एष वै सुमहाञ्छ्रीमान्विटपी सम्प्रकाशते ।
विराजत्युद्गतस्कन्धं कोविदारध्वजो रथे ॥
असौ हि सुमहास्कन्धो विटपी च महाद्रुमः।
विराजते महासैन्ये कोविदारध्वजो रथे ॥ – अयोध्याकांड, सर्ग ९६, श्लोक १८, १९

कोविदार ध्वजाची पुनर्स्थापना रामरायाच्या अयोध्येत झाली, हा भारतियांसाठी आनंदाचा क्षण होता. या निमित्ताने कोविदार वृक्षाची थोडीशी माहिती तुमच्यासमोर ठेवत आहे.

१. कोविदार वृक्षाविषयीची माहिती
कोविदार, म्हणजे आयुर्वेदात वर्णित कांचनार ! तुरट आणि तिखट रसाचा हा वृक्ष शीत वीर्याचा आहे. ऋग्वेदामध्ये त्याचा उल्लेख आढळतो. सर्वच प्रमुख आयुर्वेदाच्या संहितांमध्ये त्याचे गुणधर्म आणि उपयोग आले आहेत. ‘निघण्टु’ ग्रंथांतही याचे सविस्तर वर्णन आहे. व्रण, रक्तपित्त, प्रदर, ग्रंथी, अशा विविध विकारांवर तो उपयुक्त असून आजही वैद्यांच्या नियमित वापरात असलेली औषधी आहे. पाश्चात्त्य वनस्पतीशास्त्रानुसार ‘Bauhinia variegata’ (बहुहिनिया व्हेरिगटा) असे या वृक्षाचे नाव आहे.

२. संशोधने काय सांगतात ?
अ. कांचनारचे साल, पाने अन् फुले यांमध्ये ‘फ्लेव्होनॉइड्स’ (वनस्पतीमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे रासायनिक संयुग) मुबलक प्रमाणात असतात. हे घटक ‘अँटिऑक्सिडंट’ (हे असे पदार्थ आहेत जे पेशींना ‘मुक्त रॅडिकल्स’ नावाच्या अस्थिर रेणूंमुळे होणार्या हानीपासून वाचवतात.) म्हणून कार्य करतात. हे ‘फ्लेव्होनॉइड्स’, ‘थायरॉईड’ संप्रेरके (हार्मोन्स) (T3/T4) चे कार्य सुधारण्यास साहाय्य करतात.
हे घटक कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखतात. ‘Ehrlich Ascites Carcinoma (एर्लिच एसाइटिस कार्सिनोमा)’ आणि मानवी स्तनाचा कर्करोग (Breast Cancer – MCF-7), तसेच तोंडाचा कर्करोग या ‘सेल लाईन्स’वर (पेशींच्या रेषा) कांचनारचा ‘अर्क सायटोटॉक्सिक’ (कर्करोग पेशींना मारणारा) ठरला आहे. यासह हा दाहशामक असून शरिरातील सूज आणि वेदना न्यून करतो.
आ. कांचनारमध्ये असलेल्या ‘टॅनिन्स’मुळे (कवचामुळे) त्याला तुरट चव येते. हे घटक काय करतात ? तर लेखन; म्हणजेच शरिरातील अतिरिक्त ओलावा आणि चरबी न्यून करण्यास साहाय्य करतात, ज्यामुळे गाठी अन् मेद न्यून होतो. जखम लवकर भरून येण्यासाठी ‘टॅनिन्स’ उपयुक्त असतात.
इ. कांचनार गुग्गुळ आणि कांचनार साल यांचा ‘पी.सी.ओ.एस्.’वर (‘पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ – ही एक हार्मोनल स्थिती आहे.) अभ्यास झाला आहे. हे ‘ओव्हरी’मधील ‘सिस्ट’ (महिलांच्या अंडाशयामध्ये द्रवाने भरलेली छोटी गाठ) न्यून करण्यास, ‘ओव्ह्युलेशन’ (स्त्रीबिजे) नियमित करण्यास आणि ‘LH/FSH’ या संप्रेरकांचे संतुलन राखण्यास साहाय्य करते.
ई. ‘कार्बन टेट्राक्लोराईड’मुळे यकृताला होणार्या विषबाधेवर कांचनारचा प्रयोग केला गेला. कांचनारच्या अर्काने यकृताचे रक्षण केले आणि ‘SGOT’, ‘SGPT’ आणि ‘बिलीरुबिन’ (रक्तातील पिवळसर पदार्थ) यांची वाढलेली पातळी न्यून केली, म्हणजेच कांचनार यकृताच्या पेशींना पुनरुज्जीवित करण्यास साहाय्य करते. (SGOT चा अर्थ ‘सीरम ग्लुटामिक-ऑक्सालोएसिटिक ट्रान्समिनेज’ आहे, तर SGPT चा अर्थ ‘सीरम ग्लुटामिक-पायरुविक ट्रान्समिनेज’ आहे. SGOT ची पातळी वाढल्यास यकृत, हृदय किंवा स्नायू यांची हानी होण्याविषयी संकेत मिळू शकतो. SGPT ची पातळी वाढल्यास यकृताच्या आजारांचा किंवा हानीविषयीचा अधिक नेमका संकेत मिळतो.)
उ. ‘सिस्प्लॅटीन (एक ‘केमोथेरपी’ (रसायनोपचार) औषध)’ आणि ‘जेंटामायसिन’ यांच्यामुळे किडनीवर होणार्या दुष्परिणामांवर कांचनारचा अभ्यास केला गेला. ‘कांचनारमधील ‘अँटिऑक्सिडंट्स’मुळे किडनीच्या पेशींचे ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’पासून (शरिरातील ‘मुक्त रॅडिकल्स’ आणि ‘अँटिऑक्सिडंट्स’ यांच्यातील समन्वयातील बिघाड, ज्यामुळे पेशी अन् शरिरातील ऊतींची हानी होऊ शकते.) रक्षण होते आणि ‘क्रिएटिनिन’ (सर्वसामान्यपणे लघवीमध्ये सापडणारा घटक) अन् युरिया (शरिरातील एक टाकाऊ पदार्थ) यांची पातळी नियंत्रणात रहाते’, असे यात आढळले.
अशी असंख्य संशोधने आजवर झाली आहेत. विस्तार भयास्तव केवळ प्रमुख ५ इथे दिले.
३. ‘कांचनार’ असे नाव का पडले ? आणि त्याची परिणामकारकता
आता फारशी माहिती नसलेली आणखी एक रोचक माहिती देतो. वेद आणि संहिता काळात ‘कोविदार’ नाव असलेल्या या वृक्षाला पुढे ‘कांचनार’ असे नाव का पडले असावे ?
कांचन म्हणजे सोने आणि अरि म्हणजे शत्रू. रसशास्त्रानुसार विचार करता भस्म करण्यासाठी कांचनाराने सुवर्णाचे मारण होते. असे मारण करून बनवलेल्या सुवर्ण भस्मात जीवनीय, ओजोवर्धन अशा त्याच्या मूलभूत गुणांसहच अंगभूतच असलेला लेखन, म्हणजेच ‘स्क्रॅपिंग’चा गुणधर्म कांचनारातील लेखन करणार्या ‘फायटोकेमिकल्स’ (phytochemicals)मुळे (वनस्पतीमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे रासायनिक घटक) अधिक कार्यान्वित होतो. असे सुवर्ण भस्म विशेषतः कर्करोगासारख्या अवस्थांत अधिक परिणामकारक ठरते.
जे जे भारतीय ते ते वाईट या मेकॉलेप्रणीत मानसिकतेतून बाहेर पडण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. ‘आयुर्वेदात संशोधन होत नाही’, ही थाप किंवा एकूणच आयुर्वेदाविषयी सतत पसरवले जाणारे गैरसमज हे मेकॉलेप्रणित वसाहतवादी मानसिकतेचेच लक्षण आहे. लवकरात लवकर या मानसिक बंधनातून बाहेर पडा !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
पैसा जिंकला, नाती हरली !
‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग
‘विश्वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !