HALAL Ban Demand : मांसाहारी उत्पादनांखेरीज हलाल प्रमाणपत्राच्या वापरावर ताबडतोब बंदी घाला ! – Medha Kulkarni

भाजपच्या खासदार प्रा.डॉ.(सौ.) मेधा कुलकर्णी यांची ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’कडे स्पष्ट मागणी

(एफ्.एस्.एस्.ए.आय. म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण)

राजीत पुन्हानी यांना लिखित निवेदन देताना मेधा कुलकर्णी

नवी देहली : भारतात वाढत्या हलाल प्रमाणीकरणाचा अनियंत्रित प्रसार हा गंभीर चिंतेचा विषय आहे. हे प्रमाणीकरण मांसाहारी पदार्थांच्या पुढे जाऊन पीठ, शाकाहारी खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे यांसारख्या सामान्य उत्पादनांसाठीही घेण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे ग्राहकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. यासह हा प्रकार म्हणजे एक समांतर आणि खासगी प्रमाणीकरण व्यवस्थेस प्रोत्साहन देऊन पारदर्शकता अन् दायित्वनिश्चिती या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे मांसाहारी उत्पादनांखेरीज हलाल प्रमाणपत्राच्या वापरावर ताबडतोब बंदी घाला, अशी आग्रही मागणी पुण्याच्या भाजपच्या खासदार प्रा.डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीत पुन्हानी यांना लिखित निवेदन देऊन केली आहे.

कुलकर्णी म्हणाल्या की,

या निवेदनाद्वारे मी ही स्पष्ट मागणी केली आहे की, हलाल प्रमाणीकरण हे केवळ सरकार किंवा सरकारमान्य संस्थांद्वारे दिले जावे. तसेच ते केवळ मांस आणि मांसआधारित उत्पादनांपुरतेच मर्यादित रहावे. मांसाहारी उत्पादनांखेरीज याचा वापर ताबडतोब बंद केला पाहिजे. ग्राहक अधिकारांचे संरक्षण, निष्पक्ष व्यापार आणि भारताच्या बाजारपेठेचे धर्मनिरपेक्ष नि तटस्थ स्वरूप राखणे, यांसाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे.

‘हलाल’ प्रमाणपत्र म्हणजे काय ?

(चित्रावर क्लिक करा)

इस्लामनुसार ‘हलाल’ म्हणजे जे वैध आहे, ते. पूर्वी ‘हलाल’ हे केवळ मांसापुरते मर्यादित होते; मात्र आता धर्मांधांना त्यांची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करायची असल्यामुळे गृहसंस्था, औषधे, सौंदर्यप्रसाधने आदी विविध गोष्टींना ‘हलाल’ प्रमाणपत्र थोडक्यात ‘ते इस्लामनुसार प्रमाणित आहे’, अशा आशयाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी काही इस्लामी संघटना कार्यरत आहेत. त्यांनी संमत केलेल्या प्रमाणपत्राला ‘हलाल’ प्रमाणपत्र म्हटले जाते. देशाला समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था उभारून प्रचलित अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी धर्मांधांनी ‘हलाल’ प्रमाणपत्राच्या माध्यमातून रचलेला हा कट आहे .

संपादकीय भूमिका

या मागणीला राष्ट्रव्यापी स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी हिंदु जनतेने आपापल्या क्षेत्रातील खासदारांना अशी मागणी करण्यासाठी भाग पाडले पाहिजे. यानेच ही जनचळवळ बनून ‘हलाल’वर कायमस्वरूपी बंदी घातली जाईल, हे लक्षात घ्या !