मे निश्चित करून दिली आहेत.
अ. ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आणि ब्राह्मण भूमीचे गुण
शमो दमस्तप: शौचं क्षान्तिरार्जवमेव च ।
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ४२
अर्थ : अंत:करणाचा निग्रह, इंद्रियांचे दमन, धर्मपालनासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध रहाणे, क्षमाशीलता, सरलता, वेदशास्त्रांचे अध्ययन-अध्यापन; ईश्वर, शास्त्र आणि परमतत्त्व यांवर श्रद्धा ठेवणे, ही ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत.
एखादी भूमी ब्राह्मण तत्त्वाच्या गुणांनी युक्त असेल, तर त्या भूमीमध्ये निवास करणार्यांना वरील ब्राह्मण वर्णाची कर्मे करतांना यश प्राप्त होते. या ब्राह्मण वर्णाच्या भूमीत रहाणारे लोक सज्जन, विद्वान, संयमी, सदाचारी आणि चारित्र्यवान असतात. या भूमीमध्ये भौतिक सुखसुविधा मिळतीलच, असे नाही; परंतु आध्यात्मिकता, तसेच समाजामध्ये मानसन्मान आणि आदर इत्यादी गोष्टी प्राप्त होतात.
आ. क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आणि क्षत्रिय भूमीचे गुण
शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम् ।
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ४३
अर्थ : शौर्य, तेज, धैर्य, चतुरता, युद्धात पलायन न करणे, दान देणे आणि स्वामीत्व, हे क्षत्रियांचे स्वाभाविक कर्म आहेत.
धष्टपुष्ट शरीर असणेही क्षत्रियाच्या दृष्टीने आवश्यक असते. सज्जन आणि धर्म यांचे रक्षण करणे, तसेच समाजावर नियंत्रण करणे इत्यादी कर्म क्षत्रियांना करावी लागतात. क्षत्रिय वर्णाची भूमी असल्यास तेथे रहाणार्या कुटुंबातील पुढील पिढ्यांना शिक्षण, व्यवस्थापन, बुद्धी, शक्ती यांनी युक्त असे कार्यक्षेत्र, राजकारण, युद्धकला, शस्त्रकला, समाजाचे रक्षण आणि दानशूरपणा इत्यादी गुणांचा लाभ होतो. भौतिक सुखसुविधा चांगल्या प्रकारे मिळते; परंतु आध्यात्मिकता मिळेलच, असे सांगता येत नाही.
इ. वैश्य आणि शूद्र यांची स्वाभाविक कर्मे अन् त्यांच्या भूमीचे गुण
कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् ।
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ४४
अर्थ : कृषीकर्म, गोपालन आणि व्यापार हे वैश्यांचे स्वाभाविक कर्म आहे, तर सेवा अन् सुश्रूषा हे शूद्र वर्णाचे स्वाभाविक कर्म आहे.
वरील श्लोकामध्ये वैश्यांचे कर्म सांगितले आहे. मनुष्यांच्या भौतिक साधनांची परिपूर्ती करण्याचे कार्य वैश्य वर्णाकडे असते. या वर्णाच्या भूमीमध्ये निवास करणार्या कुटुंबाला शेती, व्यापार, वाणिज्य कर्म इत्यादी गोष्टींमध्ये लाभ मिळतो. भौतिक सुखाच्या दृष्टीने ही भूमी लाभदायक असते; परंतु आरोग्य, धैर्य, बुद्धी आणि उत्तम चारित्र्य या गोष्टी या भूमीत लाभेल, असे नाही.
३ वर्णांप्रमाणे कार्य करणार्या समाजाची सेवा आणि सुश्रूषा हे कर्म शूद्र वर्णाकडे दिलेले आहे. शूद्र वर्णाची जर भूमी प्राप्त झाली, तर त्यांच्या पुढील पिढ्यांचा बौद्धिक विकास हा उत्तरोत्तर न्यून होत जातो. भौतिक सुखामध्ये उत्तरोत्तर कमतरता निर्माण होत जाते. शारीरिक कष्टाची कार्यक्षेत्रे या भूमीमध्ये रहाणार्यांना प्राप्त होतात.
वेदांमध्ये ४ वर्णांना एका शरिराचे ४ भाग म्हणून वर्णन केले आहे. शरिरासाठी चारही भाग महत्त्वाचे असतात. एकही भाग न्यून झाला, तर शरिराची हानी होते आणि संतुलन रहात नाही, त्याचप्रमाणे समाजरूपी पुरुषाच्या शरिराचे संतुलन रहाण्यासाठी चारही वर्ण महत्त्वाचे आहेत. प्रत्येक वर्णाच्या व्यक्तींनी स्वतःचे कर्म प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास निश्चितच समाजस्वास्थ्य चांगले राहील अन् सर्वांची आध्यात्मिक उन्नतीही साध्य होऊ शकेल.
२. भूमी परिग्रह (जागेची निवड आणि स्वीकार)

वर्णानुसार भूमीची वैशिष्ट्ये आपण जाणून घेतली. प्रत्येक वर्णानुसार भूमी ओळखण्यासाठी शास्त्रकारांनी काही नियम दिले आहेत. पंचज्ञानेंद्रियांनी भूमीची शब्द, स्पर्श, रस, गंध आणि वर्ण यांनुसार ती कोणत्या वर्णाची आहे, याचे निकष दिलेले आहेत. भूमीचा आकार आणि रंग यांचाही अभ्यास महत्त्वाचा आहे. वास्तूशास्त्रामध्ये भूमीच्या उताराच्या अभ्यासालाही महत्त्व दिलेले आहे. उतारालाच ‘प्लव’ असेही म्हणतात. वरील निकषांचा अभ्यास करून भूमीचा वर्ण निश्चित करून भूमीचयन करावे.
