अष्टदिशांची वैशिष्ट्ये आणि अष्टदिक्पाल !

दिशा आणि वास्तूशास्त्र – भाग ३

वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक ८

ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली, तेव्हा त्यात एखाद्या वस्तूचे स्थान निश्चित करण्यासाठी भगवंताने दिशांची निर्मिती केली. दिशांमुळे एखादी वस्तू नेमकेपणाने कुठे आहे, हे आपण सांगू शकतो. दिशेच्या शुभाशुभतेनुसार मनुष्याला फल अनुभवायला मिळते. प्रत्येक दिशेचा एक पालक आहे, त्याला ‘दिक्पाल’ असे आपण म्हणतो. हे दिक्पाल त्या दिशेचे अधिपती असतात आणि दिशेच्या कारकत्वानुसार फल देण्याचे कार्य करतात. वास्तूशास्त्राच्या दृष्टीने कुठे काय असावे किंवा काय नसावे, हे समजून घेण्यापूर्वी प्रत्येक दिशेचे वैशिष्ट्य आणि कारकत्व समजून घेतल्यास वास्तूचे नियम कसे सिद्ध झाले, हे आपल्या लक्षात येऊ शकेल. आपण प्रत्येक दिशेचे वैशिष्ट्य जाणून घेऊया. २७ डिसेंबर २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैर्ऋत्य’, या दिशांविषयीची माहिती घेतली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/990997.html

५. पश्चिम दिशा 

अ. देवता : या दिशेची देवता शनि आहे. सर्व प्रकारचा र्‍हास, कष्ट, दारिद्र्य हे या दिशेचे कारकत्व आहे. श्रम, वेळ, पैसा वाया जाणे, बौद्धिक क्षमता वाया जाणे इत्यादी परिणाम ही दिशा बिघडल्यास जाणवतात. मावळतीकडे ही दिशा असल्यास ती र्‍हास करणारी दिशा आहे.

आ. पालक : या दिशेचा पालक वरुण आहे. विलक्षण आणि अतिशय ऐश्वर्य दर्शवणारी ही देवता आहे; पण शनीची दिशा असल्याने तेवढे शुभ परिणाम मिळत नाहीत. नेहमीच्या उपयोगात नाही; पण काही विलक्षण गोष्टींच्या व्यवसायासाठी ही दिशा लाभदायक आहे; परंतु श्रीमंती किती काळ टिकेल, हे सांगू शकत नाही.

इ. पत्नी, नगर आणि आयुध : कालिका ही वरुणाची पत्नी असून नैर्ऋत्य दिशेप्रमाणे नकारात्मकतेला प्रोत्साहन देणारी आहे. अंधारात चालणारी कृत्ये यासाठी ही दिशा साहाय्य करते; परंतु समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने ती सर्व अनीतीकारक असतात. श्रद्धावती हे नगर असल्याने जीवनात सद्सद्विवेकबुद्धीने आचरण केल्यास आणि धर्मावर श्रद्धा ठेवल्यास या दिशेची नकारात्मकता न्यून होण्यास साहाय्य होते. वाहन मगर असून पाश हे आयुध आहे. या दोन्ही गोष्टी आवळून टाकणार्‍या असल्याने दिशा अशुभ झाल्यास मनुष्याला सर्व बाजूंनी कोंडीत सापडल्यासारखे होते.

ई. लाभ : ही गजलक्ष्मीची दिशा असल्याने ती शुभ असल्यास संपत्ती मिळते; परंतु अत्यंत अल्प गतीने प्राप्त होते. शनि हा मंद ग्रह असल्याने प्रत्येक गोष्ट मिळण्यास दिशा अशुभ असल्यास विलंब होतो. ही दिशा स्त्रियांच्या दृष्टीने लाभदायक आहे. त्यामुळे त्यासंबंधी व्यवसायांना ही दिशा लाभदायक आहे.

६. वायव्य दिशा 

श्री. श्रेयस पिसोळकर

अ. देवता : चंद्र ही या दिशेची देवता असून चंचलता आणि अस्थैर्य या दिशेकडून प्राप्त होते. शुभ-अशुभ दिशेच्या मध्यभागी ही दिशा येत असल्याने दोन्ही प्रकारचे फल देते.

