‘धुरंधर’ चित्रपटाचे ‘साळींदर विरोधक’ आणि ‘अत्यंत हुशार प्रेक्षक’ !

५ डिसेंबर २०२५ या दिवशी ‘धुरंधर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. लगेचच बिळात लपलेले ‘सेक्युलर’वादी (निधर्मीवादी) स्वतःचे साळींदरासारखे वैचारिक काटे समाजमनात घुसवायला कार्यरत झाले. या वृत्तीवर मात करण्यासाठी हिंदु समाजाने अत्यंत हुशार होणे आवश्यक आहे. त्याविषयी ऊहापोह करणारा हा लेख श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.         

(पूर्वार्ध)

संकलन : श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०२५)

धुरंधर चित्रपटाचे भित्तीपत्रक

१. ‘साळींदर वृत्ती’ म्हणजे काय ?

साळींदर हा एक उंदीर, घुस यांच्या प्रजातीतील अंगावरील काट्यांसाठी ओळखला जाणारा प्राणी आहे. साळींदर एकटा किंवा जोडीदारासह रहातो. तो रात्रीच्या वेळी बिळातून बाहेर पडतो. धोका दिसताच तो स्वतःचे काटे फुगवून मोठा दिसण्याचा प्रयत्न करत शेपटी जमिनीवर आपटून आवाज करतो. मराठीमध्ये फटकळ स्वभावाच्या आणि टोचून बोलणार्‍या व्यक्तीला उपहासाने ‘साळींदर’ म्हणतात. निगरगट्ट स्वभावाच्या व्यक्तीला ‘साळींदरी कातडीचा’ असेही कधी कधी संबोधले जाते. तर आज वरील सर्व विशेषणे लागू असलेल्या ‘साळींदर वृत्ती’च्या लोकांनी ‘धुरंधर’ चित्रपटाला विरोध चालवला आहे. अर्थात् हे सर्व काँग्रेसधार्जिणे आहेत, हे सांगणे न लगे !

श्री. सागर निंबाळकर

२. ‘धुरंधर’ चित्रपटाविरुद्ध पोटशूळ  उठण्याची महत्त्वाची ३ कारणे !

२ अ. या चित्रपटाचा प्रारंभ श्रीमद्भगवद्गीतेतील ‘हतो वा प्राप्यसि….’ या श्लोकाने होतो आणि साळींदरांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. या श्लोकात भगवान श्रीकृष्ण गलितगात्र अर्जुनाला ‘उठ आणि युद्धाला सिद्ध हो !’ असा उपदेश करतात.

२ आ. या चित्रपटात तत्कालीन काँग्रेसचे मंत्री आणि त्यांचा मुलगा हे भारतावर होत असलेल्या अतिरेकी आक्रमणाला साथ देतात, हे दर्शवले आहे. हा मंत्री कोण ?, हे सर्वज्ञात आहे.

२ इ. आजवर दाऊदप्रेमी बॉलिवूडकरांनी ‘वॉर २’, ‘रॉ’, ‘जवान’ यांसारख्या चित्रपटांनी ‘भारतीय गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी म्हणजे बळीचा बकरा’ असे चित्र समाजासमोर दर्शवले आहे. त्यांनी केलेला अपप्रचार (फेक नरेटिव्ह) या चित्रपटाने उधळून लावला आहे. प्रत्येक गुप्तहेरालाच नव्हे, तर प्रत्येक भारतियामध्ये आपले गुप्तहेर, गुप्तचर यंत्रणा आणि देश यांविषयी अभिमान निर्माण होईल, असे चित्रण या चित्रपटात आहे.

‘धुरंधर’ चित्रपट कसा आहे ?

आदित्य धार

आदित्य धार दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट भारतातील सुरक्षा सल्लागारांनी पाठवलेल्या हेराने पाकिस्तानमध्ये राहून केलेल्या कारवायांवर आधारित आहे. ३ तास ३४ मिनिटांचा हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पाकिस्तानमधील रक्तरंजित टोळीयुद्धाचा भारतविरोधी आतंकवादांसाठी केला जाणारा वापर, यात दर्शवला आहे. त्यामध्ये धर्मांध मुसलमानांची आसुरांनाही लाजवणारी खूनशी वृत्ती दर्शवणारे सत्य घटनांवर आधारित प्रसंग यात आहेत; मात्र चित्रपटाच्या शेवटी प्रेक्षक राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन पुढील भाग पहाण्याचा निश्चय करूनच बाहेर पडतात.

आदित्य धार यांनी केलेल्या उत्कृष्ट दिग्दर्शनाला चित्तथरारक छायाचित्रण, उत्कृष्ट आणि थेट संवाद यांची साथ लाभल्यामुळे चित्रपट अंगावर येतो. भारतियांच्या जिव्हारी लागणारे कंदाहार विमान अपहरण, संसदेवरील आक्रमण, २६/११ च्या आक्रमणांचे नियोजन यांसारख्या प्रसंगांमुळे चित्रपटाला एक वेगळीच धार येते. अक्षय खन्ना, आर्. माधवन् आदींचा अभिनय प्रभावी आहे. या चित्रपटात कथेच्या अनुषंगाने येणारी प्रेमकथा आहे; मात्र तिचा अतिरेक नाही. हा चित्रपट कोणतेही सूतोवाच न करता विदेशांमध्ये भारतविरोधी खलिस्तानी वा जिहादी आतंकवादी यांच्या अज्ञातांकडून हत्या कशा होत आहेत ?, याविषयी भारतियांची छाती अभिमानाने फुलेल, अशी माहिती देतो. त्यामुळे या चित्रपटाने १८ डिसेंबरपर्यंत ६५० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला आहे.

– श्री. सागर निंबाळकर

३. हिंदूंनी या साळींदरांना ‘बिलंदर’पणे, म्हणजे अत्यंत हुशारीने कोणती उत्तरे द्यावीत ?

या चित्रपटाच्या विरोधात अनेकांनी टीका केली. त्यातील अगदी मोजक्या टिकांचे आपण थोडक्यात खंडण पाहुया.

३ अ. हा चित्रपट पहाताच सेक्युलरवादाच्या आडून हिंदु धर्मावर आघात करणार्‍या पाकीट-समीक्षकांनी या चित्रपटावर टीका केली. ‘केवळ माहितीपर (डॉक्युमेंट्री), ‘राजकीय प्रचाराने प्रेरित’, ‘इस्लामविरोधाला खतपाणी’, ‘इतिहासाची मोडतोड’ अशी समीक्षणे प्रसिद्ध केली.

उत्तर :

१. वस्तूतः हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.

२. चित्रपट माहितीपर असला, तरी त्याचे चित्रपटमूल्य कुठेही अल्प झालेले नसल्यानेच आज भारतीय सुजाण प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतला आहे.

३. पाकिस्तानमधील घटनाक्रम या चित्रपटात आहेत. ते दर्शवण्याला कुणी ‘इस्लामविरोधाला खतपाणी’ म्हणत असेल, तर अशांचे ‘दानापाणी कुणाकडून चालू आहे’, याची चौकशी झाली पाहिजे.

४. लोकांची दिशाभूल करत हिंदूंचे बळी देऊन उभारलेले हिंदु-मुिस्लम ऐक्य दाखवणारा ‘शिकारा’, आतंकवाद्यांप्रती कणव निर्माण करणार्‍या ‘मिशन काश्मीर’ अशा चित्रपटांपेक्षा जर इतिहासाची मोडतोड करून जनतेला कुणी ‘धुरंधर’सारखे राष्ट्रप्रेमी कृतींसाठी प्रवृत्त करत असेल, तर ते नेहमीच स्वागतार्ह आहे.

३ आ. चित्रपट अभिनेते हृतिक रोशन म्हणाले, ‘‘या चित्रपटातील राजकारणाशी मी असहमत आहे. जगाचे नागरिक म्हणून हा चित्रपट काय परिणाम घडवत आहे ?, याचे दायित्व निर्मात्यांनी स्वीकारले पाहिजे.’’

उत्तर : भारतातील प्रत्येक नागरिक हा आधी भारतीय आहे आणि नंतर जगाचा नागरिक आहे. भारतियाचे अस्तित्व हे भारतामुळे आहे. त्यामुळे भारताच्या रक्षणाशी संबंधित कोणत्याही सूत्रामध्ये जगाचा विचार करायची आवश्यकता का ? हा चित्रपट भारतियांच्या वीरत्वाला साद घालतो. महाभारतात म्हटले आहे की, ‘वीरभोग्या वसुंधरा ।’ जर भारतातील प्रत्येकजण वीर बनला, तर भारतच काय, तर या जगाचे राज्यही भारतियांना भोगायला मिळेल ! तसेच ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (अर्थ : हे विश्व हेच एक कुटुंब !) ही भारतीय संस्कृती आहे; मात्र ‘त्यासाठी भारतीय सुरक्षेला धाब्यावर बसवावे’, असे सांगितलेले नाही किंवा तसे करणेही योग्य नाही. त्यामुळे हृतिक रोशन यांच्यासारख्यांनी ‘उंटावरून शेळ्या हाकण्या’पेक्षा वर दिलेल्या ‘वॉर २’ किंवा ‘जोधा अकबर’ सारख्या चित्रपटांतून स्वतः पसरवत असलेले विष आधी थांबवायला हवे !

(क्रमशः)

  लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/989924.html