खादाड बनवणारी ‘अनलिमिटेड (अमर्यादित)’ थाळी !

अमर्यादित थाळी

मध्यंतरी मी एका नातेवाईकांकडे भेटायला गेलो. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘शेजारच्या उपाहारगृहात ‘अनलिमिटेड’, म्हणजे अमर्यादित थाळी जेवायला जाऊया. तेथील जेवण वाजवी दरात, चवीला छान आणि मुबलक प्रमाणात असते.’’ कुतूहल म्हणून मी त्यांना ‘थाळीमध्ये कोणते पदार्थ असतात ?’, हे विचारले.

श्री. योगेश जलतारे

त्यांनी मला थाळीतील पदार्थांची सूची दाखवल्यावर माझे डोळे विस्फारले. त्या थाळीच्या सूचीत जवळजवळ २० हून अधिक पदार्थ होते. तितक्या पदार्थात माझ्यासारख्या ५-६ लोकांचे जेवण आरामात होईल, इतके त्यांचे प्रमाणही होते. त्या वेळी मी यासंबंधी नातेवाइकांशी चर्चा केली. तेव्हा कळले की, ही थाळी प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्रपणे मागवायची असते. एका थाळीमध्ये एकाच कुटुंबातील दोघे-तिघे जेवू शकत नाहीत, तसेच या थाळीतील पदार्थ जर का उरले, तर ते घरी बांधून आणता येत नाहीत किंवा कुणी आणतही नाही. ते उरलेले पदार्थ उष्ट्या ताटातील असल्याने स्वाभाविकपणे टाकून दिले जातात. हे ऐकल्यानंतर ‘यातून अन्नाची किती नासाडी होत असेल ?’, असा प्रश्न मला पडला. मी नातेवाइकांना विनम्रपणे ‘इतके पदार्थ संपवण्याची माझी क्षमता नाही’, असे सांगून नकार दिला.

अधिक पदार्थ खाण्याचा प्रयत्न आजाराला निमंत्रण नव्हे का ?

एका सामान्य निरोगी माणसाचा आहार फारतर ३-४ मध्यम आकाराच्या पोळ्या, एक ते दीड वाटी भाजी, तितकाच भात आणि आमटी, जोडीला अर्धी वाटी दही, ताक असे काहीतरी आणि अगदीच वाढवायचे झाल्यास एखादा गोड पदार्थ यापेक्षा अधिक नसतो.

आहारशास्त्रानुसारही यापेक्षा अधिक पदार्थ खाणे, हे त्या खाणार्‍याला अहितकारक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर इतके पदार्थ विशिष्ट दरात ठेवून लोकांमध्ये खाण्याची स्पर्धा लावून त्यांना खादाड बनवणे कितपत योग्य आहे ? एखादी व्यक्ती पैसे वसूल करण्याच्या दृष्टीने अधिक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती निश्चितपणे आजाराला निमंत्रण देत नसेल का ?

आमिषाला भुलण्यापेक्षा समाजभान ठेवून विवेकाने वागणे महत्त्वाचे !

‘अमर्यादित थाळी खाणे, हा प्रकार आरोग्याला घातक आहे’, हे लक्षात येऊनही कुणीही राजकारणी, लोकनेते, समाजधुरीण, डॉक्टर किंवा आरोग्य खाते याविषयी भाष्य करत नाही, हे आश्चर्यकारक आहे. भारतामध्ये सहस्रो लोक प्रतिदिन अर्धपोटी किंवा उपाशीपोटी झोपत असतांना काही खवय्यांनी अशा प्रकारे अन्नाची नासाडी करणे, हे एक प्रकारचे पाप नाही का ? मोठ्या शहरांमध्ये हे असे ‘अनलिमिटेड’, म्हणजे अमर्यादित जेवणाची चुरस आज अनेक उपाहारगृहे लावत आहेत. या वेळी पट्टीच्या खवय्यांना विविध प्रकारचे आमीष ही उपाहारगृहे दाखवतात. या आमिषाला युवा पिढीच नव्हे, तर अन्य वयोगटातील लोकही भुलतात. ही अमर्यादित थाळी खाण्यासाठी लोक कितीतरी वेळ उपाहारगृहाच्या बाहेर वाटही पहातात (म्हणजे तितकी ‘वेटींग लिस्ट’ असते.).

‘कुणी किती आणि कुठे खावे ? काय खावे ? कशा प्रकारे खावे ?’, हे सर्व व्यक्तीगत प्रश्न असल्याने याविषयी फार आग्रही रहाता येणार नाही. कदाचित् शासनालाही यावर निर्बंध घालता येणार नाहीत; परंतु समाजभान ठेवून लोक आणि संबंधित उपाहारगृह चालवणारे मालक यांनी याचा विवेकाने विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा ही अमर्यादित थाळी स्वतःचे आयुष्य मर्यादेच्या अलीकडेच संपवल्याविना रहाणार नाही.’

– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसिद्धीमाध्यम. (१४.११.२०२५)