Shankhnad Mahotsav Delhi : हिंदुविरोधी मानसिकता उखडून फेकण्यासाठी मंदिरमुक्तीचा लढा व्यापक करा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय  

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव देहली २०२५ 

‘सनातन राष्ट्र : चुनौतियां एवं चिंतन’ या हिंदी भाषेतील सनातन संस्थेच्या ग्रंथाचे प्रकाशन !

ग्रंथ प्रकाशन करतांना डावीकडून श्री. रमेश शिंदे, अधिवक्ता विष्णु शंकर जैन, श्री. उदय माहुरकर, डॉ. सुरेश चव्हाणके, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

भारत मंडपम्, देहली (वार्ता.) – काशी आणि मथुरा येथील मंदिरे मुक्त करण्यासाठी दिलेला न्यायालयीन लढा ही माझ्यासाठी आध्यात्मिक यात्राच आहे; कारण केवळ दैवी कृपेने आम्ही हा लढा जिंकत आहोत, लढत आहोत. ‘तुमच्यापेक्षा आमची श्रद्धा आणि श्रद्धास्थाने श्रेष्ठ आहेत’, ही धर्मांधांची हिंदुविरोधी मानसिकता उखडून फेकण्यासाठी मंदिरमुक्तीचा लढा व्यापक झाला पाहिजे. मंदिरमुक्ती हे हिंदूंवर केलेल्या आक्रमणांवरील चोख प्रत्युत्तर आहे. जे लोक खोडसाळपणे ‘मंदिरमुक्तीमुळे काय होते ?’ असे म्हणतात, त्यांना कुंभमेळ्यातील हिंदूंच्या विश्वविक्रमी उपस्थितीने उत्तर दिले आहे. आज जोपर्यंत हा देश सनातन राष्ट्र होत नाही, तोपर्यंत हिंदूंचे बळकावण्यात आलेले प्रत्येक मंदिर मुक्त करण्याचा संकल्प आज आपण सर्वांनी करूया, असे आवाहन काशी अन् मथुरा येथील मंदिरांच्या मुक्तीसाठी न्यायालयीन लढा देत असलेले अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. अधिवक्ता जैन हे ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे प्रवक्ते असून सर्वाेच्च न्यायालयात हिंदूंची बाजूही मांडतात.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या दुपारच्या सत्रात ते बोलत होते. या प्रसंगी सनातन-निर्मित ‘सनातन राष्ट्र : चुनौतियां एवं चिंतन’ ‘सनातन राष्ट्र : चुनौतिया एवं चिंतन’ या हिंदी ग्रंथाचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’चे संस्थापक अन् माजी सूचना आयुक्त श्री. उदय माहुरकर, ‘सुदर्शन वृत्तवाहिनी’चे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते अन् या ग्रंथाचे सहलेखक श्री. रमेश शिंदे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ उपस्थित होत्या.

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

अधिवक्ता जैन म्हणाले, ‘‘आजवर आपण आपल्या विचारांच्या लोकप्रतिनिधींना निवडून देत आलो. हे लोकप्रतिनिधी अनेक राज्यांत आता शासनकर्ते झाले आहेत. आता या शासनकर्त्यांकडून आपल्याला काय हवे, तेही आपण स्पष्ट केले पाहिजे. ‘तुम्ही सत्तेत बसल्यावर मंदिरांचे सरकारीकरण रहित करणे, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’सारखे हिंदुविरोधी कायदे रहित करणे, ‘वक्फ’सारखे लांगूलचालन करणारे कायदे हाणून पाडणे, पाकमधून भारतात आलेल्या हिंदूंना मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणे इत्यादी कृती करणार असाल, तर आम्ही तुम्हाला निवडून देऊ’, असे आपण निक्षून सांगितले पाहिजे.’’

अधिवक्ता जैन यांनी उद्धृत केलेली श्रद्धावर्धक कविता !

समय तराजू तोल रहा है, इतिहास के पन्ने खोल रहा है ।
सत्य सनातन की आँखों में, काशी मथुरा डोल रहा है ।।
अखंड नियंता सर्वेश्वर कल्कि का स्वागत करने को,
पांच सदी से मौन यह संभल, ‘हरिहर’, ‘हरिहर’ बोल रहा है ।।

अधिवक्ता जैन यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आदरपूर्वक उल्लेख करत ते, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.