‘वास्तूशास्त्रा’ची माहिती देणारी लेखमाला : भाग ५
भाग ४ वाचण्याकरिता क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/981617.html

१. सृष्टीच्या रचनेसाठी पंचमहाभूते एकत्र येत असणे
हिंदु धर्मशास्त्रानुसार सृष्टीची रचना पंचमहाभूतांपासून झाली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचमहाभूते (पंचतत्त्वे) आहेत. ही ५ तत्त्वे स्वयंभू आहेत. ती कुणी निर्माण करू शकत नाही आणि कुणी नष्टही करू शकत नाही. सृष्टीच्या एखाद्या रचनेसाठी ही ५ तत्त्वे एकत्र येतात आणि ती रचना नष्ट झाली की, ती पुन्हा मूळ स्वरूपाशी एकरूप होऊन जातात.
२. शरीर आणि पंचमहाभूते
माणसाचे शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. याविषयी ‘तैत्तिरीय उपनिषदा’त पुढील श्लोक आहे –
तस्माद्वा एतस्मादात्मन आकाश: संभूत: । आकाशाद्वायु: ।
वायोरग्नि: । अग्नेराप: । अद्भ्य: पृथिवी । पृथिव्या ओषधय: ।
ओषधीभ्योऽन्नम् । अन्नात्पुरुष: । – तैत्तिरीयोपनिषत्, वल्ली २, अनुवाक् १, श्लोक १
अर्थ : परम आत्म्यापासून आकाशाची उत्पत्ती झाली. आकाशापासून वायूची, वायूपासून अग्नीची, अग्नीपासून जलाची, जलापासून पृथ्वीची, पृथ्वीपासून औषधींची (वनस्पती), औषधींपासून अन्न आणि अन्नापासून पुरुषाची उत्पत्ती झाली आहे.
आयुर्वेदामध्येसुद्धा कोणत्या महाभूतापासून शरिरातील कोणता भाग निर्माण झाला, याविषयीचा सखोल अभ्यास दिला आहे.
३. पिंडी ते ब्रह्मांडी
जे जे आपल्या शरिराच्या ठिकाणी आहे, तेच या सृष्टीमध्येसुद्धा आहे. यालाच आपण ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ असे म्हणतो. ‘चरकसंहिते’मध्ये याविषयी सांगितले आहे –
एवं अयं लोकसम्मत: पुरुष: ।
यावन्तो हि लोके भावविशेष: तावन्त: पुरुषे ।
यावन्त: पुरुषे तावन्तो लोके इति । – चरकसंहिता, अध्याय ५, श्लोक ३
अर्थ : मनुष्य ही सृष्टीचीच रचना आहे. त्यामुळे बाह्य सृष्टी आणि पुरुष पंचमहाभूतात्मक आहेत. जेवढ्या गोष्टी बाह्य सृष्टीत आहेत, तेवढ्या मानवी शरिरातही आहेत आणि ज्या गोष्टी मानवी शरिरात आहेत, तेवढ्या बाह्य सृष्टीतही आहेत.

‘आपापल्या विषयातील असे सुंदर लेख सर्वच साधकांनी लिहावेत, म्हणजे समाजाला त्या त्या विषयांची ओळख तरी होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
४. वास्तूच्या रचनेत पंचमहाभूतांचे योग्य संतुलन साधणे आवश्यक !

मानवी शरिरातील ‘अस्थी’ या पृथ्वीतत्त्वापासून, रक्त आदी द्रव गोष्टी जल (आप) तत्त्वापासून, पचनाचे कार्य अग्नि (तेज) तत्त्वाच्या साहाय्याने, शरिरातील रक्ताभिसरण, उत्सर्जन आदी सर्व कर्मे वायूतत्त्वाच्या साहाय्याने होतात, तर शरिराच्या सर्व पोकळींमध्ये आकाशतत्त्व असते. या पंचमहाभूतांचे योग्य संतुलन आपल्या शरिरामध्ये असते. ते संतुलन बिघडल्यावर रोग किंवा आजार निर्माण होतात. त्यासाठी चिकित्सा करण्याची आवश्यकता असते.
मानवी शरिराप्रमाणे वास्तू हीसुद्धा सृष्टीची रचना आहे. त्यामुळे वास्तूही पंचमहाभूतांपासूनच निर्माण झाली आहे. वास्तूची रचना पंचमहाभूतांच्या दृष्टीने अनुकूल असणे आवश्यक आहे. त्यांचे वास्तूमध्ये योग्य संतुलन निर्माण होणे आवश्यक आहे. वास्तूच्या अयोग्य रचनेमुळे हे संतुलन बिघडले, म्हणजे अग्नितत्त्वाच्या दिशेमध्ये पाणी आले किंवा वायूतत्त्वाच्या दिशेत जड वस्तू आल्या, तर त्याचा थेट परिणाम वास्तूमध्ये रहाणार्या व्यक्तींचे शरीर आणि आयुष्य यांवर होतो; म्हणून वास्तूची रचना करतांना पंचमहाभूतांचे योग्य संतुलन होणे आवश्यक आहे.
५. पंचमहाभूतांची वास्तूतील दिशा, कार्य आणि वैशिष्ट्य !
५ अ. आकाशतत्त्व
५ अ १. या तत्त्वाचे स्थान वास्तूच्या मधोमध ब्रह्ममंडलामध्ये असते. आकाशतत्त्व म्हणजे पोकळी ! त्यामुळे वास्तूची मधली जागा मोकळी असणे आवश्यक आहे.
५ अ २. आकाशतत्त्वापासूनच इतर तत्त्वे निर्माण झाली आहेत. आकाशतत्त्वाकडून इतर तत्त्वांनाही ऊर्जा पुरवली जाते. या ऊर्जेचा प्रवाह ‘विदिक्षु’, म्हणजेच उपदिशांकडे होत असतो. हा प्रवाह विनाअडथळा झाल्यास सर्व तत्त्वे ऊर्जावान होऊन व्यवस्थित कार्य करू शकतात; म्हणूनच ब्रह्ममंडलामध्ये कोणताही अडथळा किंवा जड बांधकाम नसावे.
५ अ ३. ब्रह्ममंडल निर्दाेष का हवे ? : आकाशतत्त्व हे शरिराच्या पोकळींवर कार्य करते; म्हणून यात अडथळा निर्माण झाल्यास आतडे आणि पोट यांवर परिणाम होऊन पोटाचे विकार होऊ शकतात. आकाशतत्त्वाचे स्थान, म्हणजेच ब्रह्ममंडल जर निर्दाेष असेल, तर इतर सर्व तत्त्वे ऊर्जावान राहून घरातील वातावरण शांत रहाते. घराला परिपूर्णता प्राप्त होते; म्हणून वास्तूमध्ये ब्रह्ममंडलाचा विचार गांभीर्याने करणे आवश्यक आहे.
५ आ. अग्नितत्त्व
५ आ १. हे तत्त्व आग्नेय दिशेत कार्य करते. वास्तूमध्ये रहाणार्या लोकांना ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य हे तत्त्व करते.
५ आ २. तत्त्व नियंत्रित असायला हवे ! : अग्नी नियंत्रित किंवा संयमित असला की, त्याचा उपयोग बर्याच ठिकाणी करता येतो; पण तो अनियंत्रित झाल्यास हानी करतो. तत्त्वसुद्धा नियंत्रित आणि निर्दाेष असेल, तर ते साहाय्यभूत ठरते, अन्यथा हानी होते. हे तत्त्व घरातील पुढील पिढीसमवेतचे संबंध, लहान मुले आणि स्त्रियांचे आरोग्य यांवर परिणाम करते.
५ इ. पृथ्वीतत्त्व
५ इ १. जडपणा हे या तत्त्वाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. स्थिरता दर्शवणारे हे तत्त्व नैर्ऋत्य दिशेत कार्य करते. घरातील लोकांना या तत्त्वाच्या ऊर्जेमुळे स्थिरता प्राप्त होते. त्यामुळे ‘कुटुंबप्रमुखाने या दिशेत निवास करावा’, असे सांगितले आहे.
५ इ २. या दिशेमध्ये निर्माण होणारे दोष हे अस्थैर्य, कलह, वैवाहिक समस्या, उदासीनता आणि अपयश इत्यादी गोष्टी निर्माण करतात.
५ ई. वायुतत्त्व
५ ई १. निर्दाेष वायुतत्त्व घरातील नकारात्मकता संपवत असणे : वायुतत्त्व म्हणजे गतीमानता ! चंचलता हे त्याचे वैशिष्ट्य आहे. हे तत्त्व वायव्य दिशेला कार्य करते. वायू हा नकारात्मकता संपवणारा आहे. ज्याप्रमाणे शरिरामधील अशुद्ध रक्त शुद्ध करण्यात प्राणवायू साहाय्य करतो, त्याप्रमाणे वायुतत्त्व निर्दाेष असल्यास घरातील नकारात्मकता संपवण्याचे कार्य करते. या ठिकाणचे दोष अस्थिरता, वादविवाद आणि सातत्याचा अभाव हे असून ते परिणाम करतात. वायुतत्त्वाचा मनावरही मोठा परिणाम होतो. ज्या गोष्टी घरातून निघून जायला हव्यात, अशा गोष्टी वायव्य दिशेला असाव्यात.
५ उ. जलतत्त्व
५ उ १. जलतत्त्वामुळे मेंदूचा विकास होणे : पृथ्वीवर आणि मानवाच्या शरिरात हे तत्त्व सर्वाधिक प्रमाणात आहे. ते मनुष्याच्या विकासाला साहाय्यभूत ठरते. पाण्याविना मनुष्य जगू शकत नाही. हे तत्त्व ईशान्य दिशेला कार्य करते. या तत्त्वामुळे मेंदूचा चांगल्या प्रकारे विकास होतो.
५ उ २. भूमीखालील पाण्याचा साठा ईशान्य दिशेला असावा. या दिशेमध्ये दोष निर्माण झाल्यास शारीरिक आजार, मेंदूंचे आजार, कर्जबाजारीपणा, नातेवाइकांशी संबंध बिघडणे इत्यादी परिणाम होतात.
६. ४ पुरुषार्थ
हिंदु धर्मशास्त्रामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे ४ पुरुषार्थ सांगितले आहेत. वास्तूशास्त्रानुसार वास्तूमध्ये ४ मुख्य दिशांनुसार या ४ पुरुषार्थांचे स्थान निश्चित केले आहे. अर्थात् पुरुषार्थाशी संबंधित दिशा निर्दाेष असेल, तर वास्तूच्या मालकाला पुरुषार्थ साधण्यात कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत, म्हणजेच पुरुषार्थ सहज साध्य होतो.
६ अ. धर्म : वास्तूमध्ये ‘पूर्व’ दिशा ही ‘धर्म’ या पुरुषार्थाची असते. ‘स्व’धर्माचे पालन करणे, कर्तव्यांचे वहन करणे आणि शास्त्राने घालून दिलेल्या विधी-नियमांचे पालन करणे इत्यादी गोष्टी पुरुषार्थामध्ये येतात. या संसारसागराला पार करण्यासाठी धर्म, म्हणजे नौका आहे. त्याचे पालन करतच आपण मुक्त होऊ शकतो. अर्थ आणि काम हे दोन्ही पुरुषार्थ धर्मावर आधारलेले आहेत. पूर्व दिशेकडे हा पुरुषार्थ असल्याने त्या दिशेच्या शुभाशुभतेवर पुरुषार्थाची फले अवलंबून असतात. या दिशेमध्ये शौचालय, जिना किंवा अशुभ गोष्टी वास्तूत असल्यास ‘धर्म’ हा पुरुषार्थ व्यवस्थित साधला जात नाही.
६ आ. अर्थ : धर्माच्या आधारे धन मिळवून त्याचा योग्य विनियोग केल्याने ‘अर्थ’ पुरुषार्थ साधला जातो. उत्तर ही ‘अर्थ’ पुरुषार्थाची दिशा आहे. ही दिशा शुभ असता हा पुरुषार्थ चांगल्या प्रकारे साधला जातो. उत्तर दिशा बंद असेल किंवा त्या दिशेला जिना, शौचालय इत्यादी गोष्टी आल्या असतील, तर ‘अर्थ’ पुरुषार्थ साधण्यात अडचणी निर्माण होतात. त्यातून आर्थिक अडचणीही येतात.
६ इ. काम : पश्चिम दिशा ही ‘काम’ या पुरुषार्थाची आहे. धर्मानुसार आचरण करून धन मिळवणे आणि त्याचा उपयोग करून आपल्या कामनांची पूर्ती करणे, यालाच ‘काम पुरुषार्थ’ म्हणतात. ‘धर्मसंमत कामना’, असा इथे अर्थ अभिप्रेत असल्याने ही दिशा बिघडल्यास नैतिकतेवर परिणाम होतो. या दिशेला खड्डा किंवा उतार असणे अथवा पश्चिम दिशा उघडी असणे यांमुळे नैतिकदृष्ट्या पुरुषार्थ साधण्यात अडचणी निर्माण होतात.
६ ई. मोक्ष : मोक्ष हा अंतिम पुरुषार्थ आहे. या संसारातून बंधमुक्त होऊन भगवंताशी एकरूप होणे, म्हणजे मोक्ष होय. दक्षिण ही दिशा या पुरुषार्थाची आहे. हा पुरुषार्थ एकाच जन्मात साध्य होईल, असे नाही; पण प्रत्येक जन्मामध्ये साधना करून पुढच्या टप्प्याला जायचे, त्यादृष्टीने साधनेचे प्रयत्न अखंड करत रहावे लागतात. दक्षिण दिशेला उतार असणे, उत्तर दिशा बंद आणि दक्षिण दिशा उघडी असे दोष असतील, तर साधनेच्या प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे ही दिशा निर्दाेष असणे आवश्यक आहे.
वरील ४ पुरुषार्थांपैकी धर्म, अर्थ आणि काम हे ३ पुरुषार्थ साध्य करण्यासाठी आपल्याला निर्दाेष वास्तूची आवश्यकता असते; परंतु ‘मोक्ष’ हा पुरुषार्थ साध्य करण्यासाठी त्याचा मार्ग दाखवणार्या केवळ श्रीगुरूंची कृपाच आवश्यक असते.
(संदर्भ ग्रंथ : तैत्तिरीय उपनिषद, चरक संहिता, मयमतम्, विश्वकर्मप्रकाश)
– श्री. श्रेयस पिसोळकर; वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न, फोंडा, गोवा.
भाग ६ वाचण्याकरिता क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/988677.html
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !