वादग्रस्त ‘सनबर्न फेस्टिव्हल’ कि अमली पदार्थांच्या वितरणाचा अड्डा ?

वर्ष २००७ मध्ये गोवा येथे चालू झालेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ पूर्वीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. हा (ई.डी.एम्.), म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, डान्स आणि म्युझिक या प्रकारांत असून ‘आशियातील सर्वांत मोठा संगीताचा कार्यक्रम’ आहे. ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या भोवती नेहमी काही ना काही वाद निर्माण झाले आहेत. या कार्यक्रमात अनेक युवक-युवतींचा मृत्यू अमली पदार्थांच्या सेवनामुळे झाला आहे, तर संस्कृती भंजनासह ध्वनीप्रदूषण, पर्यावरणप्रदूषण, वाहतूककोंडी यांच्याही समस्या निर्माण झाल्या आहेत. मुंबई येथे प्रथमच १९ ते २१ डिसेंबर २०२५ या काळात हा ‘फेस्टिव्हल’ होणार आहे. या निमित्ताने या कार्यक्रमाच्या आतापर्यंतच्या कुकृत्यांचा घेतलेला आढावा…

संकलक :  श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल

१. गोवा येथे फेस्टिव्हलमुळे मृत्यू आणि प्रदूषण

वर्ष २००७ मध्ये मिडिया आणि कम्युनिकेशन कंपनी ‘परसेप्ट लिमिटेड’चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंह यांनी ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला प्रारंभ केला. प्रारंभी ‘भारताला जागतिक संगीत पर्यटनाच्या नकाशावर आणणे’, हा त्याचा मुख्य उद्देश असला, तरी त्या मूळ उद्देशापासून फारकत घेत आता अमली पदार्थ वितरणाचा अड्डा बनण्यापर्यंत प्रवास झाला आहे. गोव्यातील कँडोलिम बीच येथे २८ आणि २९ डिसेंबर २००७ या दिवशी पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय डान्स म्युझिक फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. वर्ष २००९ मध्ये नेहा बहुगुणा या युवतीचा अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे मृत्यू झाल्यावर हा कार्यक्रम प्रकाशझोतात आला. त्यानंतर प्रत्येक काही वर्षांनी युवक-युवतींचे मृत्यू होत राहिले. वर्ष २००९, वर्ष २०१४ आणि वर्ष २०२० मध्ये या ‘फेस्टिव्हल’च्या आयोजकांनी गोवा राज्याचा ६ कोटी २९ लाख रुपयांचा कर चुकवला आहे. या संदर्भात सप्टेंबर २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ‘सनबर्न फेस्टिव्हल’ची १ कोटी १० लाख रुपयांची सुरक्षा ठेव जप्त करण्याचा आदेश दिला.

२. गोवेकरांचा ‘फेस्टिव्हल’ला विरोध !

श्री. यज्ञेश सावंत

गोवा येथे उत्तर गोवा येथून दक्षिण गोव्यात हा ‘फेस्टिव्हल’ स्थलांतरित करण्याचा प्रयत्न झाल्यावर प्रचंड विरोध झाला. काँग्रेससह अनेक संस्था, सामजिक संस्था आणि स्थानिक नागरिक यांनी हा विरोध केला. विरोध करणार्‍यांमध्ये गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे युरी आलेमाव हे आघाडीवर होते. युरी आलेमाव यांनी सांगितले, ‘‘उत्तर गोव्याला या कार्यक्रमामुळे अमली पदार्थ आणि गुन्हेगारी यांच्या विळख्यात पाडल्यानंतर, तसेच तेथील नागरिकांची ध्वनीप्रदूषण करून झोप उडवून आता दक्षिण गोव्याच्या शांत वातावरणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे.’’ स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी या कार्यक्रमाला कडाडून विरोध केला. त्यामुळे तो दक्षिण गोव्यात येऊ शकला नाही. याचाच अर्थ या कार्यक्रमामुळे स्थानिक गुन्ह्यांमध्येही वाढ होते. मद्य, अमली पदार्थ यांच्या सेवनानंतर तरुण काय करणार ? गुन्हेगारी कृत्येच करणार ना ?

३. गोव्यात ‘फेस्टिव्हल’मुळे निर्माण झाल्या समस्या !

या कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात झालेले व्यावसायिकरण आणि मोठ्या प्रमाणात तिकिटांचा झालेला काळाबाजार हा गोव्यातील स्थानिकांना आवडला नाही. गोव्याच्या शांत वातावरणाला हा कार्यक्रम गालबोट लावणाराच ठरला आहे. वर्ष २०२४ मध्ये या कार्यक्रमाच्या विरुद्ध स्थानिकांनी निदर्शने केली होती.

‘सनबर्न’ला गोवेकर कंटाळले होते. ‘सनबर्न’चे आयोजन ख्रिस्ती धर्मियांना त्यांच्या महत्त्वाच्या सणांच्या वेळीच होत असल्यामुळे गोंगाटामुळे सणही शांततेत साजरा करता येत नव्हते. पुष्कळ गर्दीमुळे वाहतुकीची समस्या निर्माण व्हायची. कुणी आजारी व्यक्ती अत्यवस्थ झाली, तर तिला रुग्णालयात कसे न्यायचे ? ही समस्या निर्माण व्हायची. या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल’मध्ये विदेशी संगीत, पॉप गायक यांच्यासह देशातील या संगीत प्रकारात गाऊ शकणारे काही निवडकच गायक सहभागी होऊ शकतात. त्यामुळे स्थानिक कलाकारांना कोणतीही संधी या कार्यक्रमात मिळत नसल्यामुळे स्थानिकांचा या विषयाला अनुषंगानेही रोष होता.


तरुणांच्या मृत्यूचे कारण ठरलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ !


१. अमली पदार्थांमुळे मृत्यू : ‘सनबर्न फेस्टिव्हल’मध्ये वर्ष २००९ मध्ये नेहा बहुगुणा (वय २३ वर्षे), वर्ष २०१४ मध्ये ईशा मंत्री (वय २७ वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर वर्ष २०२४ मध्ये करण कश्यप (वय २६ वर्षे) यांचा अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
२. युवकांचे मृत्यू : वर्ष २०१९ मध्ये ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या बाहेरील परिसरात साईप्रसाद अन् व्यंकट सत्यनारायण यांचा आणि नंतर संदीप कोट्टा या बेंगळुरू (कर्नाटक) येथील तरुणांचा अतीनशाखोरीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
३. अमली पदार्थांचा व्यापार : वर्ष २०१३ च्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’मध्ये अमली पदार्थविरोधी पथकाने सौरभ अगरवाल या ‘ड्रग डिलर’ (अमली पदार्थांचा व्यापारी)ला पकडले. त्या वेळी व्यसन करणार्‍या १ सहस्रांहून अधिक लोकांकडून पोलिसांनी दंड आकारला.
४. ‘रेप ड्रग’चा वापर ? : वर्ष २०१३ मध्ये ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या २ दिवस पूर्वी गोव्यात ‘रेप ड्रग’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘केटामीन’च्या ४५० बाटल्या पकडल्या गेल्या. त्या या ‘फेस्टिव्हल’मध्ये वितरित केल्या जाणार असल्याचा आरोप होता.
५. अन्य गैरप्रकार : ‘सनबर्न फेस्टिव्हल’मध्ये अश्लीलता, अनैतिक संबंध, गुन्हेगारी आदींचे प्रमाणही अधिक असल्याचे आजवर स्पष्ट झाले आहे.
भावी पिढ्यांच्या रक्षणासाठी ‘सनबर्न फेस्टिव्हल’रूपी विकृती हटवलीच पाहिजे !
– श्री. यज्ञेश सावंत

४. ‘सनबर्न’चा विरोधामुळे झालेला प्रवास !

वर्ष २००७ ते वर्ष २०१५ पर्यंत हा ‘फेस्टिव्हल’ गोव्यात, म्हणजे उत्तर गोव्यात आयोजित केला जात होता. तेथे विरोध झाल्यावर तो वर्ष २०१६ मध्ये तो पुण्यात स्थलांतरित करण्यात आला. पुण्यातही पुष्कळ विरोध झाला. त्यामुळे वर्ष २०१९ मध्ये तो पुन्हा गोव्यात कँडोलिम बीच येथे स्थलांतरित करण्यात आला. ‘फेस्टिव्हल’ उत्तर गोव्यातून दक्षिण गोव्यात स्थलांतरित करतांना तीव्र विरोध झाला आणि आता तो मुंबईत आयोजित करण्याचा घाट घालण्यात आला आहे. याद्वारे मुंबईतील तरुणांना अमली पदार्थ देऊन व्यसनाधीन करण्याचा हा प्रयत्न समजायचा का ?

५. ‘सनबर्न’चे अन्य दुष्परिणाम

कार्यक्रमातील अतीउच्च आवाज आणि फटाके यांमुळे ध्वनीप्रदूषण होते. यामुळे स्थानिक रहिवासी, विशेषतः वृद्ध लोक आणि रुग्ण यांना त्रास होतो. या कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो, ज्यामुळे पर्यावरण आणि समुद्रकिनारे यांची स्वच्छता धोक्यात येते. काही स्थानिक लोकांचे मत आहे की, हा कार्यक्रम गोवा आणि स्थानिक संस्कृती यांच्या विरोधात आहे. सनबर्न फेस्टिव्हलच्या तिकिटांची २ लाख रुपयांमध्ये ‘ब्लॅक’मध्ये विक्री करण्यासाठी ५ जण आयोजकांकडून नियुक्ती केल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले होते. त्याचप्रमाणे एका कार्यक्रमात २५ लाख रुपये मूल्यांइतके  भ्रमणभाष चोरण्यात आले होते, त्यांपैकी पोलिसांना १० ते १२ भ्रमणभाषसंच पुन्हा मिळवता आले. फेस्टिव्हलच्या वेळी होणारी अती गर्दी आणि अपुरे सुरक्षा व्यवस्थापन हा नेहमीच एक चिंतेचा विषय राहिला आहे. यामुळे चेंगराचेंगरी किंवा अपघात यांचा धोका निर्माण होतो.


भारत देशही बलवान होण्यासाठी…!


युवाशक्तीला नशाखोरीतून बाहेर पडण्यासाठी साहाय्य करण्याकरता ‘नशाविरोधी संघर्ष अभियान’ चालू केले आहे. या अभियानाचा पहिला टप्पा म्हणून नशाखोरीचा अड्डा असलेल्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ विरुद्ध प्रबोधन करण्यात येत आहे. तरुण नशामुक्त झाला, तर भारत देशही बलवान होईल ! त्यामुळे या अभियानात बहुसंख्येने सहभागी व्हा आणि राष्ट्रकर्तव्य बजावा ! – श्री. यज्ञेश सावंत

६. भगवान शिवाच्या अवमानाविषयी पोलिसांकडे तक्रार

वर्ष २०२४ मध्ये या ‘फेस्टिव्हल’मध्ये भगवान शिवाचे चित्र डिजिटल स्वरूपात दाखवण्यात आले होते. मद्यसेवन आणि अमली पदार्थ असणार्‍या, अंगविक्षेप करत नृत्य-गाणे असलेल्या या कार्यक्रमात भगवान शिवाचे चित्र दर्शवून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे अनेक हिंदूंनी धार्मिक भावना दुखावल्याविरुद्ध आवाज उठवला. भगवान शिवाच्या या अवमानाविरुद्ध गोव्यात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.

७. महाराष्ट्र सरकारचा महसूल बुडवणे

वर्ष २०१६ मध्ये पुणे येथे झालेल्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या आयोजकांनी सरकारचे ४२ लाख ७९ सहस्र ५८३ रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवले होते, तसेच या कार्यक्रमासाठी अनधिकृतपणे उत्खनन केलेल्या गौण खनिजाचा ६० लाख ५२ सहस्र ३८३ रुपयांचा महसूल सरकारला अद्याप वसूल करता आलेला नाही. अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारची १ कोटी रुपयांहून अधिक रक्कम बुडवली आहे. पुणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. चंद्रकांत वारघडे (पाटील) यांनी माहितीच्या अधिकाराद्वारे मिळवलेल्या या माहितीतून हा प्रकार उघड झाला आहे. आज सामान्य नागरिकाला कराच्या अल्पशा रकमेसाठी सरकार वेठीस धरून कारवाई करते; मात्र कोट्यवधी रुपयांचा कर बुडवणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला मात्र मुंबईत आयोजनाची अनुमती कशी मिळते ?


नशेखोरीच्या विरोधात पुढील कृती करा !


१. ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात ‘एक्स’, ‘इंस्टाग्राम’, ‘व्हॉटस्ॲप’ आदी सामाजिक माध्यमे, संकेतस्थळे, वृत्तपत्रे, खासगी वाहिन्या आदींद्वारे वैध मार्गाने जागृती करा !
२. स्थानिक लोकप्रतिनिधींना पत्र देऊन नशेखोरीविरुद्ध कृती करण्यास प्रवृत्त करा !
३. आपल्या जवळचे राष्ट्रनिष्ठ, संस्कृतीप्रेमी, समाजसेवक, युवक आदींना एकत्र करून प्रशासनाला ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात निवेदन द्या ! – श्री. यज्ञेश सावंत

८. केवळ मुंबईतूनच नव्हे, तर भारतातून ‘सनबर्न फेस्टिव्हल’ हद्दपार व्हावा !

अमली पदार्थांच्या आरोपांमुळे गोव्यात अपकीर्त झालेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ आता मुंबईत होत असेल, तर त्यापासून युवकांना वाचवणे आवश्यक आहे. गोव्यातून हाकललेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ या वर्षी प्रथमच १९ ते २१ डिसेंबर २०२५ या काळात मुंबईत होणार आहे. त्यामुळे युवा पिढीच्या सुरक्षिततेसाठी हा ‘फेस्टिव्हल’ मुंबईतून हद्दपार होणे आवश्यक आहे.

आयोजक कितीही सांगत असले की, या ‘फेस्टिव्हल’मध्ये अमली पदार्थांचा वापर होत नाही, तरी वस्तूस्थिती भयावह आहे. या ‘फेस्टिव्हल’मध्ये अमली पदार्थ विकणार्‍या टोळ्या युवकांना त्यांच्या जाळ्यात ओढतात. त्यातील ध्वनीप्रदूषण अन् लेझर किरणे यांमुळे बालके, वयस्कर आणि रुग्ण यांना प्रचंड त्रास होतो. जेथे हा ‘फेस्टिव्हल’ होतो, तेथील भूमी, पाणी, पर्यावरण यांची हानी केली जाते. त्यामुळेच गोव्यात ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध झाल्यावर अन् सरकारचे कोट्यवधी रुपये बुडवून आता तो मुंबईत होत आहे.

९. भारतीय युवकांमधील प्रचंड व्यसनाधीनता !

एका राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार भारतातील १६ कोटी युवक अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. या युवकांमध्ये तंबाखू (२६.४ टक्के), मद्यपान (२६.१ टक्के) आणि गांजा (९.५ टक्के) यांच्या सेवनाचे प्रमाण अधिक आहे. ३ कोटी तरुण गांजा ओढतात. २.३ कोटी तरुण ‘ओपीओइड्स’च्या (हिरोईन, मिथ, तसेच प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज) आहारी गेले आहेत. देशाची राजधानी देहली येथे ७ ते १८ वर्षे वयोगटातील ४९ टक्के मुले नशाखोरी करतात. शिक्षणाकडे दुर्लक्ष, निराशा, आत्महत्यांचे वाढते प्रमाण, ‘एड्स’सारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार ही नशाखोरीच्या दुष्परिणामांची सूची वाढतच आहे. महिला आणि बालके यांच्यावरील बहुतांश अत्याचारांना नशाखोरी आणि ‘रेप ड्रग्ज’सारखे अमली पदार्थही कारणीभूत आहेत.

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (५.१२.२०२५)