देहली ते इंद्रप्रस्थ : सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा ‘शंखनाद’ !

भारतीय राजधानी देहली हे शहर केवळ प्रशासकीय केंद्र नसून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे अद्वितीय प्रतीक आहे. राष्ट्रपती भवन, राजपथ, संसद भवन, विविध कलांची परंपरा, उद्योगविश्व आणि देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेली लोकसंस्कृती या सर्वांनी मिळून देहलीचा बहुआयामी स्वभाव घडवला आहे. हीच देहली प्राचीन काळात ‘इंद्रप्रस्थ’ म्हणून ओळखली जात होती. महाभारतकालीन पांडवांची भव्य राजधानी आणि सांस्कृतिक वैभवाची मूळ जननी ! कालांतराने आक्रमणांच्या मालिकेत या शहराची मूळ ओळख धूसर झाली; तिचे नाव, संस्कृती आणि जीवनदृष्टी यांवर परकीय छटा चढली. आज संपूर्ण देशभरातून देहलीला तिचे प्राचीन, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नाव ‘इंद्रप्रस्थ’ परत मिळावे, अशी जोरदार मागणी होत आहे. या राष्ट्रीय चळवळीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ ही सक्रीय भूमिका बजावत आहे.     

देहलीचा इतिहास आणि ऐतिहासिक पुरावे

‘इंद्रप्रस्थ’ हे महाभारतकालीन नगर असून पांडवांची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. यमुनेच्या काठी वसलेले हे नगर त्या काळी कला, शौर्य, प्रशासन आणि वैभव यांचे केंद्र मानले जात होते. ऐतिहासिक आणि पुरातत्व संशोधनातील पुरावे बघितल्यास मौर्य, शुंग, कुशाण, गुप्त, राजपूत, सुलतान आणि मोगल या काळांतील विविध अवशेष देहलीमध्ये आढळले आहेत. विशेषतः पुराना किल्ल्यात वर्ष १९५५ आणि वर्ष २०१३-१४ मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात ‘पेंटेड ग्रे वेअर’ संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. या संस्कृतीचा संबंध महाभारतकाळाशी मानला जातो. अनेक प्राचीन ग्रंथ, प्रवासी आणि इतिहासकार देहली क्षेत्राला ‘इंद्रपत्त’ किंवा ‘इंद्रप्रस्थ’ या नावानेच ओळखतात. ही सांस्कृतिक स्मृती आजही आधुनिक देहलीच्या परिचयात जपली गेली आहे.

पुराना किल्ल्यात पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेले ‘पेंटेड ग्रे वेअर’ संस्कृतीचे अवशेष

पुराना किल्ल्यात पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेल्या मूर्ती

‘इंद्रप्रस्थ’चा मागोवा, संशोधन आणि मागणी !

पुस्तकाचे मुखपृष्ठ

‘द्रौपदी ड्रीम ट्रस्ट’च्या नीरा मिश्रा यांनी ‘इंद्रप्रस्थ’च्या इतिहासावर उल्लेखनीय संशोधन करून या संकल्पनेला शास्त्रशुद्ध आधार दिला आहे. पुराना किल्ल्यातील उत्खनन, महाभारत आणि पौराणिक संहिता यांचे उल्लेख, चीन आणि ग्रीस येथील प्रवाशांच्या नोंदी, भौगोलिक प्रतिपादन अन् ऐतिहासिक साहित्य यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी ‘इंद्रप्रस्थ रिव्हिजिटेड’ (Indraprastha Revisited) हे महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित केले आहे. भाजपचे खासदार श्री. प्रविण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देहलीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ करण्यासाठी पत्राद्वारे विनंती केली आहे. त्यांनी जुन्या देहलीतील रेल्वेस्थानकाचे नाव ‘इंद्रप्रस्थ जंक्शन’ आणि देहली विमानतळाचे नाव ‘इंद्रप्रस्थ आंतरराष्ट्रीय हवाईतळ’ करण्याची मागणी केली आहे, तसेच त्यांनी देहलीत पांडवांचे पुतळे उभारण्याची मागणी केली आहे.

नाव पालटाचा सांस्कृतिक अर्थ

श्री. चेतन राजहंस

‘इंद्रप्रस्थ’ हे नाव फक्त ऐतिहासिक नाही, तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचेही प्रतीक आहे. महाभारताच्या कथेनुसार पांडवांनी यमुनेच्या काठी असलेल्या खांडववनातून (कांडवप्रस्थ) नवे भव्य नगर उभारले आणि देवाधिदेव इंद्राच्या सन्मानार्थ त्या नगराला ‘इंद्रप्रस्थ’ हे नाव दिले. त्यामुळे हे नाव दैवी परंपरा, सांस्कृतिक ओळख आणि राजसत्ता या तीनही घटकांचे प्रतिनिधित्व करते. नव्या पिढीला त्यांच्या इतिहासाशी जोडणारे, स्वाभिमानाची भावना जागवणारे हे नाव देहलीच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. देहलीला ‘इंद्रप्रस्थ’ हे नाव दिल्यास पर्यटन, स्थानिक उद्योग, हॉटेल्स आणि हस्तकला क्षेत्रांनाही मोठा लाभ होऊ शकतो. राजकीय वा प्रशासकिय पातळी पलीकडे हा पालट राष्ट्रीय सांस्कृतिक पुनर्जागरणाचा एक मोठा टप्पा ठरू शकतो.

– श्री. चेतन राजहंस

नाम पालटण्याच्या प्रक्रियेत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या भूमिकेचे महत्त्व !


‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ प्रस्तुत आणि ‘सनातन संस्था’ आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा राष्ट्रीय स्तरावरील भव्य कार्यक्रम १३ आणि १४ डिसेंबर २०२५ या दिवशी ‘भारत मंडपम्’ (इंद्रप्रस्थ) येथे होत आहे. या महोत्सवात शिवकालीन शस्त्रप्रदर्शन, प्राचीन भारतीय सुरक्षाव्यवस्था, शौर्यजागृती आणि सांस्कृतिक वारसा या सर्व गोष्टींचा जागर केला जाणार आहे. हा महोत्सव केवळ सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे स्फुल्लिंग जागवणारा कार्यक्रम न होता ‘देहली ते इंद्रप्रस्थ’ या परिवर्तनाच्या प्रक्रियेला समाजाच्या एकत्रित सहभागाने गती देणारा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. चला तर मग, इंद्रप्रस्थचा शंखनाद करण्यासाठी पुढे सरसावूया ! (२५.११.२०२५)

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.