आ. पालक : वायू हा या दिशेचा पालक आहे. चंचल, अस्थिरता, गतीमानता, कार्यतत्परता ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. ही दिशा शुभ आणि निर्दाेष असल्यास घरामध्ये शुद्ध वातावरण निर्माण करते. कोंदटपणा जाऊन प्रसन्नता निर्माण करते. या दिशेत दोष किंवा प्रवेशद्वार असेल, तर मनुष्याच्या मनाचा संभ्रम निर्माण करते. वायव्य दिशेत जर झोपायची जागा असेल, तर एकाच वेळी अनेक विषयांवर मनुष्य विचार करतो; परंतु ते कृतीत येत नाही, अशी स्थिती येते.

इ. पत्नी, नगर आणि वाहन : अंजना ही दिशा पालकाची पत्नी आहे आणि गंधवती हे नगर आहे. त्यामुळे या ठिकाणी सुगंधित वस्तू ठेवल्यास वास्तूला सकारात्मता प्राप्त होते. दिशा पालकाचे वाहन हरिण असून सतत कार्यमग्नता दर्शवते.

ई. लाभ : विजयलक्ष्मीची दिशा असल्याने ही दिशा शुभ असल्यास शत्रूवर विजय प्राप्त करून देते. पाळीव प्राण्यांचा गोठा या दिशेला लाभदायक असतो.

या दिशेमध्ये उत्तर वायव्य दिशा उघडी असल्यास चालते; परंतु पश्चिम वायव्य दिशा उघडी ठेवणे टाळावे.

अष्टदिशा

७. उत्तर दिशा  

अ. देवता : ही शुभ दिशा असून पैसा, संपन्नता आणि समृद्धी ही या दिशेची कारकत्वे आहेत. या दिशेची देवता बुध आहे. कुबेर हा दिशापालक असल्यामुळे ही दिशा जास्तीत जास्त उघडी ठेवल्यास समृद्धी देणारी आहे. अर्थ हा पुरुषार्थ या दिशेला आहे. त्यामुळे ही समृद्धी देणारी दिशा आहे.

आ. पालक, पत्नी, नगर, वाहन, आयुध : पालक कुबेर असल्याने धनप्राप्ती आणि संचय या दोन्हींसाठी ही दिशा शुभ आहे. चित्रलेखा ही पत्नी आहे, तर अलंकापुरी हे नगर आहे. हे नगर म्हणजे इंद्रादी देवांचे धनसंचय करण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे या दिशेला केलेला धनसंचय दीर्घकाळ टिकतो. वाहन पांढरा घोडा हे श्रीमंतीचे लक्षण आहे. खड्ग हे आयुध सरळ आणि स्थिर वार करणारे असल्याने उत्तर दिशेकडून विजय प्राप्त होतो. धनलक्ष्मीची ही दिशा आहे; म्हणून या दिशेतील दोष दूर करण्यासाठी या दिशेला धनलक्ष्मीचे चित्र लावले जाते.

इ. लाभ : ही बुधाची दिशा असल्याने ती शुभ असल्यास बुद्धीचा विकास चांगला होतो. बुध व्यापाराचा कारक असल्याने त्यासाठीसुद्धा ही दिशा लाभदायक आहे.

८. ईशान्य दिशा 

अ. देवता : आठही दिशांपैकी ही सर्वांत शुभ दिशा आहे. विद्या, आरोग्य, बौद्धिक क्षमता, समृद्धी, संतती इत्यादी सर्व गोष्टींची कारक दिशा आहे. गुरु ही या दिशेची देवता आहे. ईश्वरी तत्त्वाची ही दिशा असून ईशान हा दिशापालक आहे.

आ. पत्नी, नगर, वाहन आणि आयुध : या ठिकाणी शिवाचे अधिष्ठान असून पार्वती ही पत्नी आहे. शिव-शक्तीचा संगम या दिशेकडे असल्याने भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही दृष्टीने ही दिशा लाभदायक आहे. कैलास हे नगर असून मनुष्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे आहे. वृषभ हे वाहन असून शांतता आणि कष्टाळू या दोन्ही गोष्टींचे ते द्योतक आहे. त्रिशूल हे आयुध असून त्रिविध तापांपासून मुक्ती देणारे आहे आणि तीन गुणांचा समतोल राखणारे आहे.

इ. लाभ : अष्टलक्ष्मींपैकी संतानलक्ष्मीची ही दिशा असल्याने दिशा निर्दाेष शुभ असता संततीसाठी लाभदायक असते. जलतत्त्वाची दिशा असल्याने भूमीखाली पाण्याचा साठा या दिशेला करावा. या दिशेत दोष निर्माण झाल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

(क्रमशः पुढील शनिवारी)

– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (२३.१२.२०२५)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/996233.html