Netanyahu Apology : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी भ्रष्टाचारांच्या प्रकरणी राष्ट्रपतींची मागितली क्षमा !

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये राष्ट्रपती इसाक हर्झोग यांची औपचारिक क्षमा मागितली आहे. नेतान्याहू यांचे अधिवक्ता अमित हादद यांनी १११ पानांचा अर्ज सादर केला.

१. इस्रायलमध्ये राष्ट्रपतींना अधिकार आहे की, ते न्यायालयाने दोषी ठरवलेल्या लोकांना क्षमा करू शकतात. जनहिताशी संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीही क्षमा केली जाऊ शकते.

२. नेतान्याहू यांच्या विरोधात हा खटला मे २०२० मध्ये चालू झाला होता. त्यांच्यावर फसवणूक करणे, विश्वासघात करणे आणि लाच घेणे, अशा ३ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये खटला चालू आहे.

नेतान्याहू यांना शिक्षा झाली, तर सहन करणार नाही ! – ट्रम्प यांनी दिली होती धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनीही गेल्या आठवड्यात हर्झोग यांना पत्र लिहून नेतान्याहू यांच्या बाजूने क्षमेची विनंती केली होती. यापूर्वी ट्रम्प यांनी म्हटले होते की, जर नेतान्याहू यांना शिक्षा झाली, तर आम्ही ते सहन करणार नाही.

नेतान्याहू यांच्या विरोधात ३ खटले

१. नेतान्याहू यांच्यावर हॉलिवूडमधील चित्रपट निर्माते अर्नोन मिलचन आणि ऑस्ट्रेलियाचे अब्जाधीश जेम्स पॅकर यांच्याकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे. यात २ लाख डॉलर किमतीचे सिगार (एक प्रकारची सिगारेट), शॅम्पेन, दागिने इत्यादींचा समावेश आहे. या बदल्यात नेतान्याहू यांनी त्यांना राजकीय लाभ मिळवून दिला, असा आरोप आहे.

२. नेतान्याहू त्यांनी ‘येडियोट अहरोनोत’ या वृत्तपत्राच्या प्रकाशकाशी स्वतःसाठी सकारात्मक वार्तांकन करण्याचा करार केला. या बदल्यात त्यांनी प्रतिस्पर्धी वृत्तपत्र ‘इस्रायल हायोम’ला दुर्बल करणारा कायदा संमत करण्याची अट स्वीकारली.

३. नेतान्याहू यांनी बीजेक नावाच्या टेलिकॉम आस्थापनाला लाभ पोचवला आणि या बदल्यात मालक शाउल एलोविच यांच्या ‘वल्ला’ या वृत्तसंकेतस्थळावर स्वतःच्या बाजूने बातम्या छापून घेतल्या.

नेतन्याहू यांनी हे सर्व आरोप खोटे आणि राजकारणाने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. सध्या या प्रकरणात वर्ष २०२६ पर्यंत निकाल येण्याची शक्यता नाही. यानंतर नेतान्याहू सर्वोच्च न्यायालयातही आव्हान देऊ शकतात.