Bnei Menashe Jews : इस्रायल पुढील ५ वर्षांत भारतातील ५ सहस्र ८०० ज्यूंना स्वगृही नेणार !

गेल्या शेकडो वर्षांपासून होते विस्थापित !

बनेई मेनाशे समुदाय

तेल अवीव (इस्रायल) – इस्रायलने भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये रहाणार्‍या ‘बनेई मेनाशे’ समुदायाच्या ५ सहस्र ८०० ज्यूंना मायदेशी स्थायिक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ५ वर्षांची समयमर्यादा ठेवण्यात आली असून त्यांपैकी १ सहस्र २०० लोकांना वर्ष २०२६ मध्येच परत नेणार असल्याचे आधीच मान्य झाले आहे. वर्ष २००५ मध्ये इस्रायलचे धार्मिक गुरु श्लोमो अमार यांनी या समुदायाला ‘इस्रायली वंशाचे लोक’ म्हणून मान्यता दिली होती.

अशी असेल परत नेण्याची प्रक्रिया !

इस्रायल सरकारच्या निर्णयानंतर ज्यू धर्मगुरूंचे (‘रब्बी’ यांचे) मोठे पथक भारतात येणार आहे. या पथकात रब्बी (ज्यू धर्मगुरु) आणि धार्मिक कायद्याचे जाणकार (हलाखा) यांचा समावेश असेल. हे पथक ‘बनेई मेनाशे’ समुदायातील लोकांच्या धार्मिक ओळखीची तपासणी करतील. त्यांच्या धार्मिक परंपरा आणि जीवनशैली यांची तपासणी केली जाईल. पथक प्रत्येक कुटुंबाची वैयक्तिक मुलाखत घेईल. तपासणीनंतर लोकांसाठी ‘कन्व्हर्जन क्लासेस’ चालू होतील. त्यानंतर त्यांचे दस्तऐवजीकरण करून इस्रायलला नेण्यासाठी विमानांची सिद्धता केली जाईल. या सर्व कामांसाठी इस्रायल सरकार अनुमाने ९ कोटी शेकेल (साधारण २४० कोटी रुपये) इतका निधी खर्च करणार आहे.

मणीपूर आणि मिझोराम राज्यांत रहाणारा ‘बनेई मेनाशे’ समुदाय दावा करतो की, ते लोक प्राचीन इस्रायलच्या मेनाशे जमातीचे वंशज आहेत. इतिहासकारांनुसार हा समुदाय गेल्या ३०० ते ५०० वर्षांत भारतात आला असावा.

संपादकीय भूमिका

जगातील एकमेव ज्यू राष्ट्र इस्रायल सहस्रो वर्षांपासून विस्थापित असलेल्या ज्यू धर्मियांना मायदेशी नेत आहे. यातून त्याच्या धर्मनिष्ठेचे दर्शन होते. दुसरीकडे किती भारतीय हिंदु राजकारण्यांमध्ये स्वधर्माविषयी एवढी निष्ठा आहे ? काश्मिरी हिंदूंचे काश्मीर खोर्‍यात सुरक्षित पुनर्वसन का झालेले नाही ? पाक अन् बांगलादेश येथील हिंदूंना मायदेशात आणण्याची प्रक्रिया का चालू झाली नाही ? याचा विचार होणे आवश्यक !