श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मुक्तीनाथ, नेपाळ येथे जाण्यासाठी केलेला विमानप्रवास आणि त्यांनी अनुभवलेली मारुतिरायाची कृपा !

‘महर्षींनी नाडीपट्टीत उल्लेख केल्यानुसार आम्ही (मी आणि काही साधक) नेपाळमधील मुक्तीनाथ या तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी गेलो होतो. पृथ्वीवरील श्रीविष्णूच्या १०८ दिव्य तीर्थक्षेत्रांपैकी मुक्तीनाथ हे एक आहे. या ठिकाणी जातांना विमानातून केलेला प्रवास आणि मला आलेली अनुभूती यांविषयी येथे दिले आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. मुक्तीनाथला जाण्यासाठी पोखरा या ठिकाणाहून जोमसोम येथे जाण्यासाठी केवळ २० मिनिटांचा विमान प्रवास करावा लागणे; मात्र हा विमान प्रवास मोठ्या हिमशिखरांमधून होत असणे अन् हा प्रवास मृत्यूच्या तोंडातून बाहेर येण्यासारखाच असणे

‘मुक्तीनाथला जाण्यासाठी पोखरा या ठिकाणाहून आम्ही लहान विमानाने जोमसोम या ठिकाणी गेलो. तेथून काही अंतरावर मुक्तीनाथाचे मंदिर आहे. आम्हाला आमच्या स्थानिक मार्गदर्शकाने सांगितल्याप्रमाणे त्या वेळचे हवामान, वातावरण आणि एकूण परिस्थिती पहाता रस्त्याने जाणे अधिक कठीण होते. त्यामुळे केवळ २० मिनिटांचा विमान प्रवास करून पोखरा या ठिकाणाहून जोमसोमला जावे लागते; पण हा २० मिनिटांचा प्रवास कधी कधी मृत्यूच्या तोंडातून बाहेर येण्यासारखाच असतो. जोमसोम विमानतळ हा नेपाळमधील धोकादायक विमानतळांपैकी एक आहे. हा समुद्रसपाटीपासून किमान ८ सहस्र ९०० फूट उंचीवर आहे.  येथे जातांना जगातील काही मोठी हिमशिखरे जसे धौलगिरी २६ सहस्र ७९५ फूट, नीलगिरी सेंट्रल २२ सहस्र ७६९ फूट आणि अन्नपूर्णा २६ सहस्र ५४५ फुटांवर उंच असल्याने यांच्यामधून जावे लागते.

मुक्तीनाथ तीर्थक्षेत्र

२. विमान उड्डाणाच्या विरोधात जाणारी ‘अनपेक्षित वार्‍याची गती आणि अकस्मात् येणारे काळे ढग’ हे या प्रवासामधील सर्वांत मोठे अडथळे असणे आणि विमान आकाशात गेल्यावर ‘हवामानात कधी पालट होईल ?’, याचा नेम नसणे

विमान उड्डाणाच्या विरोधात जाणारी ‘अनपेक्षित वार्‍याची गती आणि अकस्मात् येणारे काळे ढग’ हे या प्रवासामधील सर्वांत मोठे अडथळे आहेत. २५ ते ३० प्रवासीच बसू शकतील, एवढे विमान लहान असते. त्यामुळे वार्‍याची अधिक भीती असते. प्रतिकूल हवामानामुळे बर्‍याचदा या मार्गे जाणार्‍या विमानांचे आजपर्यंत अपघात झालेले ऐकण्यात आले आहेत. विमानाचे उड्डाण होतांना जरी हवामान चांगले असले, तरीही विमान आकाशात गेल्यावर ‘हवामानात कधी पालट होईल ?’ याचा नेम नसतो.

३. विमानप्रवासाच्या आरंभी मारुतिरायाला प्रार्थना केल्यावर त्याची अनुभवलेली कृपा

३ अ. ‘मारुतिरायाने त्याच्या हातांत विमान घेऊन ते सुखरूप जोमसोमला आणले’, असे जाणवणे आणि विमान ज्या क्षणी खाली भूमीवर उतरले, त्या क्षणी मारुतिरायाच्या मुखातून निघालेला गंभीर आणि दीर्घ हुंकार ऐकू येणे : आम्ही मुक्तीनाथाच्या चरणी भार सोडून आणि महर्षि अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करून आमचा प्रवास चालू केला. मी वायुपुत्र हनुमंताला प्रार्थना केली, ‘हे मारुतिराया, आपणच आमचा हा प्रवास सुखरूप करून घ्यावा.’ देवाच्या कृपेने आमच्या विमानाचे उड्डाण होत असतांना हवामान चांगले होते आणि काळे ढग नसल्याने सूर्यप्रकाशही चांगला होता. विमान प्रवासात मी संपूर्णतः मारुतिरायाचे ध्यान करत होते. त्या वेळी मला जाणवले, ‘मारुतिरायानेच त्याच्या हातांत आमचे विमान घेऊन ते सुखरूप जोमसोम येथे आणले.’ आमचे विमान ज्या क्षणी खाली भूमीवर उतरले, त्या क्षणी मला मारुतिरायाच्या मुखातून निघालेला गंभीर आणि दीर्घ हुं ऽऽऽऽ (हुंकार) असा नाद ऐकू आला. मारुतिरायानेच आमचे विमान सुरक्षित खाली उतरवले. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने चालू असलेला आमचा हा प्रवास खरंच ‘दैवी प्रवास’ आहे’, याची देवाने आम्हा सर्वांनाच अनुभूती दिली.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, मुक्तीनाथ-जोमसोम, नेपाळ.

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक