|

आळंदी (देवाची), पुणे, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – सद्गुरु गंगागिरी महाराज यांनी २०० वर्षांपूर्वी चारही वर्णाच्या हिंदूंना एकत्र करण्याचे महान कार्य केले. आपणही आपापल्या प्रभावक्षेत्रात हे कार्य केले, तर धर्मांतर रोखणे शक्य होईल. ख्रिस्ती धर्मप्रसारक त्यांच्या धर्माच्या प्रचारासाठी कानाकोपर्यात फिरत आहेत. आपणही आदिवासी बांधवांपर्यंत पोचले पाहिजे. आपले प्रभावक्षेत्र असलेल्या भागात जाऊन हिंदु बांधवांना आधार दिला, तर आदिवासींचे धर्मांतर करण्याचे ख्रिस्त्यांचे षड्यंत्र आपण हाणून पाडू शकतो, असे मार्गदर्शन महंत गुरुवर्य प.पू. स्वामी रामगिरी महाराज यांनी केले. आळंदी येथे १९ वे वारकरी महाअधिवेशन पार पडले. या वेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
उपस्थित सर्व संत-महंत आणि धर्मप्रचारक यांनी प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर काय करणे अपेक्षित आहे ?, या विषयावर चर्चा केली, तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अधिवेशनाचा उद्देश
कार्तिक कृष्ण एकादशीच्या निमित्ताने सहस्रो वारकरी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करत अलंकापुरीत मोठ्या उत्साहाने येतात. माऊलींच्या ‘संजीवन समाधी’चे दर्शन घेण्याच्या ध्येयानेही जमतात. सर्वत्र भाव-भक्तीमय वातावरण असले, तरीही सद्यस्थितीत होणारे इंद्रायणी नदीचे प्रदूषण, तीर्थक्षेत्री असलेली मद्य-मांसाची दुकाने, अन्य धर्मियांनी हिंदूंच्या तीर्थक्षेत्री येऊन त्यांच्या धर्माचा प्रचार-प्रसार करणे अशा अनेक समस्या दिसत आहेत. यासंदर्भात जनजागृती करावी, तसेच या विरोधात शासनाने कडक कायदे करावेत, या मागणीसाठी हे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले.

‘वारी आळंदीची – राष्ट्र आणि धर्मरक्षणाची’ हे ब्रीदवाक्य ठेवून हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद, वारकरी संघटना आणि संप्रदाय अन् सद्गुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान श्री क्षेत्र गोदावरी धाम, बेट सरला यांच्या संयुक्त विद्यमाने वारकर्यांची श्रद्धास्थाने, देवता आणि संत यांच्यावर होणारे आघात अन् त्यांवरील उपाय यांविषयी १५ नोव्हेंबरला दुपारी १ ते ४ या वेळेत सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठ, माऊलींच्या भिंतीजवळ, वडगाव चौक, आळंदी (देवाची) येथे हे अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनाला १ सहस्राहून अधिक वारकरी आणि माऊली भक्त उपस्थित होते. अधिवेशनाचा प्रारंभ दीपप्रज्वलन करून करण्यात आला. ह.भ.प. महेंद्र मस्के महाराज यांनी अधिवेशनाचा उद्देश प्रास्ताविकातून सांगितला.
अधिवेशनात यांनी केले मार्गदर्शन !

अधिवेशनात ह.भ.प. मेटे महाराज, सुप्रसिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प. बाजीराव बांगर महाराज, ह.भ.प. संतोषानंद स्वामी, ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. मारुतीशास्त्री तुणतुणे महाराज, शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, ह.भ.प. लवीटकर महाराज, श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेट सरलाचे पिठाधीश ह.भ.प. राठी महाराज, महंत गुरुवर्य प.पू. स्वामी रामगिरी महाराज, पू. दंडिस्वामी अमृताश्रमानंद महाराज, हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवर

ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, चिंतामणी प्रासादिक दिंडी, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, ह.भ.प. संग्राम बापू भंडारे अधिवेशनाला उपस्थित होते.
वारकरी महाअधिवेशनातील संत आणि मान्यवर यांचे मार्गदर्शन !
शंकराचार्य, प्रवचनकार, कीर्तनकार यांनी अभ्यास करून अखंड कार्यरत रहावे ! – पू. दंडिस्वामी अमृताश्रमानंद महाराज

अध्यात्मविद्या, धर्मजागरण आणि बालपणापासून धर्मशिक्षण यांची आज अत्यंत आवश्यकता आहे. आज वेद आणि धर्म यांच्या विरोधात कार्य करणारे अनेक लोक आहेत; मात्र नास्तिक लोक जे बोलत आहेत, त्याचे खंडण करणे, त्याला तीव्र विरोध करणे आवश्यक आहे. तपोवन संस्था आणि सिद्धबेट (सध्या मद्य पिणे आणि मादक द्रव्ये सेवन करण्याचे झालेले ठिकाण) हे आळंदीमधील ज्वलंत प्रश्न आहेत. पवित्र नद्या प्रदूषित झाल्या आहेत. भामचंद्र डोंगराच्या संबंधी मधुसूदन महाराज कित्येक वर्षांपासून समस्या मांडत आहेत. याविषयी चर्चा होणे आवश्यक आहे. शंकराचार्य, प्रवचनकार, कीर्तनकार यांनी घटना आणि मसुदा यांचा अभ्यास करून खांद्याला खांदा लावून एकसंध होऊन अखंड कार्यरत रहायला हवे. निवडणूक आल्यावर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांना धर्माचार्य आपले वाटतात; मात्र निवडणूक झाल्यावर धर्माचार्य, वक्ते, कीर्तनकार यांच्यावर काही संकट आल्यास ‘हे आपले उत्तरदायित्व नाही’, असे समजून ते त्याकडे दुर्लक्ष करतात.
संतांनी सनातन धर्माला संघटित करण्याचा विचार समाजाला द्यावा ! – ह.भ.प. जनार्दन मेटे महाराज

शिक्षण आणि आरोग्य यांच्या माध्यमातून उघडपणे अहिंदु लोक हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. हे रोखण्यासाठी संघटित शक्ती दाखवायला हवी. यासाठी सर्वांनी नियमित सामूहिक प्रार्थनेच्या निमित्ताने एकत्रित येऊन हिंदूंचे संघटन होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. धर्माभिमान्यांनी गंगापूर तालुक्यातील अवैध पशूवधगृहे बंद केली, हे संघटितपणाच्या विजयाचे उदाहरण आहे.
गंगापूर तालुक्यातील सर्व संत प्रत्येक शुक्ल आणि कृष्ण एकादशीला गाव-खेड्यामध्ये जाऊन नगरप्रदक्षिणा घालतात, तसेच कुटुंब प्रबोधन, व्यसनमुक्ती, बालसंस्कार, मातृशक्तीचा जागर, गोसेवा इत्यादी विषयांवर मार्गदर्शनही करतात. अशा प्रकारे प्रत्येक संतांनी ५ गावे दत्तक घेऊन कार्य केल्यास सर्व सहज होईल. सर्व संतांनी एकत्रित येऊन सनातन धर्माला संघटित करण्याचा विचार समाजाला द्यायला हवा.
अन्य धर्मियांप्रमाणे हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता ! – ह.भ.प. मारुतीशास्त्री तुणतुणे महाराज

हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण नसल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अन्य धर्मियांना ज्याप्रमाणे बालपणापासून धर्मशिक्षण दिले जाते, त्याचप्रमाणे हिंदूंनाही धर्मशिक्षण द्यायला हवे. जो धर्माचे रक्षण करतो, त्याचेच धर्म रक्षण करतो. प.पू. निवृत्ती महाराज वक्तेबाबांनी देश आणि धर्म रक्षणासाठी या अधिवेशनाला प्रारंभ केला होता. तोच विचार पुढे नेण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.
सरकारने नद्यांच्या स्वच्छतेविषयी गांभीर्याने कार्यवाही करावी ! – ह.भ.प. राठी महाराज

सरकारने हरिद्वारच्या धर्तीवर मद्य-मांस मुक्त तीर्थक्षेत्र कायदा करावा. नद्यांच्या स्वच्छतेविषयी गांभीर्याने विचार करावा, तसेच पर्यटनाच्या नावाखाली तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य नष्ट होणार नाही, याची काळजी घ्यावी. सरकारने नद्यांच्या स्वच्छतेविषयी गांभीर्याने कार्यवाही करावी !
सरकारने ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायदा करावा ! – कु. क्रांती पेटकर

आज महिला उच्चशिक्षित आहेत; पण २-३ वर्षांच्या मुलीपासून ते ७० वर्षांच्या वृद्धेपर्यंत आज कुणीही महिला सुरक्षित नाही. हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लव्ह जिहाद करणार्या धर्मांधांपासून हिंदु मुली आणि महिला यांचे रक्षण केले पाहिजे. यासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायदा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात संमत व्हावा (या वेळी उपस्थित महिलांनी या मागणीला दोन्ही हात उंचावून पाठिंबा दिला.)
आंध्रप्रदेशाप्रमाणे तीर्थक्षेत्र परिसरात मद्य-मांस विक्री बंदीचा कायदा महाराष्ट्रात कधी होणार ? – ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर

आंध्र प्रदेशातील श्री बालाजी मंदिराच्या १० किलोमीटर परिसरात मद्य-मांस विक्रीला बंदी आहे. अशी बंदी महाराष्ट्रात कधी लागू होणार ? महाराष्ट्र ही ‘साधू-संतांची भूमी’ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मद्य-मांस विक्रीला बंदी करावी. हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अन्य धर्मियांना प्रचार-प्रसार करण्यास सरकारने तात्काळ बंदी घालावी.
तरुणींनी ‘बुरखेवाली’ नव्हे, तर ‘सरस्वती’, ‘दुर्गा’, ‘काली’ व्हावे ! – ह.भ.प. संतोषानंद महाराज

लव्ह जिहादविषयी जनजागृती आजच्या काळाची आवश्यकता असून वेळप्रसंगी तरुणींनी ‘सरस्वती’, ‘दुर्गा’, ‘काली’ व्हावे; पण चुकूनही ‘बुरखेवाली’ होऊ नये. आज समाजामध्ये जे काही थोडे तरुण समाजहिताचे कार्य करत आहेत, अशांना मानसिक आधार देण्याचे कार्य सर्वांनी करावे. त्यामुळे त्यांच्या कार्याला बळ मिळेल. हिंदु मुलींचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे.
सरकारकडे मागण्यांचा पाठपुरावा करीन ! – ह.भ.प. अक्षय महाराज भोसले

तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करणे, इंद्रायणी नदीचे जलशुद्धीकरण करणे या मागण्या सरकारकडे मी लावून धरीन आणि त्या संदर्भात चर्चा घडवून आणीन.
मंदिरांच्या सुरक्षेसाठी योग्य व्यवस्था उभारायला हवी ! – ह.भ.प. बाजीराव बांगर महाराज, शिवव्याख्याते

समाजामध्ये आपण मोठ्या उत्साहाने मंदिरे उभारतो. त्यावर सोन्याचे कळस बसवतो. देवतांना हिर्या-मोत्याचे दागिने घालतो; मात्र मंदिरांच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे कोणते प्रावधान आहे, याचा विचार होण्याची आवश्यकता आहे. सर्व गावांमधून मंदिरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था उभारली गेली पाहिजे.
हिंदु मुली लव्ह जिहादच्या आहारी जाऊ नयेत; म्हणून त्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. हलाल प्रमाणित उत्पादने घरात न आणण्याची शपथ प्रत्येकाने घ्यायला हवी. कोणतीही वस्तू खरेदी करतांना ती हिंदु विक्रेत्यांकडूनच घ्यावी. अहिंदूंकडून नको. अशा साध्या आणि सोप्या गोष्टींचे आचरण केल्यासच राष्ट्र अन् धर्म जगेल.
श्री. सुनील घनवट यांनी केलेले आवाहन !![]() प्रत्येक कीर्तनकाराने कीर्तनातून किमान १० मिनिटे तरी देव आणि देश रक्षणासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. देवतांचा अपप्रचार करून वारीमध्ये बुद्धीभेद घडवून आणणार्यांच्या संदर्भात सरकारने ठोस पावले उचलावीत. देव आणि धर्म न मानणारी ‘जादूटोणाविरोधी’ कायद्याच्या जनजागृतीसाठी अन् प्रचार-प्रसार समिती बरखास्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. |
आता आंदोलने नाहीत, तर सरकारसमवेत एकत्रित चर्चा करण्याची वेळ ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
आतापर्यंत आपण आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा दिला आणि आंदोलने केली. आता हिंदुत्वनिष्ठ विचारांचे सरकार असल्याने सरकारसमवेत एकत्रित चर्चा करून समस्या सोडवण्याची वेळ आली आहे. आश्वासनांच्या प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनकाळात सरकारसमवेत चर्चा करण्याच्या दृष्टीने येथे उपस्थित असलेल्या सर्व संत-महंतांनी नागपूरला यावे.
क्षणचित्रे
१. अधिवेशनस्थळी धर्मशिक्षणाचे फ्लेक्स प्रदर्शन मांडण्यात आले होते. याचा लाभ जिज्ञासूंनी घेतला.
२. उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे घोषणा देऊन ठरावांना अनुमोदन दिले.
अधिवेशनात मांडण्यात आलेले ठराव !
१. सर्व मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करावीत.
२. गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी.
३. लव्ह जिहाद विरोधी कायदा, तसेच धर्मांतरबंदी कायदा लागू करावा.
४. संतांच्या वाङ्मयाचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्यांना कायमचा प्रतिबंध करावा.
५. निष्पाप हिंदुत्वनिष्ठांवरील खोटे आरोप रहित करून त्यांची मुक्तता करावी. हिंदुत्वनिष्ठांवर खोटे गुन्हे नोंदवून त्यांचा छळ करणार्या हिंदुद्वेषी अधिकार्यांवर तात्काळ कारवाई करावी.
६. भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करून भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे.
७.संत, संत-वाड्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणार्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ‘ईशनिंदा प्रतिबंधक कायदा’ लागू करावा.
८. देहू, आळंदी, मुक्ताईनगर, पैठण, पंढरपूर इत्यादी तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य – मांस विक्रीपासून मुक्त करावीत.
९. सर्वच तीर्थक्षेत्रांच्या आजूबाजूच्या १० कि.मी.परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर बंदी आणावी.
१०. इंद्रायणी नदी आणि चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करावी.

Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक