Amravati Religious Conversions : आमीषाद्वारे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मगुरुसह ८ जणांना अटक आणि जामीन !

४ महिलांचा समावेश

अमरावती – जिल्ह्यातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या सीमेत येणार्‍या शिंगोरी गावात अवैध धर्मांतराचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पैशांचे आमीष दाखवून आणि भीतीचे वातावरण निर्माण करून ग्रामस्थांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी केरळसह विविध ठिकाणच्या ८ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यात ४ महिलांचा समावेश आहे.आरोपींना वरूड न्यायालयात उपस्थित केल्यावर त्यांना जामीन संमत झाला.

१. धर्मांतराची घटना ३० डिसेंबरच्या रात्री घडली होती. दक्षता म्हणून गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नागपूरचे आनंदकुमार बेंजामिन करी, केरळचे सुधीर विल्यम जॉन विल्यम, केरळचे जेल फादर चमन काला, तिवसा येथील विक्रम गोपाळ सांड, तसेच चार महिला यांचा समावेश आहे. धर्मांतराच्या प्रकरणी लक्ष्मण देविदास शेळे यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. (धर्मावरील आघातांच्या विरोधात सतर्क आणि तत्पर रहाणार्‍यांचे अभिनंदन ! – संपादक)

२. गावातील रितेश बोंदे यांच्या घरी आलेल्या काही लोकांपैकी एकाने पांढरे कपडे घातले होते. तो ग्रामस्थांशी ख्रिस्ती धर्माविषयी बोलू लागला. त्याने ग्रामस्थांना पैशांचे आमीष दाखवून धर्मांतरासाठी प्रवृत्त केले. माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मुख्य आरोपी रितेश बोंदे याला कह्यात घेतले. चौकशीनंतर उर्वरित ७ आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली.

(म्हणे) ‘हे घटनात्मक स्वातंत्र्यांचे उल्लंघन !’ – ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया बिशप कौन्सिल’चा कांगावा !

सुधीर विल्यम जॉन विल्यम हे केरळचे धर्मगुरु असलयाने ‘चर्च ऑफ साऊथ इंडिया बिशप कौन्सिल’ने या कारवाईचा निषेध करत ‘हे घटनात्मक स्वातंत्र्यांचे उल्लंघन आहे’, असे म्हटले आहे. ‘ही घटना प्रोटेस्टंट पंथातील व्यक्तींशी संबंधित असून तिचा आमच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे मी यावर भाष्य करणार नाही’, असे पॅरिश गुरु फादर ओनिल यांनी सांगितले. (इतरांचे धर्मांतर करणे, हेच खरेतर घटनात्मक स्वातंत्र्यांचे उल्लंघन आहे. असे असतांना असा कांगावा करणार्‍यांविरुद्धही कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

(म्हणे) ‘पाद्र्याला अटक करण्यात आलेली घटना अत्यंत चिंताजनक !’ – केरळचे मुख्यमंत्री विजयन्

केरळचे मुख्यमंत्री विजयन्

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांनी या प्रकरणी ‘एक्स’वर म्हटले की, नागपूर येथे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या आरोपावरून एक मल्ल्याळी पाद्री, त्याचे कुटुंबीय आणि त्याचे सहकारी यांना अटक करण्यात आल्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे. ही घटना संघ परिवार अवलंबत असलेल्या अल्पसंख्यांकांना लक्ष्य करून समाजात फूट पाडण्याच्या धोकादायक प्रवृत्तीचेच उदाहरण आहे. याआधी असे जबलपूर (मध्यप्रदेश) येथेही दिसून आले होते. अशा कृतींमुळे राज्यघटनात्मक स्वातंत्र्य दुर्बल होते. (हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांना अटक केल्यास ती घटना चिंताजनक कशी ? म्हणजे देशात हिंदूंचे धर्मांतर करणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे, असे विजयन् यांना म्हणायचे आहे का ? – संपादक)