सद्गुरु अनुराधा वाडेकर रुग्णालयात असतांना साधिका डॉ. अंजली पाटील यांना आलेली अनुभूती आणि त्यांच्यावर प्रत्यक्ष शस्त्रकर्म करणार्‍या डॉ. (सौ.) शुभदा खंडेपारकर यांना जाणवलेली सूत्रे

२७.७.२०२५ या दिवशी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे मुंबईतील एका रुग्णालयात एक लहानसे शस्त्रकर्म झाले. त्या वेळी रुग्णालयात त्यांच्या समवेत डॉ. अंजली पाटील होत्या. या कालावधीत डॉ. अंजली पाटील यांना आलेली अनुभूती आणि त्यांच्यावर प्रत्यक्ष शस्त्रकर्म करणार्‍या डॉ. (सौ.) शुभदा खंडेपारकर यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत. 

सद्गुरु अनुराधा वाडेकर

१. डॉ. अंजली पाटील, ठाणे

‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे शस्त्रकर्म माझी जवळची मैत्रीण डॉ. (सौ.) शुभदा खंडेपारकर यांच्या मुंबईतील दादर येथील रुग्णालयात करण्याचे ठरले आणि गुरुकृपेने मला सेवेची संधी मिळाली. त्या वेळी मी नाशिक येथे होते.

१ अ. दादरला रुग्णालयात जातांना ‘घरातील आवराआवर एकटीने कशी करायची ?’, असा विचार करतांना साधिकेच्या डोळ्यांसमोर प्रकाशाचा एक मोठा झोत येऊन तिला शरिरात शक्ती आल्याचे जाणवणे : सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे शस्त्रकर्म असल्याने त्या सेवेसाठी मला नाशिक येथून दादरला रुग्णालयात जायचे होते. त्या वेळी पुष्कळ पाऊस पडत होता आणि घरातले सर्व एकटीलाच आवरायचे होते. ‘सर्व पटपट कसे आवरायचे ?’, या विचारांत मी डोळे मिटले. तोच प्रकाशाचा एक मोठा झोत माझ्या डोळ्यांसमोर आला आणि विचारांमध्ये गुंतलेले माझे मन एकदम शांत झाले. अकस्मात् माझ्या शरिरात शक्ती आल्यासारखे झाले आणि मी घरातली कामे भरभर आवरून पहाटे ५ वाजता दादरला जायला निघाले.

डॉ. अंजली पाटील

१ आ. ‘नाशिक येथे घरी असतांना पाहिलेला प्रकाशझोत रुग्णालयात सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शरिरावर सतत पडत आहे’, असे दिसणे : रुग्णालयात पोचल्यानंतर मी सद्गुरु अनुराधाताई असलेल्या शस्त्रकर्मगृहात गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘घरी असतांना मला जो प्रकाशझोत दिसला होता, अगदी तसाच प्रकाशझोत सद्गुरु अनुराधाताई यांच्या शरिरावर सतत पडत आहे’, असे मला दिसले.

१ इ. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या शरिरावर पडत असलेला दिव्य प्रकाश पाहून जाणवलेली सूत्रे 

१. तो दिव्य प्रकाश पाहून मी शरणागतभावाने त्याला नमस्कार केला आणि प्रार्थना केली. त्या वेळी माझे मन अगदी निर्विचार झाले होते.

२. आतून मला एक अनामिक आनंद जाणवला आणि माझा नामजप एका लयीत होऊ लागला.

३. मला ईश्वराच्या अस्तित्वाची प्रत्यक्ष प्रचीती आली.

सद्गुरु अनुराधाताईंचे शस्त्रकर्म व्यवस्थित पार पडले आणि त्यांना लवकरच बरे वाटले. ईश्वराच्या कृपेने मला सद्गुरु अनुराधाताई आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचा सत्संग मिळाला. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत राहून अडचणींमध्ये कशी काळजी घेतात’, याची मला पुन्हा एकदा अनुभूती आली.

१ उ. आधुनिक वैद्या आणि रुग्णालयातील परिचारिका यांना साधनाविषयक सूत्रे सांगणे : दुसर्‍या दिवशी माझी मैत्रीण डॉ. शुभदा आणि रुग्णालयात काम करणार्‍या परिचारिका यांना आम्ही (सद्गुरु अनुराधाताई, पू. (सौ.) संगीताताई आणि मी) साधनाविषयक सूत्रे सांगितली. सद्गुरु अनुराधाताई आणि पू. (सौ.) संगीताताई यांचा मोठा सत्संग आम्हा सर्वांना मिळाला. याविषयी गुरुदेव आणि सद्गुरु अनुराधाताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२. डॉ. (सौ.) शुभदा संजीव खंडेपारकर, मुंबई

२ अ. शस्त्रकर्मानंतर सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक संयम पाहून आश्चर्यचकित होणे अन् ‘त्या खरोखरंच एक संतुलित व्यक्ती आहेत’, असे जाणवणे : ‘माझी जिवलग मैत्रीण डॉ. अंजली पाटील हिच्या ओळखीने सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे एक लहानसे शस्त्रकर्म माझ्या रुग्णालयात करायचे ठरले. त्याविषयी मला थोडी चिंता वाटत होती. सद्गुरु अनुराधाताई या ‘सनातन संस्थेच्या सद्गुरु असून त्या ‘धर्मप्रसारक’ म्हणून सेवा करतात’, असे मला माझ्या मैत्रिणीने, डॉ. अंजली पाटील हिने सांगितले होते. सद्गुरु अनुराधाताई यांनी केलेल्या प्रार्थनांमुळेच कोणतीही अडचण न येता शस्त्रकर्म अगदी व्यवस्थित पार पडले. सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे रुग्णालयात असतांना सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी एकदाही ‘मला दुखते’ किंवा ‘काही त्रास होत आहे’, असे कोणतेही गार्‍हाणे केले नाही किंवा प्रश्न विचारून कोणता ताणही दिला नाही. त्यांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक संयम पाहून मी आश्चर्यचकित झाले. ‘त्या खरोखरंच एक संतुलित व्यक्ती आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

२ आ. ‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे शस्त्रकर्म आणि त्यांचे रुग्णालयातील वास्तव्य’ यांतून बरेच शिकता येऊन साधना करण्याची प्रेरणा मिळणे : सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी आणि माझ्या मैत्रिणीने (डॉ. अंजली पाटील हिने) मला सनातन संस्थेविषयी माहिती दिली अन् साधनेविषयी चांगले मार्गदर्शन केले. मला सोप्या भाषेत साधनेची काही सूत्रे समजावून सांगितली. एकूणच सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे शस्त्रकर्म आणि त्यांचे रुग्णालयातील वास्तव्य यांतून मला बरेच काही शिकायला मिळाले आणि साधना करण्याची प्रेरणा मिळाली, याविषयी धन्यवाद !’ (ऑगस्ट २०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक