‘वास्तूशास्त्र’विषयक लेखमाला : लेखांक ६
दिशा आणि वास्तूशास्त्र (भाग १)
वास्तूशास्त्राच्या अनुषंगाने दिशा, उपदिशा यांचे महत्त्व आणि त्या एकमेकांवर कशा अवलंबून आहेत, यांविषयीचे विवेचन या लेखात येथे देत आहे.
भाग ५ वाचण्याकरिता क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/983822.html

१. दिशा निश्चितीचे महत्त्व
दिशा हा वास्तूशास्त्रामधील एक महत्त्वाचा भाग आहे; कारण दिशांच्या आधारेच सर्व वास्तूची रचना करणे आवश्यक असते. वास्तूमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे हा भाग लक्षात घेऊन वास्तूची रचना करायची असते. त्यासाठी अगोदर दिशा निश्चित करणे आवश्यक असते.
प्रासादे सदनेऽलिन्दे द्वारे कुण्डे विशेषत: ।
दिङ्मुढे कुलनाश: स्यात् तस्मात्संशोधयेत् दिश: ।। – वृद्ध नारद (नारद संहिता)
अर्थ : देवालय, घर, अलिन्द (व्हरांडा), द्वार, कुंड यांच्या निर्माणकाळी शुद्ध दिशांचे ज्ञान परम आवश्यक आहे. दिशांच्या अयोग्य ज्ञानामुळे (दिङ्मूढतेमुळे) गृहस्वामी अर्थात् कर्त्याच्या कुलाचा नाश होऊ शकतो.
वरील श्लोकातून वृद्ध नारदांनी दिशा निश्चित करण्याचे महत्त्व सांगितले आहे. ते न झाल्यास त्याच्या होणार्या परिणामांविषयीही सांगितले आहे. यातून आपल्याला दिशा निश्चित करण्याचे महत्त्व लक्षात येते.

