वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक १०
वास्तूशास्त्राविषयी जाणून घेतांना यापूर्वीच्या लेखांमध्ये आपण जाणून घेतले की, ‘भूरेव मुख्यं वास्तू’ (संदर्भ : ‘समराङ्गणसूत्रधार’ ग्रंथ), म्हणजेच भूमी हीच मुख्य वास्तू आहे. त्यामुळे भवन उभारण्यापूर्वी भूमी निर्दाेष असणे महत्त्वाचे आहे. भूमीचा आकार, वर्ण, प्रत ही भवन आणि तेथे रहाणार्या व्यक्ती यांच्या दृष्टीने योग्य असणे आवश्यक आहे. यासाठी भूमीचे प्रकार त्यांची वैशिष्ट्ये, भूमी परीक्षण, भूमीची निवड यांविषयी शास्त्रकारांनी सखोल लिखाण केलेले आहे. मागच्या लेखामध्ये आपण वर्णानुसार भूमीचे विभाजन पाहिले. आजच्या लेखामध्ये आपण विविध निकषांनुसार भूमीची शुभाशुभता आणि भूमी क्रय (विक्री) करण्यापूर्वी करावयाच्या परीक्षा यांविषयी जाणून घेणार आहोत.
मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/996233.html
१. भूमीवरील वनस्पतीनुसार शुभ भूमी
कुशकाशयुता ब्राह्मी दूर्वा नृपतिवर्गगा ।
फलपुष्पलतावैश्या शूद्राणां तृणसंयुता । – विश्वकर्मप्रकाश, अध्याय १, श्लोक ३४ आणि ३५
अर्थ : दर्भ, लव्हाळा असलेली भूमी ब्राह्मण वर्णासाठी (बुद्धीजीवी लोकांसाठी) शुभ असते, दुर्वा असलेली भूमी क्षत्रिय, फळ-फुल लतायुक्त भूमी वैश्य, तर गवत असलेली भूमी शूद्र वर्णियांसाठी शुभ असते. यामध्ये वर्णाचा विचार हा गुणकर्मानुसार करावा.
कुशकाशान्विता ब्रह्मवर्चसान् कुरुते सुतान् ।
दूर्वान्विता वीरजनि: फलाढ्या धनपुत्रदा ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय १, श्लोक ५३
अर्थ : दर्भ, लव्हाळा युक्त भूमीमुळे ब्राह्मतेजयुक्त मुले जन्माला येतात. जिथे दुर्वा अधिक प्रमाणात असतात, तिथे शूर पुरुष निपजतात. भूमीमध्ये पुष्कळ फळे असल्यास धन, तसेच पुत्रप्राप्ती होते.
२. भूमीच्या परिसरानुसार भूमीचे परीक्षण
नदीघाताश्चितां तद्वन्महापाषाणसंयुताम् ।।
पर्वताग्रेषु संलग्नां गर्तां विवरसंयुताम् ।
वक्रां सूर्यनिभां तद्वल्लकुटाभां कुरूपिणीम् ।।
मुसलाभां महाघोरां वायुना वापि पीडिताम् ।
भल्लभल्लूकसंयुक्तां मध्ये विकटरूपिणीम् ।।
श्वश्रृगालनिभां रूक्षां दन्तकै: परिवारिताम् ।
चैत्यमश्मशानवल्मीकधूर्तकालयवर्जिताम् ।।
चतुष्पद माहवृक्ष देवमन्निवासिताम् ।
दूराश्रितांच भूगर्तयुक्तां चैव विवर्जयेत् ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय १, श्लोक ३५ ते ३९
अर्थ : नदीचा तडाखा बसणारी, मोठमोठे दगड असलेली, पर्वतशिखराजवळची, खड्डे आणि भेगा पडलेली, वेडीवाकडी, सूपाच्या आकाराची, दंडाच्या आकाराची, ओबडधोबड, अतीवारे वहाणारी, खडबडीत, अस्वलांचा निवास असलेली, मधोमध कुरूप दिसणारी, कुत्रा-कोल्हा यांच्यासारखी दिसणारी, रूक्ष भूमी, हत्तींनी वेढलेली, चैत्य, स्मशान आणि वारूळे, तसेच कोल्हे असणारी भूमी निवासासाठी वर्ज्य करावी. ज्या भूमीला ४ रस्ते येऊन भिडतात; ज्या भूमीत विस्तीर्ण झाडे, मंदिर, तसेच मंत्र्यांची घरे असतात, जी भूमी शहरापासून किंवा मुख्य रस्त्यापासून पुष्कळ अंतरावर असते, तसेच ज्या भूमीत पुष्कळ खड्डे असतात, अशा भूमीचा त्याग करावा.
थोडक्यात ज्या ठिकाणी मनुष्याच्या आरोग्यावर आणि पुढील पिढ्यांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो किंवा प्राणांतिक संकट निर्माण होऊ शकते, वास्तूला धोका निर्माण होऊ शकतो, अशा भूमी वास्तूशास्त्राकारांनी वास्तूनिर्मितीसाठी वर्ज्य सांगितल्या आहेत.
३. भूमी परीक्षण

आपण वास्तू निर्मितीसाठी जी जागा निवडतो, तेथील स्पंदने आणि ऊर्जा ही वास्तूमालकाच्या दृष्टीने अनुकूल असणे आवश्यक असते. भूमीचा आकार-उतार इत्यादी स्थूल गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचाच आहे; परंतु त्या भूमीचा मालकाच्या नशिबाशी संबंध पडताळायला हवे, म्हणजे भूमी त्याला लाभते कि नाही ? याचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
तेथील स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्म स्पंदनांचे ज्ञान, तसेच साधना असणे आवश्यक असते; परंतु प्रत्येकाला ते शक्य नसते किंवा त्यामध्ये योग्य उत्तर मिळवण्यासाठी अनिष्ट शक्तींचे अडथळे येण्याची शक्यता असते, यांसाठी शास्त्रकारांनी भूमीचा सर्व दृष्टीने अभ्यास करण्यासाठी काही भूमी परीक्षा घेण्यास सांगितले आहे. त्याविषयी आपण समजून घेऊया.
ज्या भूमीची परीक्षा घ्यायची आहे, त्या भूमीवर उभे रहावे. ज्या व्यक्तीसाठी परीक्षा घ्यायची असेल, त्याने शुभ दिवशी उपवास करून पांढर्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत. ज्या भूमीचे परीक्षण करायचे आहे, तिला नमस्कार करून यजमानाने व्रतस्थ राहून तिचे पूजन करावे आणि तिला पुढील प्रार्थना करावी.
अस्मिन् वस्तुनि वर्धस्व धनधान्येन मेदिनि ।
उत्तमं वीर्यमास्थाय नमस्तेस्तु शिवा भव ।। – मयमतम्, अध्याय ४, श्लोक १४, १५
अर्थ : हे भूमी, या जागेवर धनधान्य वृद्धी करणारी हो ! अत्यंत सुपीक हो ! उत्तम ऊर्जा निर्माण करणारी हो ! मी तुला नमस्कार करतो. तू मंगल प्रदान करणारी हो !
अ. परीक्षा क्र. १ (भूमीची घनता)
निखनेद्धस्तमात्रेण पुनस्तेनैव पूरयेत् ।
पांसुनाधिकमध्योना श्रेष्ठा मध्याधमाक्रमात् ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय १, श्लोक ६१
अर्थ : एक हात (यजमानाचा) लांब, एक हात रुंद आणि एक हात खोल (अनुमाने ३ x ३ x ३) खड्डा खणावा. खणून काढलेली माती खड्ड्यात परत भरावी. खड्डा पूर्ण भरून माती शेष राहिली, तर भूमी उत्तम प्रतीची समजावी, खड्डा पूर्ण भरला आणि माती शेष राहिली नाही, तर भूमी मध्यम प्रतीची समजावी आणि मातीने खड्डा पूर्ण भरला नाही, तर ती भूमी हलक्या प्रतीची समजावी.
आ. परीक्षा क्र. २ (भूमीची आर्द्रता)
जलेनापूरयेच्छ्वभ्रं शीघ्रं गत्वा पदै: शतम् ।
तथैवागम्य वीक्षेत न हीनसलिला शुभा ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय १, श्लोक ६२
अर्थ : वरीलप्रमाणे एक हाताचा खड्डा पाण्याने पूर्ण भरून त्वरेने १०० पावले दूर जाऊन पुन्हा खड्ड्याजवळ परत येऊन पाण्याची पातळी पहावी. पाणी अजिबात जिरले नसेल (१ अंगुळ चालेल), तर भूमी उत्तम प्रतीची समजावी, २ अंगळेपर्यंत पाणी जिरले, तर मध्यम प्रतीची आणि ३ अंगळे किंवा त्यापेक्षा अधिक पाणी जिरले, तर भूमी हलक्या प्रतीची समजावी.
इ. परीक्षा क्र. ३ (दिव्यांनी कोणत्या वर्णासाठी भूमी उत्तम आहे, याची परीक्षा करणे)
अरत्निमात्रे श्वभ्रे वा ह्यनुलिप्ते च सर्वत: ।।
घृतमामशरावस्थं कृत्वा वर्तिचतुष्टयम् ।
ज्वालयेद्भूपरीक्षार्थं संपूर्णं सर्वदिङ्मुखम् ।।
दीप्ता पूर्वादि गृह्णीयाद्वर्णानामनुपूवश: । – विश्वकर्मप्रकाश, अध्याय १, श्लोक ६२, ६३ आणि ६४
अर्थ : वरीलप्रमाणे एक हात मापाचा खड्डा खणून त्याला आतून सर्व बाजूंनी सारवावे. त्या खड्ड्यात मातीचे उथळ भांडे तूपाने काठोकाठ भरून ४ मुख्य दिशांना, ४ वाती ठेवून पेटवाव्यात. ज्या दिशेची ज्योत वाढीस लागून सर्वाधिक उंची गाठेल, त्यानुसार भूमीचा वर्ण जाणावा. पूर्व दिशेची असल्यास ब्राह्मण वर्ण, दक्षिणेची असल्यास क्षत्रिय, पश्चिमेची असल्यास वैश्य आणि उत्तरेची असल्यास शूद्र वर्ण समजावा.
ई. परीक्षा क्र. ४ (बीजांकुरणावरून मूल्यांकन)
हलाकृष्टे तथोद्देशे सर्वबीजानि वापयेत् ।।
त्रिपन्चसप्तरात्रेण न प्ररोहन्ति तान्यपि ।
उप्त बीजा त्रिरात्रेण सांकुरा शोभना मही ।।
मध्यमा पन्चरात्रेण सप्तरात्रेण निन्दिता । – विश्वकर्मप्रकाश, अध्याय १, श्लोक ६४, ६५ आणि ६६
अर्थ : नांगराने नांगरलेल्या भूमीवर सर्व प्रकारची धान्ये (भात, साळी मूग, गहू, सांसव, तीळ, जव) पेरावीत. जर ३ दिवसांत पेरलेले उगवले, तर ती भूमी शुभ असते. ५ दिवसांत उगवले, तर ती भूमी मध्यम आणि ७ दिवसांत उगवले, तर ती भूमी निन्दित समजावी.
उ. परीक्षा क्र. ५ (धूलिकणांद्वारे भूमीची परीक्षा)
पांसवोरेणुतां नीत्वा निरीक्षेदन्तरिक्षगा: ।
अधोमध्योर्ध्वगा नृणां गतितुल्यफलप्रदा: ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय १, श्लोक ७०
अर्थ : भूमी खंडातील धूळ आकाशाच्या दिशेने फेकावी. जर ती धूळ त्याच ठिकाणी, म्हणजे जिथून घेतली तिथेच पडली, तर ती भूमी खालच्या प्रतीची, काही अंतरावर पडली तर मध्यम आणि धूळ आकाशाच्या दिशेने गेली, तर ती भूमी उत्तम होय.
वरील परीक्षांच्या माध्यमातून आपल्याला भूमीच्या शुभाशुभतेविषयी ज्ञान होऊ शकते. वरीलपैकी कोणत्याही २ किंवा ३ परीक्षा करू शकतो.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे दलदलयुक्त भूमीतही भक्कम इमारतीची बांधणी शक्य झाली आहे. विदेशात काही ठिकाणी प्रत्यक्ष समुद्रात हॉटेल किंवा इमारती बांधण्याएवढा टप्पा तंत्रज्ञानाने गाठला आहे. अशा वास्तू जरी बाहेरून दिसतांना आकर्षक दिसल्या, तरी प्रत्यक्ष तेथील अंतर्गत वातावरण तेथील स्पंदने प्रसन्नता देणारी असतात, असे नाही. अशा वास्तूंमध्ये मानसिक शांतता आणि स्वास्थ इत्यादी गोष्टी प्राप्त होणे दुरापास्त आहे.
(संदर्भ : ग्रंथ ‘मयमतम् आणि विश्वकर्मप्रकाश’)
– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (१३.१.२०२६)
पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1000990.html
|

‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
क्रिकेटचा उदो उदो नको !