अ. ब्राह्मण वर्णाची भूमी
चतुरश्रं द्विजातीनां वस्तु श्वेतमनिन्दितम् ।
उदुम्बरद्रुमोपेतम् उत्तरप्रवणं वरम् ।। – मयमतम्, अध्याय २, श्लोक १०
अर्थ : ब्राह्मण वर्णासाठी (बुद्धीजीवी लोकांसाठी) चौरस (चारही बाजू समान) जागा, ज्यामध्ये औदुंबराचे झाड असून भूमीचा रंग पांढरा आहे. ज्या भूमीचा उतार उत्तरेकडे आहे, अशी मधुर चवीची सुगंधित जागा ब्राह्मण वर्णासाठी उत्तम सुखप्रद असते. ‘घृतगंधा भवेद्विप्री’, असेही शास्त्रात सांगितले आहे, म्हणजे तूपाचा गंध असणारी भूमी ही ब्राह्मण वर्णाला उत्तम असते.
आ. क्षत्रिय वर्णाची भूमी
कषायमधुरं सम्यक् कथितं तत् सुखप्रदम् ।
व्यासाष्टांशाधिकायामं रक्तं तिक्तरसान्वितम् ।।
प्राङ्निम्नं तत् प्रविस्तीर्णमश्वत्थद्रुमसंयुतम् ।
प्रशस्तं भूभृता वस्तु सर्वसंपत्करं सदा ।। – मयमतम्, अध्याय २, श्लोक ११ आणि १२
अर्थ : क्षत्रियांसाठी (क्षत्रिय वर्णाप्रमाणे कार्यक्षेत्र असणार्यांसाठी) आयताकृती जागा जिची लांबी ही रुंदीपेक्षा एक अष्टमांशाने अधिक आहे (उदाहरणार्थ एखाद्या जागेची रुंदी ४० मीटर असेल, तर त्याची लांबी ही ४५ मीटरहून अधिक असल्यास), जी रंगाने तांबडी, चवीला कडवट किंवा तिखट असून उतार पूर्व दिशेला आहे, पिंपळवृक्षाचे सान्निध्य त्या जागेला असेल, अशी जागा क्षत्रियांना प्रशस्त असून सर्व वैभव देणारी आहे.
इ. वैश्य वर्णाची भूमी
षडंशेनाधिकायामं पीतमम्लरसान्वितम् ।
प्लक्षद्रुमयुतं पूर्वावनतं शुभदं विशाम् ।। – मयमतम्, अध्याय २, श्लोक १३
अर्थ : आयताकृती जागा जिची लांबी रुंदीपेक्षा षष्ठांशाने अधिक आहे (उदाहरणार्थ एखाद्या जागेची रुंदी ४० मीटर असल्यास लांबी ४६.६ मीटरहून अधिक असल्यास) जिचा रंग पिवळसर असून आंबट चव असलेली प्लक्ष वृक्षाने युक्त असून पूर्वेकडे उतार असल्यास वैश्य वर्णासाठी ही भूमी उत्तम असते.
ई. शूद्र वर्णाची भूमी :
चतुरंशाधिकायामं वस्तु प्राक् प्रवणान्वितम् ।
कृष्णं तत् कटुकरसं न्यग्रोधद्रुमसंयुतम् ।।
प्रशस्तं शूद्र जातीनां धनधान्यसमृद्धिदम् । – मयमतम्, अध्याय २, श्लोक १४, १५
अर्थ : शूद्र वर्णासाठी आयताकृती जागा जिची लांबी ही रुंदीपेक्षा एक चतुर्थांशाने अधिक आहे (उदा. रुंदी ४० मीटर असल्यास लांबी ५० मीटरपेक्षा अधिक असल्यास) पूर्व दिशेकडे उतार आहे आणि रंगाने काळी, कडवट चवीची, तसेच वडाच्या झाडांचे सान्निध्य असणारी भूमी सेवाकार्य आणि सुश्रूषा करणार्यांसाठी अनुकूल सांगितलेली आहे.
वरील श्लोकांमध्ये विविध वर्णाच्या भूमींची लक्षणे सांगितले आहे. त्यांपैकी किमान ४ गोष्टी जुळत असतील, तर तो वर्ण समजावा. त्यांपैकी ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्णाची भूमी आपण सर्वजणांसाठी निवडल्यास त्यांच्या पुढच्या पिढ्याही उत्तरोत्तर प्रगती करतात, हे निश्चित आहे.
३. अन्य सूत्रे
भूमी ही कीटक, पांढर्या मुंग्या, उंदीर, कवटी, हाडे, शंख, छिद्रे इत्यादींपासून मुक्त असल्यासच भरभराट करू शकते, अन्यथा या शल्यदोषांमुळे वास्तूमालकाला विविध अडथळ्यांना सामोरे जावे लागते. जागा समतोल असल्यास उत्तम; पण चढ-उतार असल्यास दक्षिण आणि पश्चिम दिशा उंच असावी अन् पूर्व आणि उत्तर दिशेला उतार असावा.
(संदर्भ : ग्रंथ ‘श्रीमद्भगवद्गीता’ आणि ‘मयमतम्’ )
– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (८.१.२०२६)
पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/998560.html

क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !