अष्टदिशांची वैशिष्ट्ये आणि अष्टदिक्पाल !

वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक ७

दिशा आणि वास्तूशास्त्र – भाग २

ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली, तेव्हा त्यात एखाद्या वस्तूचे स्थान निश्चित करण्यासाठी भगवंताने दिशांची निर्मिती केली. दिशांमुळे एखादी वस्तू नेमकेपणाने कुठे आहे, हे आपण सांगू शकतो, उदा. मी गोव्यात रहातो; पण ‘गोव्यात कोणत्या दिशेला ? उत्तर कि दक्षिण ?’, असे नेमकेपणाने सांगितले, तरच आपण नेमकेपणाने स्थान समजून घेऊ शकतो. ‘दिशा’ हा विषय वास्तूशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे; कारण दिशांचे ज्ञान झाल्यासच आपण वास्तूशास्त्राच्या नियमांचा विचार करू शकतो. वास्तूशास्त्र असो, साधना असो किंवा आयुष्य असो, या सर्व ठिकाणी दिशा स्पष्ट असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक दिशेचे कारकत्व शास्त्राने निश्चित करून दिले आहे. (मनुष्याच्या जीवनातील ज्या विषयावर दिशा परिणाम करते, त्याला त्या दिशेचे ‘कारकत्व’ असे म्हणतात.) दिशेच्या शुभाशुभतेनुसार मनुष्याला फल अनुभवायला मिळते. प्रत्येक दिशेचा एक पालक आहे, त्याला ‘दिक्पाल’ असे आपण म्हणतो. हे दिक्पाल त्या दिशेचे अधिपती असतात आणि दिशेच्या कारकत्वानुसार फल देण्याचे कार्य करतात. वास्तूशास्त्राच्या दृष्टीने कुठे काय असावे किंवा काय नसावे ? हे समजून घेण्यापूर्वी प्रत्येक दिशेचे वैशिष्ट्य आणि कारकत्व समजून घेतल्यास वास्तूचे नियम कसे सिद्ध झाले ? हे आपल्या लक्षात येऊ शकेल. आपण प्रत्येक दिशेचे वैशिष्ट्य जाणून घेऊया.

मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/988677.html

१. पूर्व दिशा

अ. देवता : ही प्रथम दिशा असून याच दिशेला प्रात:काळी सूर्याेदय होतो. या दिशेची देवता सूर्य आहे. सूर्याकडूनच आपल्याला आत्मिक ऊर्जा मिळते.

आ. पालक, वाहन, नगर, आयुध : या दिशेचा पालक इंद्र असून शची (सुख देणारी) ही त्याची पत्नी आहे; म्हणून सर्व प्रकारचे सौख्य या दिशेकडून मिळते. ऐरावत (अतिशय श्रीमंती) हे त्याचे वाहन आहे, तर अमरावती हे त्याचे नगर असल्याने सर्व प्रकारच्या आधुनिक सोयीसुविधा आपल्याला पूर्व दिशेकडून मिळतात. त्याचे आयुध वज्र, म्हणजे अत्यंत प्रभावी अस्त्र !

श्री. श्रेयस पिसोळकर

इ. लाभ : या दिशेला ऐश्वर्यलक्ष्मीचे स्थान आहे; म्हणून वास्तूच्या सर्व ग्रंथांमध्ये घर पूर्वाभिमुख असण्याविषयी आग्रह धरलेला आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी ही दिशा महत्त्वाची आहे; कारण ती प्रसिद्धी मिळवून देणारी दिशा आहे. त्याचप्रमाणे अपत्यप्राप्तीसाठी ही दिशा निर्दाेष असणे आवश्यक असते. पूर्व दिशा मनुष्याच्या जीवनात प्रसिद्धी, आरोग्य आणि विद्या या विषयांवर परिणाम करते.

ही दिशा कायम उघडी असल्यास सकारात्मक ऊर्जेचा घरातील व्यक्तींना लाभ होतो.

२. आग्नेय दिशा

अ. देवता : या दिशेची देवता शुक्र आहे. प्रणय, चैनीच्या वस्तू, संततीसौख्य, ऊर्जा, अग्नि इत्यादी गोष्टी आपल्याला आग्नेय दिशेकडून मिळतात.

आ. पालक, वाहन, नगर, आयुध : अग्नी हा या दिशेचा पालक आहे. सतत कार्यमग्न आणि ऊर्जावान रहाण्यासाठी ही दिशा आपल्याला साहाय्य करते. ज्याप्रमाणे पुष्कळ अधिक अग्नी मनुष्याला त्रासदायक ठरतो आणि अल्प अग्नीचा उपयोग होत नाही, त्याचप्रमाणे ही दिशा संतुलित असली, तरच वास्तू ऊर्जावान रहाते. अग्नीची नगरी तेजोवती (तेज प्रदान करणारी) आहे. मेंढा हे अग्नीचे वाहन आहे. मेंढा म्हणजे सतत कार्यमग्नता !

कोप आणि क्रोध हे दिशापालकाचे शस्त्र असल्याने दिशा नकारात्मक असल्यास घरात क्रोधपूर्ण वातावरण रहाते. कुटुंबामधील वादविवाद आणि भांडणे यांचा प्रारंभ आग्नेय दिशा दोषपूर्ण असल्यानेच होतो.

इ. पत्नी : दिशापालकाची पत्नी स्वाहा आहे, म्हणजे येथील शक्तीच्या साहाय्याने वास्तूतील नकारात्मक ऊर्जा संपवून सकारात्मक ऊर्जा वाढवता येते. त्यासाठी ही दिशा महत्त्वाची आहे.

ई. लाभ : धान्यलक्ष्मीचे स्थान आग्नेय दिशेला असते; म्हणून जीवनावश्यक प्राणऊर्जा येथून मिळते. शुक्र ग्रह चैन आणि व्यसनाधीनता यांचा कारक आहे. त्यामुळे ही दिशा बिघडल्यास व्यक्तीलाही ती त्याच दिशेला घेऊन जाते. शुक्र हा स्त्रीग्रह असल्याने घरातील स्त्रियांचे आरोग्य परिपूर्ण ठेवतो. दिशा बिघडल्यास स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होतो. लहान मुलांना ऊर्जा देणारी ही दिशा आहे. त्यामुळे व्यायामशाळा किंवा कष्टाची साधने या दिशेला असणे चांगले !

३. दक्षिण दिशा 

अ. देवता : या दिशेची देवता मंगळ आहे.

आ. महत्त्व : ‘ही दिशा नकारात्मक आहे’, असा अपसमज समाजामध्ये सर्व ठिकाणी पसरलेला आहे; पण वास्तूशास्त्रानुसार या दिशेला नकारात्मक म्हटलेले नाही. या दिशेचा पालक यम आहे. यम ही मृत्यूची देवता असल्याने अंतिम सत्य सांगणारी दिशा आहे. त्यामुळे भौतिक गोष्टींमध्ये गुंतलेल्या लोकांना ही नकोशी वाटते; परंतु या दिशेला ‘मोक्ष’ हा पुरुषार्थ असल्याने ज्यांनी भौतिक सुखाचा त्याग केलेला असतो, अशांसाठी ही दिशा भरपूर ऊर्जा प्रदान करणारी आहे.

इ. पत्नी : दिशा पालकाची पत्नी शामला ही देवी आहे. जी रूप-रंगापेक्षा गुणकर्माला अधिक महत्त्व देते. आजच्या काळात गुणकर्म कुणाला नको असल्याने ही दिशा नकारात्मक वाटते.

ई. नगर, वाहन, आयुध : दिशा पालकाचे संयमनी हे नगर आहे, म्हणजे बुद्धीने आणि संयमाने जे आचरण करतात, त्यांना ती लाभ देते. ही दिशा बिघडल्यास नीती-नियम, संयम या गोष्टी पाळल्या जात नाहीत. महीष हे या दिशेचे वाहन आहे, म्हणजेच आळस आणि स्वत:मध्ये मग्न रहाणे यांवर ही दिशा परिणाम करते.

कालपाश हे दिशापालकाचे आयुध आहे, म्हणजे वास्तूमध्ये दक्षिण दिशा योग्य असल्यास अनुकूल काळाचा आपल्याला लाभ करून घेता येतो.

उ. लाभ : आदिलक्ष्मीचे स्थान या दिशेला असते. ही दिशा मंगळ ग्रहाची असल्याने या दिशेकडून धैर्य मिळते. मंगळ हा सेनापती असल्याने बुद्धी आणि सामर्थ्य यांचा वापर करण्यासाठी ही दिशा प्रेरित करते. ही दिशा लयाला नेणारे व्यवसाय, उदा. जुगार, मद्यपान इत्यादी गोष्टींना प्रेरित करते. ही ‘संकटांची दिशा’ असेही मानले जाते. ही दिशा जेवढी बंद ठेवता येईल तेवढे चांगले !

४. नैऋत्य दिशा

अ. देवता : या दिशेची देवता राहू आहे. ही पृथ्वीतत्त्वाची दिशा असल्याने स्थिरता प्रदान करते; परंतु दिशापालक निर्ऋती हा असुर कुळातील असल्याने जडत्व, कष्ट, रोग, संकटे हीसुद्धा या दिशेची कारकत्वे आहेत.

आ. वाहन : निर्ऋती हा दिशापालक मनुष्यालाच आपले वाहन समजतो, म्हणजेच मनुष्याच्या मनावर आरूढ होऊन त्याची सारासार बुद्धी संपवण्याचे कार्य करतो.

इ. लाभ : भूत, प्रेत, पिशाच, राक्षस अशा वाईट शक्तींची ही दिशा आहे. त्यामुळे ही दिशा बिघडल्यास वाईट शक्तींचा त्रास वास्तूमध्ये वाढू शकतो. ही दिशा जर आपण अनुकूल करून घेतली, तर मनुष्यावर आरूढ होणारा निर्ऋती हा दिशापालक घरमालकाला अधिपत्यही प्रदान करतो; म्हणून ‘या दिशेला घरमालकाची खोली असावी’, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे.

ई. पत्नी, नगर : दीर्घादेवी ही दिशापालकाची पत्नी आहे; म्हणजे या दिशेकडून मिळणारे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात. कृष्णांग हे नगर आहे, म्हणजेच कृष्णकृत्य करण्यास प्रवृत्त करणारी म्हणून दिशा योग्य आणि सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे, तरच वास्तूत नैतिकता टिकून रहाते.

उ. आयुध : कुंत म्हणजेच पाश, असे याचे आयुध आहे, म्हणजेच मोहपाशात अडकवणारे आहे. धैर्यलक्ष्मीची ही दिशा असल्याने ती योग्य असल्यास वास्तूतील लोकांना धैर्य प्रदान करते.

या दिशेत मोठे दोष निर्माण झाल्यास अपयश, अपघात, नैराश्य, आत्महत्या यांसारखे परिणाम होऊ शकतात. ही दिशा जेवढी बंद असेल, तेवढे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. ही दिशा अशुभ परिणामदायी आहे.

(क्रमशः पुढच्या शनिवारी)

– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (२३.१२.२०२५)

पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/993715.html