‘प्रारब्ध’ या ‘यू ट्यूब’वाहिनीचे संपादक श्री. अवनीश शर्मा यांनी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांची देहली येथील भारत मंडपम् येथे १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुलाखत घेतली. या मुलाखतीत श्री. चेतन राजहंस यांनी या महोत्सवाची विस्ताराने माहिती दिली. या मुलाखतीचा सारंश येथे वाचकांसाठी देत आहोत.

१. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यामागील संकल्पना ! : सनातन संस्थेची स्थापना वर्ष १९९९ मध्ये झाली. संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देहली येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन होत आहे. संस्थेची स्थापना आध्यात्मिक स्तरावर झाली असतांना काहींना ‘सनातन राष्ट्र’ ही संकल्पना एकप्रकारे सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि राजकीय वाटते; पण संस्था मूळ ध्येयानुसार मार्गक्रमण करत आहे. वर्ष १९८७ मध्ये संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जीवनात संत भक्तराज महाराज ‘गुरु’ म्हणून आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आध्यात्मिक साधना केली. वर्ष १९९५ मध्ये गुरूंनी त्यांच्या अंतिम क्षणी शिष्य डॉ. जयंत आठवले यांना सांगितले, ‘‘वर्ष २०१२ नंतर तामसिक राजकीय शक्ती परास्त होऊ लागतील. वर्ष २०२० मध्ये महामारी येईल आणि वर्ष २०२५ नंतर भारतात हिंदु राष्ट्रासाठी अनुकूल काळ येईल. तुम्ही ज्या सनातन धर्माचे अध्ययन केले आहे, त्या अध्यात्मावर आधारित आपल्याला राष्ट्ररचनेचा सिद्धांत स्थापित करावा लागेल. आपली सनातन परंपरा, सनातन संस्कृती आणि सांस्कृतिक राष्ट्र्वाद आपल्याला पुनर्जीवित करावा लागेल. त्यासाठी तुम्ही वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करा.’’
वर्ष १९९५ मध्ये त्यांनी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ नावाचा ग्रंथ लिहिला, त्यात याचा उल्लेख आहे. याच आधारावर वर्ष २०२५ मध्ये गोव्यात प्रथम ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. त्याला ३० सहस्रांहून अधिक साधक आणि धर्मप्रेमी यांची उपस्थिती होती. त्यानंतर आता देहलीत दुसरा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव होत आहे. सनातन परंपरा, सभ्यता आणि संस्कृती पुनर्जीवित करणे अन् सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या रूपात या गोष्टी स्थापित करणे, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
२. शंखनाद महोत्सवातील विविध चर्चासत्रे आणि संबोधन
अ. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे मुळात सनातन राष्ट्र आणि आदर्श राज्य होते, हे लक्षात घेऊन शंखनाद महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे १३ डिसेंबर या दिवशी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि संस्कृतीरक्षण’ ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. सुव्यवस्था, संस्कृती, मंदिर आणि न्यायव्यवस्था यांच्या दृष्टीकोनातून ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची कार्यपद्धत आणि आजचा वर्तमान भारत’ या विषयावर ‘सनातन संवाद’ आयोजित केला आहे. यात भारताचे माजी मुख्य न्यायाधीश उदय ललित, मंदिरमुक्ती संग्रामाशी संबंधित अधिवक्ता विष्णु शंकर जैन, तसेच लेखिका शेफाली वैद्य सहभागी होतील. या दिवशी ‘संस्कृती संवाद’ही आयोजित करण्यात आला आहे. त्यात भारतीय संस्कृतीचा र्हास करणार्या पैलूंवर प्रकाश टाकला जाईल, तसेच ‘सांस्कृतिक जागृती’ या विषयावर चर्चा होईल. यासमवेतच ‘मंदिर संवाद’ही असेल. त्यात हिंदु मंदिरांशी संबंधित झालेल्या आणि उर्वरित कार्याविषयी मान्यवर मार्गदर्शन करतील.
आ. १४ डिसेंबर या दिवशी ‘राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर चर्चा असणार आहे. त्याची ‘सनातन धर्माच्या सुरक्षेत भारताची सुरक्षा’ ही संकल्पना आहे. सनातन राष्ट्राचा मूळ संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्यायचा आहे. अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षा यांविषयी ‘रणसंवाद’ होईल. यात भूदल, वायूदल आणि नौदल यांचे निवृत्त अधिकारी, ‘संरक्षण संशोधन अन् विकास संस्थे’चे (डी.आर्.डी.ओ.चे) निवृत्त शास्त्रज्ञ सहभागी होतील. नक्षलवाद, तसेच शहरी नक्षलवाद या सूत्रांवर चर्चा होईल. यासमवेतच ‘भारताच्या प्रगतीमध्ये सामाजिक, सांस्कृतिक संस्था, तसेच व्यक्ती यांचे काय योगदान असायला हवे ?’, यावर जागृती करण्यात येईल. शेवटी ‘विश्वकल्याणकारी सनातन राष्ट्राची दिशा काय असायला हवी ?’ याविषयी प.पू. स्वामी गोविंददेव गिरी मार्गदर्शन करतील.
३. ‘स्वराज्याचा शौर्यनाद’ प्रदर्शन ! : १३, १४ आणि १५ डिसेंबर या कालावधीत ‘स्वराज्याचा शौर्यनाद’ हे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. ऐतिहासिक मूल्य असलेल्या शस्त्रांचे हे दुर्लभ प्रदर्शन असेल. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शस्त्रांचा समावेश आहे. त्यांनी हाताळलेल्या ८ शस्त्रांसह त्यांच्या भवानी तलवारीचेही प्रत्यक्ष दर्शन घेता येईल. यासमवेतच मराठा साम्राज्यातील अन्य सेनापतींनी चालवलेली शस्त्रे असणार आहेत. त्यात सरदार हंबीरराव मोहिते यांचा भाला, अशी विविध शस्त्रे असतील. महाराणा प्रताप यांच्या काळातील शस्त्रांसह विजयनगर साम्राज्यातील काही शस्त्रांचे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार आहे.
४. १ सहस्र वर्षांनी प्रथमच मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य दर्शन : १२ ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातमधील सौराष्ट्रात आहे. सोम, म्हणजे भगवान चंद्रमा ! भगवान चंद्रमाचे नाव ‘सोमनाथ’ आहे. हे ज्योतिर्लिंग हवेत तरंगत होते. त्याच्या खालून वारा जात होता. एवढे लोह चुंबकीय तत्त्व त्यात होते. ते पृथ्वीच्या घटकांपासून बनले नव्हते, तर चंद्रमाच्या घटकांपासून बनले होते. त्यावर हिंदूंची श्रद्धा होती. त्यामुळे १ सहस्र वर्षांपूर्वी गझनीच्या महंमदाने ते उद्ध्वस्त केले. त्यानंतर तेथील पुजारी कुटुंबाने त्या शिवलिंगाचे सर्व अवशेष एकत्र करून ते तमिळनाडू येथे नेले. त्यांच्या घराण्याने ते १ सहस्र वर्षे सुरक्षित ठेवले. ‘हे दिव्य शिवलिंग कांचीचे शंकराचार्य सुरक्षित ठेवू शकतील’, असे त्यांना वाटले. त्यामुळे ते वर्ष १९२४ मध्ये स्वामी शंकराचार्यांकडे गेले. स्वामीजी त्यांना म्हणाले, ‘‘हे अवशेष अजून १०० वर्षे तुम्ही सांभाळा; कारण १०० वर्षांनंतर अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर होईल, तसेच वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे महाकुंभ होईल. त्या कुंभामध्ये या अवशेषांना स्नान घाला. त्यानंतर हिंदु राष्ट्रासाठी अनुकूल काळ होईल, तेव्हा त्याचे दर्शन सर्वत्र उपलब्ध करून द्या.’’ या शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने सर्वप्रथम भारत मंडपम्मध्ये या दिव्य ज्योतिर्लिंगाच्या अवशेषांचे दर्शन सर्वांना घेता येणार आहे.

पैसा जिंकला, नाती हरली !
‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग
‘विश्वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !