‘हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळाला’, याच्या श्रेयनामावलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावेत, यासाठी संस्कृतसह हिंदीतही ग्रंथ लिहिले. अर्थात् ते त्याला ‘आर्यभाषा’ म्हणत असत. त्यांच्यानंतर मात्र ‘हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी’, हा विचारही कुणाच्या मनात नसतांना सावरकर यांनी हिंदी भाषेच्या प्रचाराला प्रारंभ केला.
१. सावरकर यांनी हिंदी भाषा आणि देवनागरी लिपी यांनी विविध स्तरावर केलेले प्रत्यक्ष कार्य
वर्ष १९०६ मध्ये सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले खरे; पण ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेचा जगभर प्रसार करणे, हाही त्यांचा त्यामागचा एक महत्त्वाचा हेतू होता. तिथे अभिनव भारतच्या सदस्यांमध्ये त्यांनी हिंदी भाषा आणि देवनागरी लिपी यांचा प्रचार चालू केला. तेच कार्य त्यांनी अंदमानात हाती घेतले. तिथे शिक्षणाचा प्रसार चालू केल्यावर प्रत्येक कैद्याने आधी स्वतःची मातृभाषा शिकावी. त्यानंतर हिंदी शिकून मग इतर प्रांतीय भाषा शिकाव्यात, असा दंडकच घालून दिला. अंदमानात सर्व प्रांतांचे कैदी एकत्र असल्याने त्यांची बोली भाषा हिंदीच असे; पण सरकारी कामासाठी उर्दू भाषेचा वापर होत असे. शाळांमध्येही उर्दूच शिकवली जात असे. त्यामुळे मुलांना आपल्या साहित्याची आणि संस्कृतीची ओळख होत नसे.

खरेतर हिंदी भाषा अरबी-फारसी लिपीत लिहिली की होते उर्दू, म्हणजेच ‘मूळ प्रश्न लिपीचा आहे’, हे जाणून सावरकर यांनी हिंदी आणि देवनागरी यांच्या प्रसारासाठी चळवळच उभारली. सेल्युलर कारागृहामध्ये बहुतेकदा मुसलमान कैद्यांना ‘मुन्शी’ (लिपिक) बनवले जात असे. कैदी अशिक्षित असल्यामुळे त्यांची पत्रे मुन्शी लिहून देत. साहजिकच ती उर्दूत लिहिली जात. सावरकर यांनी अंदमानात शिक्षणाचा जो प्रसार केला, त्यामुळे तेथील ८० टक्के कैदी सुशिक्षित झाले होते. एकदा लिहिता-वाचता यायला लागल्यावर हे कैदी मातृभाषेत पत्र लिहू लागले. कारागृहाबाहेर रहाणार्या कैद्यांमध्येही सावरकर यांनी हिंदी भाषेचा प्रसार केला. अंदमानात नव्याने उघडण्यात आलेल्या मुलींच्या शाळेत हिंदी अनिवार्य करण्यात त्यांना यश मिळाले आणि हिंदी हीच अंदमानची संपर्क भाषा झाली.
२. संस्कृतनिष्ठ हिंदी, हीच खरी राष्ट्रभाषा ! – स्वातंत्र्यवीर सावरकर
१२ डिसेंबर १९३७ या दिवशी नागपूरमध्ये मराठी मध्यप्रांतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणात ‘हिंदी हीच आमची राष्ट्रभाषा आणि देवनागरी हीच आमची राष्ट्रलिपी’, हा सिद्धांत सावरकर यांनी मांडला.
सावरकर म्हणतात, ‘पंडितांची भाषा संस्कृत होती. मराठी संतकवी नामदेव यांनी हिंदीत रचना केल्या आणि त्या पंजाबसारख्या दूरच्या भागात आजही प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम यांनीही हिंदीत रचना केल्या होत्या. त्यावरून हिंदी ही राष्ट्रीय भाषा कशी झाली होती, हे योग्यपणे दिसून येईल. चारधाम यात्रा करणार्या साधू बैराग्यांमुळे या प्राकृत भाषेचा प्रचार वाढला आणि तिला ‘साधूंची, बैराग्यांची भाषा’, असे अभिधान (ओळख) प्राप्त झाले होते. मुसलमान कवींनीही या ब्रज भाषेत रचना केल्या आहेत. ‘हिंदी याने हिंदुस्थानी’ हे नवे नाव तिला मिळू पहात आहे; पण संस्कृतनिष्ठ हिंदी हीच खरी राष्ट्रभाषा आहे.’
३. सावरकर यांच्यामुळेच तत्कालीन हिंदी साहित्यिकांकडून संस्कृतनिष्ठ हिंदीचा पुरस्कार
गांधींच्या मुसलमानधार्जिण्या धोरणामुळे ते उर्दूचा प्रभाव असलेल्या देवनागरी लिपीत लिहिल्या जाणार्या हिंदुस्थानीचा प्रसार करत होते. गांधींच्या प्रभावाखाली असलेले अनेक हिंदी साहित्यिकही हिंदुस्थानीचा पुरस्कार करू लागले होते. डिसेंबर १९४७ ला मुंबईत झालेल्या हिंदी साहित्य संमेलनात सावरकर यांनी ‘हिंदी याने हिंदुस्थानी’ यावर सडेतोड प्रत्त्युतर दिले. त्यांनी संमेलनाचे सदस्य आणि राज्यघटना समिती सदस्य यांना राष्ट्रहितासाठी जे योग्य त्यालाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले. त्यानंतर साहित्यिकांचे मतपरिवर्तन झाले आणि तेही हिंदीचा पुरस्कार करू लागले.

४. ‘भारत’, ‘राष्ट्रभाषा हिंदी’ आणि ‘राष्ट्रलिपी देवनागरी’ यांना मान्यता मिळवण्यात सावरकर यांचे श्रेय !
घटना समिती राज्यघटना बनवत होती. देशाचे नाव, राष्ट्रभाषा आणि राष्ट्रलिपी या प्रश्नावर वादळी चर्चा चालू होत्या. ५ ऑगस्ट १९४९ या दिवशी सावरकर यांनी समितीच्या अध्यक्षांना तार करून त्यात ‘देशाचे नाव भारत, राष्ट्रभाषा हिंदी आणि राष्ट्रलिपी देवनागरी यांना मान्यता द्यावी’, अशी विनंती केली. हिंदुस्थानसाठी ‘भारत’ हे नाव निश्चित झाले. हिंदी राष्ट्रभाषा आणि देवनागरी राष्ट्रलिपी यांवर १४ सप्टेंबर १९४९ या दिवशी शिक्कामोर्तब झाले. सावरकर यांच्या विचारांचा, त्यांच्या लढ्याचा विजय झाला. उर्दूचा प्रभाव असलेली ‘हिंदुस्थानी’ न स्वीकारता देशाने हिंदीचा स्वीकार झाला.
५. हिंदु राष्ट्र उभारणीसाठी एकसंधता ठेवणारे सावरकर !
मराठीचा अभिमान बाळगणारे आणि मराठी भाषाशुद्धीचाही ध्यास घेतलेले सावरकर यांनी ‘स्वतःची मातृभाषा असलेल्या मराठीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा’, असा हट्ट धरला नाही; कारण एकसंध हिंदु राष्ट्र उभारणीसाठी ‘एक देव, एक देश, एक आशा, एक जाती, एक जीव, एक भाषा’, हे त्यांचे अलौकिक, क्रांतदर्शी सूत्र होते आणि फक्त न फक्त राष्ट्रहितालाच प्राधान्य होते.
– सौ. मंजिरी मराठे, कोषाध्यक्षा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.

उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !