३१ डिसेंबरच्या रात्री गोव्यात ठिकठिकाणी मेजवान्या होतात. त्यात मोठ्या प्रमाणावर मद्य आणि अमली पदार्थ यांचा व्यापार होतो. अशा वातावरणात गोव्यात ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या आयोजनाचा प्रारंभ झाला. तेव्हा अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे २ तरुणींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. कर बुडवणे, आवश्यक त्या शासकीय अनुमती न घेता या कार्यक्रमाचे आयोजन करणे, अशा अनेकविध कारणांमुळे ‘सनबर्न फेस्टिव्हल’ कायम वादात सापडला आहे. गोव्यात या फेस्टिव्हलला विरोध झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून हा फेस्टिव्हल गोव्याच्या बाहेर होतो. यंदाच्या वर्षी हा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ मुंबईत शिवडी येथे १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. विशेष म्हणजे शिवडी पोलिसांकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार कार्यक्रमाला अनुमती मिळण्याआधीच तिकीट विक्री चालू होती, हे आक्षेपार्ह आहे. हा तथाकथित ‘फेस्टिव्हल’ महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता यांना गालबोट लावणारा आहे. व्यसनाधीनता वाढवणार्या अशा कार्यक्रमांवर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी. पोलीस आणि अमली पदार्थविरोधी पथक यांनी अशा आयोजकांवर सतत लक्ष ठेवायला हवे. ‘युवा पिढीला अमली पदार्थांच्या गर्तेत ढकलणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या भूमीत कधीही होता कामा नये. मुंबईत होणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ तात्काळ रहित करा’, अशी मागणी ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’ने केली आहे. खरेतर अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर केंद्र सरकारकडूनच कारवाई होण्याची आवश्यकता आहे; कारण नवीन वर्षाच्या आदल्या रात्री, म्हणजेच ३१ डिसेंबरच्या रात्री अवघ्या सहस्रो अल्पवयीन मुले-मुली प्रथमच मद्यपान किंवा ‘ड्रग्ज’ची (अमली पदार्थांची) चव घेत असतात, त्यानंतर ते व्यसनाधीन बनतात.
लेखक – श्री. नित्यानंद भिसे, पनवेल
१. प्रतिवर्षी वाद निर्माण होत असतांनाही ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजन कसे होते ?
गेल्या १२ वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन कुठे ना कुठे होत आहे. प्रत्येक वर्षी कोणता ना कोणता वाद या कार्यक्रमाला जोडला जात आहे. कधी या कार्यक्रमाच्या कालावधीत अमली पदार्थांची विक्री होते; म्हणून हा कार्यक्रम वादात सापडला, तर कधी आयोजकांकडून शासकीय नियम धाब्यावर बसवून आयोजन केले; म्हणून कार्यक्रम वादात सापडला होता, कधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आवश्यक अनुमती न घेता कार्यक्रमाचे आयोजन केले; म्हणून वाद निर्माण झाला होता. असे असूनही ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजन प्रतिवर्षी होत असते. त्याला प्रतिवर्षी विरोध होत असतो; मात्र तरीही या कार्यक्रमाचे आयोजन कसे होते, हा यक्षप्रश्न आहे.
२. ‘ड्रग्ज’च्या अतीसेवनामुळे तरुण-तरुणींचा मृत्यू

वर्ष २००९ मध्ये गोव्यात जेव्हा ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी अमली पदार्थांचे अतीसेवन केल्यामुळे नेहा बहुगुणा नावाच्या युवतीचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी खरेतर या कार्यक्रमाच्या आयोजनामागील समाजविघातक दृष्टीकोन उघडकीस आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बिनदिक्कतपणे अमली पदार्थांची विक्री केली जाते. त्यातून सहस्रोंच्या संख्येने तरुण अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी जातात. तरुणांना व्यसनाधीन बनवण्यासाठी हा कार्यक्रम कारणीभूत ठरतो. वर्ष २०१४ मध्येही ‘सनबर्न सुपरसोनिक डान्स फेस्टिव्हल’मध्ये ईशा मंत्री नावाच्या युवतीचा मृत्यू झाला होता. तिचाही अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता. वर्ष २०१९ च्या वर्षाला निरोप देण्यासाठी तिसर्यांदा गोव्यात ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले, त्याआधीच येथे २ तरुणांचा मृत्यू झाला. त्या तरुणांचाही अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळेच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
३. व्यसनाधीनता, अश्लीलता आणि पर्यावरणाचा र्हास अन् सरकारी पायघड्या
वर्ष २०१६ मध्ये जेव्हा गोव्यात ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या आयोजनाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला, तेव्हा गोवा राज्याने नाईलाजास्तव या कार्यक्रमाला अनुमती नाकारली; मात्र या कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्या वर्षी थेट महाराष्ट्र गाठला. महाराष्ट्र सरकारने गोवा राज्यातील उपरोक्त सर्व घटनांकडे कानाडोळा करत थेट विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातच या कार्यक्रमाला अनुमती दिली. तिथे या कार्यक्रमासाठी खास व्यवस्था बनवण्यात आली होती. पुण्याजवळील ‘ऑक्सफोर्ड गोल्फ रिसोर्ट, बावधन’ येथे हा कार्यक्रम पार पडला. त्यासाठी करबुडवेगिरी, अमली पदार्थांचा वापर, मद्याचा महापूर, अश्लीलता, धांगडधिंगा, पैशांचा चुराडा आदी गैरप्रकार पहायला मिळाले. विशेष म्हणजे त्या वेळी कार्यक्रमाला रितसर अनुमती मिळालेली नव्हती, तरी आयोजकांनी कोट्यवधी रुपयांची तिकीट विक्री केल्याचा आरोप झाला होता. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, ध्वनीप्रदूषण, तसेच मानवी नीतीमूल्यांचे हनन करण्यात आले. या विरोधात पुण्यातील स्थानिक शिवसैनिक जयदीप पडवाल यांनी दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. आयोजकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ‘डीजे’ (मोठ्या आवाजाची आधुनिक ध्वनीक्षेपक यंत्रणा), १४ परमिट बार, अत्याधुनिक रेस्टॉरंट, ‘पार्टी पॉईंट’ (मेजवानीची ठिकाणे) यांसह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे, तर ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी ‘जेसीबी’ यंत्राद्वारे डोंगर खोदून रस्ता बनवण्यात आला होता. भूमी सपाटीकरणासाठी अनेक झाडेही तोडल्याचे वृत्त होते. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात सनबर्नच्या आयोजकांवर अवैध भूमी उत्खनन प्रकरणी आकारलेला ६० लाख ५२ सहस्र ३५३ रुपयांचा दंडसुद्धा माफ करण्यात आला आहे.
यामुळे सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाच्या विरोधात नाशिक येथील शिक्षणतज्ञ रतन लूथ यांनीही या फेस्टिव्हलच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ‘या फेस्टिव्हलच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असते’, असा मुद्दा त्यांनी मांडला होता. त्या वेळी न्यायमूर्ती एस्.एस्. खेमकर आणि न्यायमूर्ती आर्.जी. केतकर यांच्या खंडपिठाने राज्य सरकारला ‘अशा प्रकारे या ठिकाणी बेकायदेशीर मद्य विक्री करण्यास प्रतिबंध आणावा’, असे निर्देश दिले होते.
४. बेकायदेशीर आयोजन
‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या आयोजकांनी अशाच एका वर्षी पुन्हा एकदा गोव्यात शिरकाव केला. त्या वेळी गोवा सरकारने फेस्टिव्हलला अनुमती देण्यापूर्वी ‘आयोजकांनी यापूर्वी बुडवलेला ४२ लाख रुपयांचा कर भरावा’, असा आदेश महसूल विभागाने दिला होता; मात्र आयोजकांनी हा कर न भरता सनबर्न कार्यक्रमाचे आयोजन केले. त्या वेळी आयोजकांना २८ प्रकारच्या अनुमती घेणे सक्तीचे केले होते; परंतु आयोजकांनी राहिलेल्या ८ अनुमती न घेता हा कार्यक्रम आयोजित केला होता.
हे ही वाचा → Ban SUNBURN : ‘सनबर्न फेस्टिवल’च्या आयोजकांना ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’कडून कायदेशीर नोटीस !
५. तरुणांची हानी टाळण्यासाठी केंद्रीय पातळीवरूनच कारवाई होण्याची आवश्यकता !
गोवा राज्याने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारे बिनदिक्कतपणे पाश्चात्त्य विकृतीतील ज्या ज्या गोष्टी स्वीकारल्या, त्यातून गोवा राज्याचीच अतोनात हानी झाली आहे. मोठ्या प्रमाणात तरुण व्यसनाधीन बनले. ‘गोव्यात पर्यटनासाठी जाणार्या अन्य राज्यांतील तरुणांपैकी बर्याच जणांना दारू आणि अमली पदार्थांचे व्यसन हे गोव्यातच लागते’, असे म्हटले जाते. त्यात भर म्हणून आता ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या आयोजनासाठी ‘सनबर्न फेस्टिव्हल’सारख्या कार्यक्रमाच्या आयोजनाला या राज्याने अनेक वर्षे अनुमती दिली, आता या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईत होत आहे. त्यामुळे गोव्यात या सनबर्नच्या आयोजनाने तरुणांची अतोनात हानी झाली, आता तीच हानी महाराष्ट्रातील मुंबईत या सनबर्नचे आयोजन केल्यामुळे होणार आहे. यानिमित्ताने मुंबईचा गोवा होईल. त्यामुळे तरुणांची आणखी हानी होणार आहे. गोवा राज्याने या कार्यक्रमाच्या आयोजनाला अनुमती दिल्यानंतर कोणकोणत्या परिणामांना सामोरे जावे लागले, त्याची माहिती सर्वश्रुत असतांनाही महाराष्ट्रात ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला अनुमती दिली गेल्यास ही अत्यंत चिंतेची आणि संतापजनक घटना ठरेल. खरेतर अशा प्रकारच्या आयोजनावर आता केंद्रीय पातळीवरूनच कारवाई होण्याची आवश्यकता आहे.
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’, मराठी; १४.१२.२०२५)

‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
महाराष्ट्रात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ! – CM Devendra Fadnavis
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग