‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव’ या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. त्यानिमित्त पुणे येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. सौ. आरती कांडलकर, पुणे
अ. ‘गुरुदेवांनी माझ्याकडून ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे जिज्ञासूंना निमंत्रण देणे आणि अर्पण मिळवणे, या सेवा उत्साहाने अन् तळमळीने करून घेतल्या.
आ. माझ्याकडून मारुतिरायाला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव निर्विघ्नपणे पार पडू दे’, अशी प्रार्थना होत होती.
इ. महोत्सवाच्या ठिकाणी पोचल्यावर माझा ‘कृतज्ञता, कृतज्ञता’ असा नामजप होत होता.
ई. सभामंडपात गेल्यावर ‘स्वतःचे अस्तित्व नाहीसे होऊन केवळ चैतन्य ग्रहण करत आहे’, असे मला जाणवत होते. माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते. मला वेळेचे भान राहिले नाही.
उ. आम्ही प्रतिदिन निवासस्थळी रात्री उशिरा पोचूनही सकाळी ६.३० वाजता सिद्ध होत होतो. तेव्हा मला जराही थकवा जाणवला नाही.
ऊ. ‘महोत्सवाच्या ठिकाणी आलेल्या अडचणींवर मात करतांना माझे प्रारब्ध कित्येक पटींनी नष्ट होत आहे’, या विचारामुळे मला कृतज्ञता वाटत होती.
ए. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला महोत्सवात सकारात्मकता अनुभवता येत होती.
ऐ. महोत्सवाहून आल्यानंतर ‘माझे मन, बुद्धी आणि संपूर्ण देह चैतन्याने भारित झाला आहे’, असे मला जाणवत होते.
ओ. माझा ‘साधनेचे प्रयत्न अत्यंत तळमळीने आणि झोकून देऊन करायला हवेत’, हा विचार आणखी दृढ झाला.
औ. माझी आई (श्रीमती अंजली घोडे, वय ७६ वर्षे) वयस्कर असूनही ती महोत्सवाला आली होती. तेथे तिलाही आनंद अनुभवता आला. माझ्या आईने नियोजनामध्ये वेळोवेळी होणारे पालट सकारात्मक आणि स्थिर राहून स्वीकारले. तिच्या या कृतीतून मलाही शिकायला मिळाले.
अं. महोत्सवानंतर घरी आल्यावरही दिवसभर गुरुदेवांचे ते मनोहर आणि नमस्काराच्या मुद्रेत असलेले रूप आठवून माझी भावजागृती होत आहे.’

२. सौ. अस्मिता आवटी, पुणे
अ. ‘महोत्सवाचे प्रक्षेपण मोठ्या पडद्यावरून केले जात होते. १७ ते १९ मे २०२५ या ३ दिवसांच्या कालावधीत पडद्यावर गुरुदेवांचे दर्शन घेतांना ‘प्रत्यक्ष गुरुमाऊलींच्या चरणांशीच बसून ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ अनुभवत आहे. त्यांचा कृपारूपी वरदहस्त माझ्या मस्तकावर आहे’, असे मला जाणवत होते.
आ. स्वतःकडून झालेल्या चुकांविषयी माझ्याकडून गुरुचरणी क्षमायाचना होत होती.
इ. ‘माझी कोणतीही पात्रता नसतांना गुरुदेवांनी मला महोत्सवात सहभागी होण्याची संधी दिली’, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी माझा सतत कृतज्ञताभाव जागृत होत होता.
ई. महोत्सवामध्ये काही संतांच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या होत्या. त्या पादुकांचे दर्शन घेतांना ‘माझे मन, बुद्धी आणि देह यांवरील त्रासदायक आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवत होते.
उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘सनातन धर्मध्वज’ फडकवल्यावर मला वातावरणात पालट जाणवला. तेव्हा ‘सूक्ष्मातून सर्व देवता त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत. प्रत्येक साधकाच्या अंतर्मनात हिंदु राष्ट्राची स्थापना झाली आहे. गुरुदेवांनी सर्व साधकांना आशीर्वाद दिला आहे’, असे मला जाणवले.
ऊ. धन्वन्तरि याग चालू असतांना ‘माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यज्ञात अर्पण होऊन माझ्या अंतर्मनाची शुद्धी होत आहे. त्यामुळे माझे अंतर्मन शुद्ध, निर्मळ आणि पवित्र होऊन गुरुचरणी एकरूप होत आहे. यज्ञाच्या माध्यमातून गुरुमाऊली आम्हा साधकांना नवचैतन्य प्रदान करत आहेत. ते आम्हाला होत असलेले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करत आहेत अन् आमचे प्रारब्ध मोठ्या प्रमाणावर न्यून करत आहेत’, असे मला अनुभवता आले. ‘पुढील काळात आमच्याकडून गुरुदेवांना अपेक्षित अशी व्यष्टी आणि समष्टी साधना होऊ दे’, अशी माझी धन्वन्तरि देवतेच्या चरणी प्रार्थना होत होती.
ए. शतचंडी यज्ञ ‘ऑनलाईन’ पहातांना माझी देवीच्या चरणी प्रार्थना होत होती.
ऐ. कृपाळू सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या कृपेने ‘न भूतो न भविष्यति ।’ असा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ मला डोळे भरून पहाता आला. सर्व साधकांकडून मला भरभरून प्रेम मिळाले. ‘इतरांचा विचार कसा करायचा ?’, हे मला शिकता आले, तसेच ‘मी कुठे अल्प पडते ? मी साधनेचे प्रयत्न कसे वाढवू ?’, याविषयी माझ्या लक्षात आले.
‘गुरुमाऊलींच्या कृपेने मला जे शिकायला मिळाले, ते मला आचरणात आणता येऊ दे’, अशी मी गुरुदेवांच्या कोमल चरणी प्रार्थना करते.’
(क्रमशः)
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १८.६.२०२५)
|
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !