‘सनबर्न फेस्टिव्हल’ तात्काळ रहित करण्याच्या मागणीसाठी नेरूळ येथे आंदोलन !

आंदोलनात घोषणा देतांना धर्मप्रेमी

नवी मुंबई – वादग्रस्त ‘सनबर्न फेस्टिव्हल’ गोव्यासह पुण्यात झालेल्या विरोधानंतर या वर्षी मुंबईत शिवडी येथे १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. अमली पदार्थांचे अतीसेवन, युवकांचे मृत्यू यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ या कार्यक्रमाला नवी मुंबईतूनही विरोध होत आहे. ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या वतीने नेरूळ रेल्वेस्थानकाच्या बाहेर युवक आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आंदोलन करत विरोध केला. या वेळी आंदोलनात युवक आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांसह ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नेरूळ’चे स्वयंसेवक, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांचे साधक यांनी सहभाग घेतला.

नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या प्रतिनिधी कु. श्रेया नलावडे म्हणाल्या की, भारताची युवाशक्ती सुरक्षित करण्यासाठी ‘सनबर्न फेस्टिव्हल’सारखे कार्यक्रम कायमचे हद्दपार होणे आवश्यक आहे. ‘सनबर्न’सारखे ‘ईडीएम्’ (इलेक्ट्रिक, डान्स, म्युझिक) महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. मुंबईतील युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ होण्यास वेळ लागणार नाही. काही पैशांच्या महसुलासाठी शासनाने तरुणांचे आयुष्य पणाला लावू नये.

या प्रसंगी ‘सनबर्न हटवा-देश वाचवा’, ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम्’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात दिल्या. आंदोलकांनी ‘सनबर्न’ला विरोध करणारे फलक हातात धरले होते. या वेळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेत अनेक नागरिकांनी स्वाक्षरी करून स्वतःचा विरोध दर्शवला.

‘शासनाचा कर बुडवणार्‍या आणि तरुण पिढीला नशा करायला उद्युक्त् करणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला प्रशासनाने अनुमती का दिली ?’, हा प्रश्न आंदोलनात उपस्थित करण्यात आला असून ‘सनबर्न  फेस्टिव्हल’ छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र भूमीतून, तसेच देशातूनच कायमचे हद्दपार करावे’, अशी मागणी ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’ने केली आहे.