
गत काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील देवस्थानांमध्ये भाविक-भक्तांची गर्दी वाढत आहे; मात्र तितक्या प्रमाणात त्यांना मिळणार्या सुविधांची वानवा दिसून येते. जेजुरीत नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून ते प्रकर्षाने लक्षात आले. नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर विजयी नगरसेवक त्यांच्या समर्थकांसह जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनाला गेले होते. या वेळी पायथ्याशी असलेल्या कमानीजवळ त्यांनी जयघोष करत फटाके उडवून आनंद व्यक्त केला. त्याच वेळी देवाला भंडारा उधळला; मात्र अचानक आगीचा भडका उडाला. या वेळी तेथे उपस्थित असलेले १५० हून अधिक कार्यकर्ते अक्षरशः होरपळून निघाले. यांतील १६ कार्यकर्ते गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. भाविकांसाठी त्या ठिकाणी पुरेशी आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्था नव्हती. या प्रसंगामुळे २० वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात मांढरदेवी यात्रेत घडलेल्या दुर्घटनेची आठवण झाली. तेव्हा सिलिंडर फुटून अचानक लागलेल्या आगीमध्ये ३५० हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता. या वेळी भाविकांच्या सुरक्षेविषयी राष्ट्रीय स्तरावर चर्चा होऊन त्यांच्या आरोग्याविषयी कठोर उपाययोजना काढण्यात येईल, असे आश्वासनही तत्कालीन राज्य सरकारने दिले होते; मात्र यावर काहीच कृती झालेली नाही.

जेजुरी येथे भाविकांच्या श्रद्धेचा अपलाभ घेत देवतांना अर्पण करण्यासाठी हळद, कुंकू आणि पूजासाहित्य निकृष्ट प्रतीचे विकण्याचा उद्योग चालू आहे. याविषयी जेजुरी देवस्थानाचे माजी विश्वस्त शिवराम झगडे यांनी १० मासांपूर्वी अन्न आणि औषध खात्याचे मंत्री नरहरि झिरवाळ यांना निवेदन दिले होते. भंडारा म्हणून विकल्या जाणार्या रासायनिक कृत्रिम पिवळ्या रंगाची होणारी विक्री तात्काळ थांबवण्याची मागणी केली होती; परंतु अन्न आणि औषध प्रशासनाने यावर उपाययोजना किंवा तात्काळ कार्यवाही केली नाही. परिणामी जेजुरीच्या पायथ्याशी भंडार्याचा भडका उडाला. भंडार्यातील भेसळीमुळे भाविकांच्या डोळ्यांना जळजळ होणे, अंगाला खाज येणे, अंगावर चट्टे उठणे, असे प्रकार झाले. भाविकांच्या आरोग्याशी अशा प्रकारे खेळ करणे उचित नाही. राज्य सरकार, अन्न आणि औषध प्रशासन, तसेच संबंधित देवस्थानांचे व्यवस्थापक यांनी अशा घटनांकडे गांभीर्याने पहायला हवे. सरकारने तात्काळ जेजुरीसह महाराष्ट्रातील सर्वच देवस्थानांच्या परिसरात रासायनिक पिवळा रंग, बनावट भंडारा, बनावट हळदी-कुंकवासह आरोग्याला घातक असलेल्या पूजासाहित्याची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमावे. या दुर्घटनेतून धडा घेऊन राज्य सरकारने भेसळयुक्त भंडारा विकणार्यांवर कठोर कार्यवाही करावी, अन्यथा आणखीन मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही !
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?