२. दिशा निश्चितीत पूर्वी येणार्या अडचणी आणि सद्यःस्थितीत होकायंत्रामुळे दिशाशोधन करणे सहजशक्य !
पूर्वीच्या काळी दिशा निश्चित करण्यासाठी पूर्व दिशेला एक शंकू स्थापन करून त्याच्या विविध वेळांमध्ये पडणार्या सावलींच्या नोंदी करून त्यानुसार पूर्व दिशा निश्चित केली जायची; परंतु ही प्रक्रिया बराच काळ घेते; कारण सूर्य सर्वकाळ पूर्व दिशेला मधोमध उगवत नाही. वर्षातील ६ मास दक्षिणायन, तर ६ मास उत्तरायण असते. त्यामुळे या सर्व विषयांचा अभ्यास करून दिशा निश्चित करणे क्लिष्ट आहे. सध्याच्या काळात आपल्याकडे होकायंत्र सहज उपलब्ध असल्याने आपण चुंबकीय उत्तर सहज शोधू शकतो आणि त्यानुसार दिशाशोधन करून शकतो.
विदिक्षु वास्तूची छायाचित्रे
३. दिशा आणि उपदिशा
सध्या बर्याच जणांचा असा समज असतो की, स्वतःचे घर पूर्व-पश्चिम असले की, ते वास्तूशास्त्रानुसार योग्यच आहे; परंतु वास्तूशास्त्रानुसार अभ्यास करतांना बर्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. घर जरी पूर्व-पश्चिम असले, तरी देवघर, मुख्य शयनकक्ष, स्वयंपाकघर, शौचालय आदी गोष्टी कोणत्या दिशेला आहेत ? याचा विचार करावा लागतो. आपली सर्वसाधारण धारणा असते की, ४ भिंतींच्या ठिकाणी ४ मुख्य दिशा आणि कोपर्यातील भाग म्हणजे उपदिशा; परंतु वास्तूशास्त्रानुसार आठही दिशांना ३६० अंशांपैकी समान भाग दिलेला असतो, म्हणजे प्रत्येक दिशा ही ३६०/८ = ४५ अंश इतकी असते, उदा. पूर्व दिशेची लांबी एकूण १६ फूट आहे, तर तिचे समान ४ भाग केल्यानंतर उजवीकडील पहिला ४ फुटांचा भाग आग्नेय दिशेचा असतो. मधले ४ फुटांचे दोन भाग हे पूर्व दिशेचे असतात, तर डावीकडील ४ फुटांचा एक भाग ईशान्य दिशेचा असतो. वास्तूच्या मधोमध १/९ भाग हा ब्रह्ममंडलाचा असतो.
बर्याच वेळा वास्तूच्या ४ भिंतींच्या मध्यभागी मुख्य दिशा न येता उपदिशा येतात, तेव्हा २२.५ अंशाहून अधिक ४५ अंशांपर्यंत जर दिशा एका बाजूला झुकलेली असेल, तर त्या वास्तूला ‘विदिक्षु वास्तू’ असे म्हटले जाते. विदिक्षु वास्तूमध्ये प्रचंड प्रमाणात संघर्ष असतो. अशी वास्तू वास्तूशास्त्राला अभिप्रेत नाही. आर्थिक प्राप्तीसाठी या वास्तूमध्ये दुप्पट श्रम करावे लागतात; परंतु विदिक्षु वास्तूमध्ये रहाणार्या लोकांना अशा वास्तूमध्ये राहिल्यामुळे आपल्याला त्यामानाने अल्प यश मिळाले आहे, हे लक्षात येत नाही. (लेखात वर दिलेली विदिक्षु वास्तूची छायाचित्रे पहावीत.)
४. वास्तूच्या मधोमध ब्रह्ममंडलामध्ये उभे राहून होकायंत्राद्वारे दिशादर्शन करावे !
वास्तूच्या दिशांचे निरीक्षण हे वास्तूच्या मधोमध ब्रह्ममंडलामध्ये उभे राहून होकायंत्राद्वारे करायचे असते. ब्रह्ममंडलामधून निरीक्षण केल्यासच आपल्याला योग्य दिशांचे ज्ञान होऊ शकते.
अ. ४ प्रमुख दिशा : पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर
आ. ४ उपदिशा : आग्नेय, नैर्ऋत्य, वायव्य, ईशान्य
इ. २ महत्त्वाच्या दिशा : ऊर्ध्व (आकाश) आणि अधो (भूमी)
५. उपदिशांना विशेष नाव असणारे ‘भारत’ हे एकमात्र राष्ट्र असणे
भारतीय शास्त्रांमध्ये ४ प्रमुख दिशांना जसे विशेष नाव दिले आहे, तसे उपदिशांनाही विशेष नाव दिले आहे. उपदिशांना विशेष नाव असणारा भारत हे एकमात्र राष्ट्र आहे. मुख्य दिशेप्रमाणेच उपदिशांनाही तेवढेच महत्त्व असल्याने शास्त्रकारांनी उपदिशांना विशेष नाव दिले आहे. इतर राष्ट्रांमध्ये उपदिशांना ‘दोन दिशांनी मिळून सिद्ध झालेली दिशा’ असे नाव दिले आहे, उदा. North-East (उत्तर-पूर्व), South-East (दक्षिण-पूर्व) इत्यादी.
६. दिशांची वैशिष्ट्ये
आपल्या शास्त्रानुसार उपदिशांचीसुद्धा वैशिष्ट्ये, कारकत्व (जे फळ देण्यासाठी ती दिशा बाध्य असते), स्वामी, दिशापालक निरनिराळे असल्याने त्यांना स्वतंत्र नाव देण्यात आले आहे. दिशांच्या नावानुसार त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात येऊ शकतात.
अ. पूर्व : पूर्व म्हणजे जी प्रथम येते ती, प्रथम दर्जाची दिशा
आ. दक्षिण : दक्षिण म्हणजे हळूहळू क्षीण करणारी दिशा.
इ. पश्चिम : पश्चिम म्हणजे पश्चात् अर्थात् नंतर येणारी किंवा मागे असायला हवी अशी दिशा.
उ. उत्तर : जेथे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळू शकते
ऊ. आग्नेय : ज्या दिशेला अग्नितत्त्वाचे स्थान असते.
ए. नैर्ऋत्य : ज्या दिशेला निर्ऋति अर्थात् राक्षसांचे स्थान असते.
ऐ. वायव्य : वायुतत्त्वाची दिशा म्हणजे वायुप्रमाणे चंचल.
ओ. ईशान्य : अर्थात् ईश्वराची दिशा, ज्या ठिकाणी देवतांचा वास असतो.
७. दिशांसह उपदिशांचीही वास्तूशास्त्रामध्ये विभागणी करण्याचे कारण !
मोठ्या क्षेत्रफळाच्या वास्तूमधील एखादे स्थान निश्चित करण्यासाठी उपदिशांचीही विभागणी केली आहे, उदा. आग्नेय दिशेचे दोन भाग केल्यास एक पूर्व दिशेला लागून असलेल्या भागाला ‘पूर्व आग्नेय’ म्हणतात, तर दक्षिण दिशेला लागून असलेल्या भागाला ‘दक्षिण आग्नेय’ असे म्हणतात. पूर्व-आग्नेय आणि दक्षिण-आग्नेय या दिशांचे परिणाम वेगवेगळे जाणवतात. पूर्व-आग्नेय दिशा वाढली, तर त्याचे परिणाम वेगळे असतात आणि दक्षिण आग्नेय दिशा वाढलेली असल्यास त्याचे परिणाम वेगळे अनुभवण्यास येतात; म्हणूनच या उपदिशांचीही वास्तूशास्त्रामध्ये विभागणी केली आहे.
७ अ. उपदिशांची विभागणी !

(संदर्भ ग्रंथ : ‘नारद संहिता’, ‘मयमतम्’, ‘विश्वकर्मप्रकाश’)
(क्रमशः पुढच्या शनिवारी)
– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा.
| लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/990997.html |

लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !