आपल्यापासून संगणक आणि दूरचित्रवाणी संच यांच्या पडद्याचे आदर्श अंतर किती असावे ?

निरोगी जीवनासाठी व्यायाम – लेखांक १०१

अर्गाेनॉमिक्स

(टीप : अर्गोनॉमिक्स : दैनंदिन कामे करतांना शरिराच्या ठेवणीविषयी पाळायचे नियम.)

‘संगणक वापरतांना किंवा दूरचित्रवाणी पहातांना त्यांच्या पडद्यापासून किती दूर बसावे ?’, असा प्रश्न सर्वांना पडतो. लहानपणी जवळून दूरचित्रवाणी पाहिल्यामुळे काहींनी आई-वडिलांची बोलणी नक्कीच खाल्ली असतील !  ‘नेमकेपणाने हे अंतर किती हवे ?’, हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.             

(भाग ५)

भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/976089.html

व्यक्तीसमोर संगणकाच्या पडद्याची आदर्श उंची

१. पडद्याचे अंतर चुकीचे असल्यास डोळ्यांवर काय परिणाम होतो ?

अ. डोळ्यांच्या स्नायूंना अनैसर्गिक स्थितीमध्ये अधिक काळ कार्यान्वित रहावे लागते. त्यामुळे ते दमतात आणि डोळ्यांचा क्रमांक वाढू शकतो.

आ. अल्प अंतरावरून संगणक किंवा दूरचित्रवाणी संच पाहिल्यास त्याचे किरण अधिक प्रमाणात ग्रहण होतात. त्यामुळे अधिक उष्णता निर्माण होऊन डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो.

श्री. निमिष म्हात्रे

२. पडद्याचे अंतर चुकीचे असल्यास मानेवर होणारा परिणाम !

अ. पडदा अधिक जवळ असल्यास मानेची अधिक हालचाल करावी लागते.

आ. पडदा अधिक दूर असल्यास मान आणि पाठ पुढे झुकते.

३. आपल्यापासून संगणकीय पडद्याचे आदर्श अंतर 

पडद्याचे आदर्श अंतर हे त्याच्या आकारानुसार ठरते.

अ. सर्वसाधारण संगणकीय पडदे २४ ते २७ इंच या (Diagonal) आकाराचे असतात. त्यांसाठी २० ते २४ इंच (अंदाजे एक हात) अंतर ठेवावे.

आ. काही मोठ्या कामांसाठी (‘गेम्स’, ‘व्हिडिओ एडिटिंग’, ‘मल्टीटास्किंग’ यांसाठी) संगणकीय पडदे अधिक मोठे (सुमारे ३२ – ३४ इंच) असतात. त्यांसाठी २७ ते ३५ इंच अंतर ठेवावे.

इ. दोन संगणकीय पडदे (ड्युएल मॉनिटर्स) : ‘व्हिडिओ एडिटिंग’सारख्या मोठ्या कामांसाठी दोन संगणकीय पडदे (ड्युएल मॉनिटर्स) वापरले जातात. दोन पडद्यांपैकी मुख्य (primary) पडदा नेहमी आपल्या समोर ठेवावा. तुम्ही ज्या हाताचा नेहमी उपयोग करता, त्या बाजूला दुसरा (secondary) पडदा ठेवावा, उदा. तुम्ही डावखुरे असाल, तर पडदा तुमच्या डाव्या बाजूला ठेवावा. दोन्ही पडदे १५ ते ३० अंश आतल्या बाजूला तिरके ठेवावेत. दोन्ही पडद्यांचे बाहेरचे कोपरेही मान न वळवता पहाता येतील, अशा प्रकारे ते ठेवावेत. अंतराचे नियम वरीलप्रमाणेच आहेत.

४. आपल्यापासून दूरचित्रवाणी संचाच्या पडद्याचे आदर्श अंतर

सध्या दूरचित्रवाणी संचाच्या पडद्यांचा (Diagonal) आकार आधीच्या तुलनेत पुष्कळ वाढला आहे. ४२ इंच ते ७५ – ८० इंच आकाराचे दूरचित्रवाहिनी संचाचे पडदे आपल्याला पहायला मिळतात.

अ. जागतिक मान्यतेनुसार दूरचित्रवाणी संचाच्या पडद्याच्या आकाराला १.२ ने गुणून आलेले अंतर हे न्यूनतम अंतर असते, म्हणजे १.२ Ñ पडद्याचा आकार = दूरचित्रवाणी संच आणि प्रेक्षक यांमधील न्यूनतम अंतर उदा. दूरचित्रवाहिनी संचाचा आकार ६५ इंच असला, तर १.२ Ñ ६५ = ७८ इंच, एवढे न्यूनतम अंतर असायला हवे.

आ. पडद्याच्या आकाराला १.६ ने गुणून आलेले अंतर हे अधिकतम अंतर असते, म्हणजे १.६ Ñ पडद्याचा आकार = दूरचित्रवाणी संच आणि प्रेक्षक यांमधील अधिकतम अंतर उदा. दूरचित्रवाणी संचाचा आकार ६५ इंच असला, तर १.६ Ñ ६५ = १०४ इंच, एवढे अधिकतम अंतर असायला हवे.

५. दूरचित्रवाणी संचाच्या पडद्याचा मध्य डोळ्यां‍च्या रेषेत हवा !

संगणकीय पडद्याची उंची आपण आपल्या डोळ्यांच्या रेषेखाली ठेवतो; पण दूरचित्रवाणी संचाविषयी ते शक्य नसते; कारण सध्या दूरचित्रवाहिनी संच थोडे वर लावण्याची पद्धत आहे. असे असले, तरी याला मर्यादा घालणे आवश्यक आहे. दूरचित्रवाहिनी संचाच्या पडद्याचा मध्य डोळ्यां‍च्या रेषेत हवा. हे साध्य करण्यासाठी हा मध्य २० अंशापेक्षा अधिक वर गेल्यास मानेच्या स्नायूंवर ताण येतो. दूरचित्रवाणी संच अनेक जण मिळून पहात असतील, तर सर्व नियम पाळणे कठीण जाऊ शकते; पण ३ – ४ जणांच्या संदर्भात तरी वरील दक्षता पाळू शकतो.’ (११.११.२०२५)

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा.

🪷 ‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