(‘बायो-केमिकल इंजिनीयरिंग’ म्हणजे जैव-रसायन तंत्रज्ञान)
पंचकर्मापूर्वी ‘स्नेहपान’ (स्नेहपान म्हणजे पूर्वकर्म म्हणून चढत्या क्रमाने मोठ्या प्रमाणात औषधी तूप पिणे) अशी पद्धत असते. ही केवळ एक प्रथा नसून त्यामागे एक ठोस ‘बायो-केमिकल इंजिनीयरिंग’ आहे. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीकोनातून स्नेहपान शरिरात कसे कार्य करते, हे पाहिल्यास काही रोचक गोष्टी आढळतात.

१. ‘लाईक डिझोल्व्हस् लाईक’ (Like Dissolves Like – समधर्मी समधमर्तींमध्ये विरघळते) सिद्धांत
शरिरातील बहुतेक विषारी घटक हे २ प्रकारचे असतात –
अ. पाण्यात विरघळणारे (Water soluble) : हे लघवी किंवा घामावाटे सहज बाहेर पडतात.
आ. चरबीत विरघळणारे (Fat soluble / Lipophilic) : कीटकनाशके, जड धातू आणि चयापचयातील टाकाऊ पदार्थ हे अनेकदा ‘लिपोफिलिक’ असतात. ते आपल्या चरबीच्या पेशींमध्ये आणि पेशींच्या आवरणात अडकून बसतात. पाणी त्यांना काढू शकत नाही.
आ १. स्नेहपानाचे कार्य : जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात तूप (Saturated Fat) पिता, तेव्हा रक्तातील ‘फॅटी सिड्स’चे प्रमाण वाढते. हे तूप शरिरातील खोलवर रुतलेल्या या ‘फॅट सोल्युबल’ विषांना स्वतःमध्ये विरघळवून घेते आणि त्यांना ते अडकून बसलेल्या मूळ जागेवरून हलवते.
२. पेशींच्या आवरणातून प्रवेश (Cell Membrane Permeability)

अ. मानवी शरिरातील प्रत्येक पेशीचे आवरण हे ‘फॉस्फोलिपिड बायलेअर’ने बनलेले असते, म्हणजेच पेशींची भिंत ही मुळात चरबीनेच बनलेली असते.
अ १. स्नेहपानाचे कार्य : तूप हे ‘लिपिड’ (स्निग्ध पदार्थांपैकी एक) असल्याने ते पेशींच्या या भिंतीतून सहज आरपार जाऊ शकते. पाण्यावर आधारित औषधे जिथे पोचू शकत नाहीत (उदा. मेंदूचा ‘ब्लड ब्रेन बॅरिअर – Blood Brain Barrier किंवा मज्जासंस्था), तिथे तुपाचे रेणू सहज पोचतात. पेशीच्या आत शिरून तेथील विष सैल करण्यास तूप साहाय्य करते.
३. पित्त आणि यकृत यांचे उत्तेजन
अ. फॅट्सचे पचन करण्यासाठी यकृताला ‘बाईल’ (पित्त) सिद्ध करावे लागते. पित्तामध्ये ‘बाईल सॉल्ट्स’ (पित्त क्षार) असतात, जे निसर्गातील उत्तम ‘डिटर्जंट’ (स्वच्छ करणारे रसायन) मानले जातात.
अ १. स्नेहपानाचे कार्य : स्नेहपानामुळे तात्पुरते अधिक प्रमाणात पित्त स्रवण्यास साहाय्य होते. हे पित्त केवळ तूपच पचवत नाही, तर यकृतामधील साचलेली घाणही धुवून काढते.
४. ‘शाखा’ ते ‘कोष्ठ’ गती
आयुर्वेदात म्हटले आहे की, स्नेहपानामुळे दोष ‘शाखा’ (Tissues)मधून ‘कोष्ठ’ (पोटाकडे) येतात. हे आजच्या विज्ञानानुसार कसे घडत असावे ?
अ. ‘ऑस्मोसिस’ (द्रवभिसरण) आणि ‘डिफ्युजन’ (प्रसार) : जेव्हा तुम्ही वाढत्या क्रमाने तूप पिता (३०, ६०, ९०, १२०, १५० मि.ली.) तेव्हा शरीरातील प्रत्येक पेशी ‘सॅच्युरेट’ (तृप्त) होते.
पेशींमध्ये तुपाचे प्रमाण वाढल्यामुळे तिथे आधीच साचलेले विषारी घटक विस्थापित होतात. हे घटक तुपाच्या रेणूंसह चिकटून रक्तप्रवाहाद्वारे किंवा ‘लिम्फॅटिक सिस्टम’द्वारे पुन्हा आतड्यांमध्ये आणले जातात. एकदा हे विषारी घटक पोटात आले की, पुढे वमन (उलटी) किंवा विरेचन (जुलाब) देऊन ते शरिराबाहेर काढणे सोपे होते.
५. ‘हेरॉन आणि फॅगन’ स्टडी (वर्ष २००२)
हा या विषयातील ‘लँडमार्क स्टडी’ (महत्त्वपूर्ण संशोधन) मानला जातो. रॉबर्ट हेरॉन आणि जॉन फॅगन (Robert Herron & John Fagan) या शास्त्रज्ञांनी ‘अल्टर्नेटिव्ह थेरपीज सन हेल्थ अँड मेडिसीन’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये एक शोधनिबंध प्रकाशित केला. त्याचा विषय होता, ‘मानवी शरिरातील साचलेली विषारी रसायने (Lipophilic Toxicants) पंचकर्म आणि स्नेहपान यांमुळे न्यून होतात का ?’
६. निष्कर्ष
संशोधनात असे सिद्ध झाले की, ज्यांनी स्नेहपानासह पंचकर्म केले, त्यांच्या शरिरातील PCBs (पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल्स – मानवनिर्मित रासायनिक संयुगे) Polychlorinated Biphenyls) आणि Beta-HCH (कीटकनाशकांचे अवशेष) यांची पातळी ४६ टक्के ते ५८ टक्क्यांनी न्यून झाली.
सामान्यतः ही विषारी द्रव्ये शरिरातून बाहेर पडायला अनेक वर्षे लागतात: पण स्नेहपानाच्या ‘लिपोलिटिक ॲक्शन’मुळे (मेदविदघटनी) ती अवघ्या काही दिवसांत बाहेर पडली. हे संशोधन ‘Like Dissolves Like’ या तत्त्वाचा सर्वांत मोठा वैज्ञानिक पुरावा आहे. ‘स्नेहपान म्हणजे केवळ तूप पिणे नव्हे, तर हे एक ‘सोल्व्हेंट एक्सट्रॅक्शन’ तंत्रज्ञान आहे. हे शरिरातील जिद्दी, चरबीत विरघळणार्या विषांना विरघळवून, पेशींमधून बाहेर काढून, पोटात आणून सोडते, जिथून ते कायमचे बाहेर फेकले जातात.
आयुर्वेदातील महर्षींनी जिथे ‘दोष विलयन’ म्हटले, तिथे आधुनिक शास्त्रज्ञ ‘लिपोफिलिक झेनोबायोटिक मोबिलायझेशन’ (Lipophilic Xenobiotic Mobilization) म्हणतात. अर्थ जवळपास तोच आहे ! इथे जवळपास हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. ‘हे म्हणजेच हे’, अशी तुलना केवळ यासाठी केलेली नाही; कारण आयुर्वेद हा याच्या पलीकडचे काही सांगत असतो. ते नीट लक्षात येण्यासाठी आजच्या विज्ञानाला कदाचित् आणखी काही वर्षे लागू शकतात.
– वैद्य परिक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
स्वतःचे कुटुंब टिकेल ?
भावना बोथट झाल्या ?
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती
शिष्याला ईश्वरप्राप्तीकडे गतीमान करणारी गुरुकृपा !