रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहाण्यासाठी आलेल्या सौ. माया स्वप्नील सावरकर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा लाभलेला सत्संग आणि गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन

मुंबई येथील व्यावसायिक सौ. माया स्वप्नील सावरकर या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे ज्येष्ठ साहाय्यक आचार्य बाळाराव सावरकर यांच्या नातसून आहेत. त्या रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहाण्यासाठी आल्या असतांना त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. या वेळी झालेले संभाषण आणि गुरुदेवांनी त्यांना केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुम्ही आश्रम पाहिला का ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सौ. माया स्वप्नील सावरकर : हो. पाहिला. आश्रम अतिशय सुंदर आहे. ‘पृथ्वीवरील स्वर्ग’, म्हणतो, तसाच तो आहे. इकडे आल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. माझी पुष्कळ दिवसांची इच्छा पूर्ण झाली. मी आश्रमातील साधक-साधिकांना पहाते. तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून माझ्या मनाला पुष्कळ समाधान वाटले. त्या सर्वांनी ‘स्वतःची आध्यात्मिक उन्नती साधता साधता देशकार्यालाही वाहून घेतले आहे’, असे मला जाणवले. सर्व साधक पुष्कळ समाधानी आणि सोज्वळ आहेत. ते सगळे जण इतके सुंदर हसतात की, त्यांच्याकडे बघून पुष्कळ छान वाटते. ‘साधकांच्या संपर्कात सतत रहावे. त्यांना भेटावे, त्यांच्याशी बोलावे आणि विचारांचे आदानप्रदान करावे’, असे मला वाटते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : साधकांना नुसते पाहूनच तुम्हाला हे सगळे कळले. शब्दांनी काही सांगावे लागले नाही. खूप छान ! तुम्ही ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ करत असलेले आध्यात्मिक संशोधन पाहिले का ? ‘बाहेरचे संशोधन आणि इकडचे संशोधन’ या दोन्हींमधला फरक कळला का ?

सौ. माया सावरकर

सौ. माया सावरकर : येथे संशोधन करतांना अनेक वैज्ञानिक उपकरणांचा वापर केला जातो. या सर्व संशोधनात्मक प्रयोगांना विज्ञानाचा एक मोठा पाया आहे. त्यामुळे येथे होत असलेल्या संशोधनात्मक प्रयोगांमध्ये मला परिपूर्णता जाणवली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : जाणवली ना ! आणखी नवीन काय कळले ?

सौ. माया सावरकर : काल मला हा प्रश्‍न पडला होता, ‘आपण नेहमी म्हणतो की, ‘कलियुगामध्ये पुढे आणखी अधिक वाईट दिवस येणार आहेत.’ खरेतर आपण नेहमी विचार चांगले ठेवले पाहिजेत ना; कारण आपण जे विचार सतत करतो, तेच कृतीमध्येही येतात, म्हणजे आपल्या विचारांप्रमाणे कृती घडते किंवा तसेच प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात. हे असे आहे, तर आपण ‘पुढे वाईट दिवस येणार आहेत’, असा विचार नेहमी का करायचा ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : नुसत्या विचारांनी काही घडत नसते. त्यासाठी साधना करून आध्यात्मिक पातळी वाढवायला पाहिजे. कमीत कमी संतांच्या पातळीपर्यंत (७१ टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत) पोचले पाहिजे, तरच नुसत्या विचारांनीही तसे घडायला लागते. सर्वसाधारण व्यक्तीने नुसते विचार करून, म्हणजे ‘मी हे करीन, मी ते करीन’, असा विचार करून काही फरक पडत नाही. शेवटी अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे.

सौ. माया सावरकर : मला प्रश्‍न हा होता की, ‘आपण असे का समजतो की, ‘वाईट दिवस येणारच आहेत !’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : नाही. आपण केवळ तसे समजत नाही. आपण वर्तमानकाळात रहातो. साधू किंवा ऋषी यांच्याकडे एखादी व्यक्ती गेली, तर ते ‘भूतकाळात त्या व्यक्तीने कोणता जन्म घेतला होता ? तसेच पुढे काय होणार आहे ?’, याविषयी सांगतात. त्यांना व्यक्तीच्या भूत आणि भविष्य या काळांविषयी कळते. सर्वसामान्य व्यक्तीला केवळ ‘सध्या काय आहे ?’, एवढेच कळते. तिला मागचे आणि पुढचे काही कळत नाही. साधू किंवा ऋषी पुढच्या, म्हणजे भविष्य काळाविषयी सांगून लोकांना जागृत करतात. ‘मनुष्यजन्म मिळाला आहे. त्याचा लाभ करून घ्या, साधना करा’, हे सर्वसामान्यांना कळावे, यासाठी ते तसे सांगतात.

सौ. माया सावरकर : ईश्‍वर प्रत्येक गोष्टीला ‘तथास्तु’ असे म्हणत असतो ना ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो; पण ईश्‍वर कुणाला साहाय्य करतो ? जो साधना करतो, त्याला साहाय्य करतो. सर्वसामान्य माणसांना ईश्‍वराने कशासाठी जन्माला घातले आहे ? तर प्रारब्धभोग संपवायला जन्माला घातले आहे.

सौ. माया सावरकर : हो; पण ‘पुढचा काळ कठीण येणार आहे’, हा विचार आताच कशाला करायचा ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : प्राण्यांना ‘पुढचा काळ’ इत्यादी काही कळत नाही; आपण मनुष्य आहोत. आपण शिक्षण घेतो. पुढे उच्च शिक्षण घेतो. ‘पुढची पुढची अधिकाराची जागा आपल्याला मिळेल का ?’, याविषयी सतत विचार करतो, म्हणजे पृथ्वीवरील जीवनाचा विचार करत असतो. त्याचप्रमाणे आपण आध्यात्मिक जीवनाचाही विचार केला पाहिजे ना ? नाहीतर नुसते जन्मच घेतच रहाणार ! आतापर्यंत आपण सहस्रो जन्म घेतले आहेत आणि यापुढेही सहस्रो जन्म घ्यावे लागतील ! एवढे जन्म म्हणजे दुःखच भोगणार ना ? आता आपल्याला पुन्हा जन्मच नको आहे. आपल्याला आता थेट ईश्‍वराकडे जायचे आहे ! (ईश्‍वरप्राप्ती करायची आहे.) या जन्मातच अशी साधना करायची की, भू, भूव, स्वर्ग, महा, जन, तप, सत्य इत्यादी लोक पार करून ईश्‍वरापर्यंत जायचे आहे. पुढे पुढे जायचे आहे. ज्यांना पुढे जायचे आहे, तेच साधना करतात. ज्यांना पुढे जायचे नाही, ते बुद्धीच्या स्तरावर रहातात.