भोगवादी जीवनशैली स्वीकारल्यानंतर पृथ्वीचा नाश चालू झाला ! – आचार्य प्रशांत, वेदांत शिक्षक

आचार्य प्रशांत, वेदांत शिक्षक

पुणे, २३ डिसेंबर (वार्ता.) – वातावरणातील पालट हा अक्षम्य दुर्लक्षामुळे झाला आहे आणि आपण त्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत; मात्र त्यामागील कारण आंतरिक आहे. आपण भोगवादी जीवनशैली स्वीकारल्यानंतर पृथ्वीचा खरा नाश चालू झाला, असे मत वेदांताचे शिक्षक आणि तत्त्वज्ञ आचार्य प्रशांत यांनी व्यक्त केले. ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवातील ‘पुणे लिट फेस्ट’मधील ‘फीयरलेस ट्रुथ अँड द गीताज कॉल’ (निर्भय सत्य आणि गीता) या सत्रात ते बोलत होते. आपल्या सर्व इच्छा आपण स्वतः न ठरवता समाज ठरवत आहे. मला काय बनायचे आहे ? काय केल्याने, कोणती नोकरी केल्याने स्थैर्य मिळेल ? या गोष्टी आपण पाहून आपण निर्णय घेतो. म्हणजेच आपले निर्णय हे आपले स्वतःचे नसतात, तर समाजामध्ये घडणार्‍या गोष्टी पाहून आपण स्वतःविषयी निर्णय घेतो.

आचार्य प्रशांत यांनी सांगितलेली इतर सूत्रे

१. जीव, जग आणि निर्माता वेगळे नाहीत.

२. ज्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो, ती गोष्ट पडताळून आणि पारखून घ्यायला हवी.

३. भावना चांगली असते; मात्र भावनेला इतर अनेक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत, मुख्यतः अहंकार ! जर आपण अहंकार काढून टाकला तर भावना शुद्ध भावना बनेल !

४. इतरांनी नियंत्रित केलेली गोष्ट आपली कशी होते ? दूरचित्रवाणी संचावर दाखवलेल्या गोष्टी पाहून आपल्याला अश्रू येतात. माध्यमांना काय दाखवायचे हे माहीत आहे, ज्यामुळे लोकांच्या डोळ्यात अश्रू येतील. म्हणजेच आपल्या भावनांचा ‘रिमोट’ दुसर्‍याच्या हातात आहे. मग इतरांनी नियंत्रित केलेली भावना आपली कशी ?

५. जर जीवनाचा उद्देश, उत्तरोत्तर प्रगती असाच आहे, तर प्रेमात, ‘तू जसा आहेस तसाच मला आवडतोस’, असे म्हणणे चुकीचे आहे.

६. आपण आपले ध्येय इतके मोठे ठेवले पाहिजे की, आपण ते साध्य करू शकणार नाही. कारण जर ध्येय साध्य करतांना मनुष्याची विचारप्रक्रिया पालटली नाही, तर सर्व प्रयत्न व्यर्थ जातात.

७. प्रतिक्रिया सर्वात वाईट असते. आत बसलेला अहंकार प्रतिक्रियेतून बाहेर येतो; परंतु आपल्याला समजून घेण्यासाठी प्रामाणिकपणाची आवश्यकता असते.