मधुमेहावरील उपचार, म्हणजे केवळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे नव्हे !

‘डायबेटिस’चे (मधुमेहाचे) व्यवस्थापन, म्हणजे केवळ रक्तातील साखरेचे आकडे सांभाळणे नव्हे, तर त्या वाढलेल्या साखरेमुळे शरिराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांवर होणारे दूरगामी दुष्परिणाम (सिस्टेमिक कॉम्प्लिकेशन्स) टाळणे, हेच खरे आव्हान आहे. हा विचार मधुमेहाचे उपचार करतांना प्रारंभीपासूनच करणे अत्यावश्यक असते. ‘आयुर्वेद’ या विषयात अत्यंत प्रभावीपणे काम करतो; कारण आयुर्वेदाचा मूळ दृष्टीकोनच ‘संपूर्ण शरिराचा’ साकल्याने विचार करणारा आहे. आयुर्वेद या ‘कॉम्प्लिकेशन्स’कडे (उपद्रवांकडे) कसे पहातो आणि ते टाळण्यासाठी कसा प्रयत्न करतो, ते थोडक्यात पाहूया.

१. मूळ संकल्पना : ‘धातू क्षय’ आणि ‘ओज क्षय’

आयुर्वेदानुसार मधुमेह हा प्रामुख्याने ‘कफ’ आणि ‘मेद’ (चरबी) यांच्या असंतुलनातून चालू होतो; पण तो जेव्हा जुना होतो, तेव्हा तो ‘वात’ दोषाला प्रबळ करतो. हा वाढलेला वातदोष शरिरातील ‘धातूंचे’ (शरिराचे सातही घटक – रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र) पोषण करू देत नाही. या अवस्थेला ‘धातू क्षय’ म्हणतात.

यासह मधुमेह हा ‘ओज क्षय’ करणारा आजार मानला आहे. ‘ओज’ हे सर्व धातूंचे सार आणि शरिराची मुख्य ऊर्जा आहे. जेव्हा ओज न्यून होते, तेव्हाच शरीर विविध उपद्रवांना (कॉम्प्लिकेशन्स) बळी पडते.

आयुर्वेदाचे मुख्य लक्ष्य हे रक्तातील साखर न्यून करण्यासह हा ‘धातूक्षय’ आणि ‘ओजक्षय’ थांबवणे, हे असते.

वैद्य परीक्षित शेवडे

२. आयुर्वेदाची दुहेरी उपचारपद्धत

आयुर्वेद एकाच वेळी २ पातळ्यांवर काम करतो.

अ. व्याधी-हर (रोगावर उपचार) : यात रक्तातील साखर नियंत्रित करणार्‍या औषधांचा आणि पथ्याचा समावेश होतो. हे रक्तातील अतिरिक्त ‘क्लेद’ (ओलावा/चिकटपणा) न्यून करते.

आ. रसायन (पुनरुज्जीवन आणि संरक्षण) : हा आयुर्वेदाचा सर्वांत महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे, जो थेट दूरगामी दुष्परिणाम टाळण्यासाठी काम करतो. ‘रसायन’ चिकित्सा, म्हणजे ती चिकित्सा जी धातूंचे पोषण करते, त्यांचे कार्य सुधारते आणि वार्धक्य किंवा रोगामुळे होणारी झीज थांबवते.

लेखात नमूद केलेली वनस्पतींची नावे केवळ माहितीसाठी दिली आहेत; स्वयंउपचारासाठी नाही. ही केवळ वरवरची काही उदाहरणे आहेत. प्रत्यक्षात अनेक वनस्पती/रसौषधी वापरून प्रत्येक रुग्णाचे वैयक्तिक औषध सिद्ध केले जात असते.

– वैद्य परीक्षित शेवडे

३. ‘रसायन’ चिकित्सा ‘कॉम्प्लिकेशन्स’वर कशी काम करते ?

मधुमेहाचे मुख्य उपद्रव हे मज्जासंस्था, डोळे, किडनी आणि हृदय यांच्याशी संबंधित असतात. आपले वैद्य मधुमेहावर आपल्याला उपचार देतांना या प्रत्येकासाठी विशिष्ट ‘रसायन’ औषधे वापरतात :

अ. न्यूरोपॅथी (Nervous System Protection)

अ १. लक्षण : हाता-पायाला मुंग्या येणे, बधीर होणे, जळजळ होणे.

अ २. आयुर्वेदाचा विचार : हा ‘मज्जा धातू’ आणि ‘वात’ दोषाचा प्रकोप आहे.

अ ३. उपचार : येथे ‘वातशामक’ आणि ‘मज्जा धातू’चे पोषण करणारी औषधे (जसे अश्वगंधा, बला, गुळवेल) अन् विशिष्ट तेलांच्या ‘बस्ती’चा वापर केला जातो. ‘बस्ती चिकित्सा’ हा वातदोषावरील सर्वश्रेष्ठ उपाय असल्याने ती ‘न्यूरोपॅथी’ रोखण्यात अत्यंत प्रभावी ठरते.

आ. नेफ्रोपॅथी (Kidney Protection)

आ १. लक्षण : किडनीच्या कार्यावर परिणाम होणे, ‘क्रिएटिनिन’ वाढणे.

आ २. आयुर्वेदाचा विचार : ‘मूत्रवह स्रोत’ आणि ‘रक्त अन् मेद धातू’ यांवरील अतिरिक्त ताण.

आ ३. उपचार : आयुर्वेद ‘वृक्क-संरक्षक’ (Nephroprotective) औषधांचा वापर करतो. ही औषधे किडनीचे कार्य सुधारतात आणि शरिरातील विषारी घटक बाहेर काढण्यास साहाय्य करतात. उदाहरणार्थ ‘पुनर्नवा’ आणि ‘गोक्षुर’ हे किडनीसाठी उत्तम ‘रसायन’ मानले जाते. ही औषधे सूज न्यून करतात (Anti-inflammatory) आणि किडनीचे ‘फिल्ट्रेशन’ (शरिरातील रक्त साफ करण्याची प्रक्रिया) सुधारतात.

इ. रेटिनोपॅथी (Eye Protection)

इ १. लक्षण : दृष्टी न्यून होणे, डोळ्याच्या पडद्यावर परिणाम होणे.

इ २. आयुर्वेदाचा विचार : रक्तातील वाढलेली उष्णता (‘पित्त’ दोष) आणि ‘रक्त धातू’ची अशुद्धी.

इ ३. उपचार : येथे ‘चाक्षुष्य’ (डोळ्यांसाठी हितकारक) आणि ‘रक्तशोधक’ (रक्त शुद्ध करणारी) औषधे वापरली जातात. उदाहरणार्थ ‘त्रिफळा’ (विशेषतः आवळा) हे डोळ्यांसाठी सर्वश्रेष्ठ ‘रसायन’ आहे.

ई. कार्डिओपॅथी (Heart Protection)

ई १. लक्षण : रक्तवाहिन्या कठीण होणे, हृदयविकाराचा धोका.

ई २. आयुर्वेदाच्या दृष्टीने कारण : ‘रस’ आणि ‘रक्त’ धातूमध्ये ‘आम’ साठणे.

ई ३. उपचार : ‘स्रोतोशोधक’ (Body channels clean करणारे) आणि ‘हृद्य’ (हृदयाला बळ देणारे) औषधे दिली जातात. उदाहरणार्थ ‘अर्जुन’ हे हृदयाला बळकटी देण्यासाठी, तर कुटकी हे ‘कोलेस्ट्रॉल’ (रक्तातील चरबी) आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उत्तम कार्य करते.

याव्यतिरिक्त वरील प्रत्येक उपद्रवांमध्ये उपयुक्त असलेली रसौषधींचीही फौज आहेच. वरील उपद्रव उत्पन्न झाल्यावर उपचार घेणारे रुग्ण तर आमच्याकडे असतातच; मात्र जेव्हा मधुमेहावर उपचार घेण्यास रुग्ण येतो, तेव्हा प्रारंभीपासूनच हा पुढील घटनाक्रम घडू नये, याची काळजी घेऊन आम्ही औषधे देत असतो, हे आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे.

थोडक्यात आयुर्वेद मधुमेहाच्या रुग्णाची ‘केवळ रक्तातील साखर मोजणे’, याला एकमेव निकष मानत नाही. तो त्यासह मात्र त्याहीपलीकडे ‘धातू’ आणि ‘ओज’ यांचा विचार करतो. आयुर्वेदाची ‘रसायन’ चिकित्सा हाच तो मार्ग आहे, जो रक्तातील साखर नियंत्रणात ठेवत असतांनाच शरिराच्या प्रत्येक महत्त्वाच्या अवयवाचे पोषण करतो, त्यांची झीज थांबवतो आणि त्यांचे संरक्षण करतो. म्हणूनच मधुमेहाचे गंभीर उपद्रव टाळण्यासाठी आणि रुग्णाची ‘क्वालिटी ऑफ लाईफ’ (जीवनाचा दर्जा) टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदाची ही समग्र उपचारपद्धत अत्यंत मोलाची ठरते.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.

(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’, १४.११.२०२५)