Neuro-Weapon Threat : विज्ञानातील जलद प्रगतीमुळे मानवी मेंदू भविष्यात युद्धाचे नवे मैदान बनू शकतो ! – मायकल क्रॉउली आणि मॅल्कम डँडो, संशोधक, ब्रॅडफोर्ड विद्यापिठ

युनायटेड किंग्डमधील ब्रॅडफोर्ड विद्यापिठातील नामवंत संशोधकांचे मत

मायकल क्रॉउली आणि मॅल्कम डँडो

लंडन (युनायटेड किंग्डम) – ब्रॅडफोर्ड विद्यापिठातील मायकल क्रॉउली आणि मॅल्कम डँडो या नामवंत संशोधकांनी कठोर शब्दांत चेतावणी दिली आहे की, विज्ञानातील जलद प्रगतीमुळे भविष्यात मानवी मेंदू युद्धाचे नवे मैदान बनू शकतो. त्यांचे स्पष्ट मत आहे की, जर आताच जगाने याविषयी कठोर पावले उचलली नाहीत, तर येणार्‍या काळात लढाया बंदुकांनी नव्हे, तर थेट मेंदूला लक्ष्य करणार्‍या नवीन तंत्रज्ञानाने लढल्या जातील.

१. क्रॉउली आणि डँडो हे दोन्ही तज्ञ याच आठवड्यात नॅदरलँड्स येथील हेग येथे ‘रासायनिक शस्त्रे’ या विषयावर होणार्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.

२. या परिषदेत ते जगाला पटवून देणार आहेत की, मानवी मेंदूवर परिणाम करणारे तंत्रज्ञान इतक्या वेगाने विकसित होत आहे की, ते वेळीच रोखले नाही, तर मोठे धोके निर्माण होऊ शकतात.

३. क्रॉउली यांच्या मते ही गोष्ट केवळ कल्पनेसारखी वाटत असली, तरी धोका अगदी खरा आहे.

४. या दोन्ही तज्ञांचे म्हणणे आहे की, भविष्यात युद्ध शस्त्रांनी नव्हे, तर थेट मानवी मेंदूवर लढली जातील. जिथे शत्रू एकही गोळी न चालवता तुमची विचार करण्याची क्षमता, स्मृती, आकलनशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता स्वतःच्या आवश्यकतेनुसार पालटू शकेल. हे ऐकायला एखाद्या चित्रपटासारखे वाटू शकते; पण असे भविष्य आता फार दूर नाही.