French President Macron’s wife : फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पत्नीविषयी अश्लाघ्य टीका करणार्‍या १० जणांना शिक्षा !

ती केवळ एक मस्करी होती ! – दोषींची भूमिका

ब्रिगिट मॅक्रॉन

पॅरिस (फ्रान्स) – येथील एका न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्याविरुद्ध अश्लाघ्य टिप्पणी करणार्‍या १० जणांना दोषी ठरवले आहे. ब्रिगिट यांनी वर्ष २०२४ मध्ये ऑनलाईन छळाची तक्रार केली होती. या प्रकरणी दोषींना ८ महिन्यांची कारागृहवासाची शिक्षा आणि ६३ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे लोक सामाजिक माध्यमांवर खोट्या अफवा पसरवत होते की, ब्रिगिट मॅक्रॉन यांचा जन्म पुरुष म्हणून झाला होता. तसेच ब्रिगिट या पती इमॅन्युएल यांच्यापेक्षा २४ वर्षे मोठ्या असल्याकारणाने दोषींनी याला ‘पीडोफिलिया’शी जोडले होते. याचा अर्थ आहे – लहान मुलांविषयी लैंगिक आकर्षण. या अश्लाघ्य टीकेवरून ही कारवाई करण्यात आली.

इमॅन्युएल आणि ब्रिगिट यांचा विवाह वर्ष २००७ मध्ये झाला. त्यांचे आजचे वय अनुक्रमे ४८ आणि ७२ आहे. ब्रिगिट यांची आधीच्या पतीपासूनची मुलगी टिफेन ओजियर यांनी साक्ष दिली की, या अफवांमुळे त्यांच्या आईच्या आरोग्यावर आणि संपूर्ण कुटुंबावर वाईट परिणाम झाला. एका दोषीने सांगितले की, हा केवळ एक विनोद होता. फ्रान्समध्ये विनोद करण्यासाठी अनुमती लागते का ?