चारित्र्यसंपन्न, ज्ञानतपस्वी आणि वक्तादशसहस्रेषु कोकण पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार कै. डॉ. अशोक मोडक !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्काराने मंडित असलेले आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार आदरणीय डॉ. अशोकराव मोडक यांना डिसेंबर २०२५ मध्ये चतुरंग संस्थेने ‘जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित केले. त्यांचे कोणत्याही विषयावरचे व्याख्यान, म्हणजे ज्ञान आणि माहिती यांनी परिपूर्ण असलेली  बौद्धिक अन् वैचारिक मेजवानी असे. त्यांच्या कोणत्याही व्याख्यानात संस्कृत सुभाषितांची आतषबाजी असे. त्याच वेळी विविध प्रकारचे दाखले आणि उदाहरणे देत त्यांचे व्याख्यान वसंत ऋतूप्रमाणे बहरलेले अन् शरद पौर्णिमेच्या शीतलतेने श्रोत्यांना शांत, तसेच समृद्ध करणारे असे. याचा अनुभव अनेक श्रोत्यांनी घेतला आहे. डॉ. मोडक यांचे २ जानेवारी २०२६ या दिवशी निधन झाले. 

कै. डॉ. अशोक मोडक

१. अभ्यासपूर्ण आणि योग्य मार्गदर्शन करणारे आमदार डॉ. अशोक मोडक !

शिक्षणक्षेत्रातील त्यांची कामगिरी अतुलनीय आणि अभिमानास्पद अशीच होती; म्हणूनच त्यांची केंद्रीय विश्वविद्यालय, छत्तीसगडच्या कुलाधिपती या पदावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ५ वर्षांसाठी नियुक्ती केली होती. त्यांनी विविध प्रकारची सन्माननीय पदे समर्थपणे निभावली आहेत. अनेक शिक्षण संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. विद्यार्थी परिषदेतसुद्धा त्यांनी त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा ठसा विद्यार्थ्यांवर ठसवला. शिक्षण मतदारसंघातून यांनी आमदारपद तेवढ्याच शक्तीने आणि समर्थपणे भूषवले. मनोहर जोशी जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्या वेळेची एक छोटीशी; पण महत्त्वपूर्ण घटना; कारण या घटनेचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे.

‘टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळा’चे अध्यक्षस्थान डॉ. अशोक मोडक भूषवत असतांना मी त्याच कालखंडात त्याच मंडळाचा कार्यवाह होतो. शाळेच्या कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी डॉ. अशोक मोडक यांच्यासह मी गेलो होतो. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कक्षामध्ये गेल्यावर मुख्यमंत्री मनोहर जोशी त्यांचे सचिव बोंगिरवार यांना म्हणाले, ‘आज डॉ. मोडक सरांचे सभागृहात भाषण आहे. तेव्हा तुम्ही अवश्य उपस्थित रहा. त्यांच्या व्याख्यानातील सर्व सूत्रे व्यवस्थित नोंदवून घ्या; कारण अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शन करणारा आमदार आता दृष्टीला पडणे दुर्मिळ झाले आहे.’ आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, डॉ. मोडक यांचा ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून गौरवही करण्यात आला होता.

२. डॉ. मोडक यांचा स्वभाव आणि त्यांच्याविषयीच्या आठवणी

श्री. दुर्गेश परुळकर

मे १९८५ मध्ये मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्याकडे ‘सोव्हिएत युनियन’ची सत्ता आली. त्यांनी पेरिस्रोइका, म्हणजे रशियात आर्थिक आणि सामाजिक सुधारणा करण्याचे ठरवले. तशी घोषणाही केली, तसेच ग्लासनस्त, म्हणजे मोकळेपणा अन् पारदर्शकता किंवा उदारीकरण करणार असल्याची घोषणा केली. या दोन गोष्टींची जोड देऊन त्या वेळचे रशियाचे राष्ट्रपती मिखाइल गोर्बाचेव्ह यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे केलेल्या भाषणात यांचा उच्चार करून रशियात राजकीय आणि आर्थिक रचना केली. या विषयावरचे डॉ. मोडक यांचे टिळकनगरच्या प्रांगणात केलेले व्याख्यान आठवते आणि तसेच ते अनेकांच्या  स्मरणात असेल.

शांत, स्पष्ट आणि संथपणे ते स्वतःचा विषय मांडत असत. विविध  विषयांची आवड असणार्‍या या विनयशील विद्वानाला काव्यशास्त्र आणि विनोदाचे वावडे नव्हते, तसेच त्यांचा स्वभाव मनमोकळेपणाने गप्पा मारण्याचा होता आणि हसतांनासुद्धा ते मुक्तपणे हसत असत. त्यांचा हा नैसर्गिक स्वभाव त्यांच्या विद्वत्त्ोला बाधा आणत नाही, तर त्यांच्यातील जित्याजागत्या रसिकत्वाचे दर्शन घडवत असे.

३. डॉ. मोडक यांचे स्वभाव वैशिष्ट्य 

डॉ. मोडक यांच्यासह काम करतांना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. आपल्यावर होणार्‍या टीकेचाही शांतपणे विचार करून त्यात काही तथ्य असेल, तर त्याचा स्वीकार करून आपल्यातील दोष आणि चुका दूर करण्याचा प्रयत्न करणे, यांवर ते नेहमी भर देत. त्यांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य, म्हणजे त्यांचा आवाज कधीही कठोर झाला नाही. त्यांच्यामध्ये संयम आणि विद्वत्ता या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतांना अढळ होत्या. त्यांच्या वाणीतील माधुर्य आणि आपलेपणाची भावना सहजतेने प्रकट होत होती. अंतरबाह्य शुद्धता आणि विनयशीलता हे त्यांचे गुणवैशिष्ट्य कुणाच्याही मनावर गारुड करणारे आहे. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे ते त्यांच्या समवेत काम करणार्‍या प्रत्येकावर पूर्णपणे विश्वास ठेवायचे. त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे स्वाभाविकतेने ‘त्यांच्यापासून काही लपवून ठेवावे’, अशी भावना मनात निर्माण होत नसे. परिणामी एक पारदर्शकता निर्माण होत होती. परस्परांविषयीचा विश्वास दृढ आणि नाजूकपण भक्कम असा भावबंध निर्माण होत असे. हेच त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य असल्यामुळे प्रत्येकाचा त्यांच्याशी आपुलकीचा, आपलेपणाचा नातेसंबंध निर्माण होत असे.

वि.रा. करंदीकर ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाचे अभ्यासक. टिळकनगर शाळेच्या प्रांगणात त्यांचे व्याख्यान झाले. हे व्याख्यान डॉ. अशोक मोडक तल्लीनतेने ऐकत असतांना अनेकांनी पाहिले आहे. त्यातही वैशिष्ट्य असे की, करंदीकर यांच्या व्याख्यानातील काही महत्त्वाचे सूत्रे ते स्वतःच्या नोंदवहीत नोंदवत होते. व्याख्यानानंतर त्यांनी करंदीकर यांना विनम्रतापूर्वक प्रणाम केल्याचे सर्वांनी पाहिले आहे. तीच गोष्ट प्र.न. जोशी यांच्याविषयी घडली. त्यांचेही व्याख्यान ऐकून डॉ. अशोक मोडक किती भारावून गेले होते, ते अनेकांनी पाहिले आहे. त्यांना श्रद्धांजली वाहतांना अशा अनेक आठवणींच्या गर्दीत मन हरवून जातांना कंठ दाटून येतो.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (३.१.२०२६)