Maharaja Jadeja : वर्ष १९४२ मध्ये पोलंडमधील ज्यू मुलांचे प्राण वाचवणार्‍या गुजरातच्या महाराजा जडेजा यांचा इस्रायलकडून सन्मान !

इस्रायलमध्ये महाराजा जाम साहेब दिग्विजय सिंह जडेजा यांच्या पुतळ्याचे अनावरण !

महाराजा जाम साहेब दिग्विजय सिंह जडेजा यहूदी-पोलिश मुलांसोबत (डावीकडे) महाराजा जडेजा यांच्या पुतळ्याचे अनावरण (उजवीकडे)

नेवातिम (इस्रायल) – दक्षिण इस्रायलमधील नेवातिम येथे अलीकडेच गुजरातमधील नवानगरचे (जामनगरचे) माजी महाराजा जाम साहेब दिग्विजय सिंह जडेजा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात पोलंडमधील शेकडो मुलांना विशेषत:  अनेक ज्यू  बालकांना दिलेल्या आश्रयाच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याखाली लिहिले आहे की, त्यांनी स्वत: खर्च करून अनेक ज्यू  बालकांचे प्राण वाचवले आणि त्यांना स्वतःच्या घरात आश्रय दिला, तसेच त्यांना प्रेम दिले. हा कार्यक्रम ‘भारतीय यहुदी वारसा केंद्र’ आणि ‘कोची ज्यू  वारसा केंद्र’ यांनी आयोजित केला होता.

१. महाराजा जडेजा हे जामनगरचे शेवटचे शासक होते. त्यांनी केवळ त्यांच्या राज्याचा विचार न करता सहस्रो किलोमीटर दूरच्या पोलंडमधील नागरिकांसाठीही मानवतेने हात पुढे केला. दुसर्‍या महायुद्धात त्यांनी तेथील मुलांना भारतात आधार दिला होता.

२. वर्ष १९३९ मध्ये सोव्हिएत संघ आणि जर्मनी यांनी संयुक्तपणे पोलंडवर आक्रमण केले होते. पोलंड सरकार कोसळल्यानंतर तेथील सहस्रो नागरिक आणि मुले यांना सोव्हिएत संघात पाठवले गेले. तेथील छावण्यांत ते उपासमारी आणि आजार यांनी त्रस्त झाले होते.

३. त्या वेळी महाराजा जडेजा हे ब्रिटीश युद्धमंत्रीमंडळात हिंदु प्रतिनिधी होते. पोलिश मुलांची अवस्था कळताच त्यांनी तात्काळ त्यांना भारतात आणण्याचा निर्णय घेतला. वर्ष १९४२ मध्ये पोलिश मुलांचा पहिला ताफा जामनगरला पोचला. महाराजा जडेजा हे स्वतः त्यांच्या स्वागतासाठी गेले होते. तेथे ते मुलांना म्हणाले, ‘‘आता तुम्ही अनाथ नाही. मी तुमचा पिता आहे आणि नवानगर तुमचे घर आहे.’’ महाराजांनी त्यांच्या रहाण्याची, अन्नाची आणि शिक्षणाची व्यवस्था केली होती.

४. महाराजा जडेजा यांनी धर्म आणि मानवता यांचे पालन करत निःस्वार्थपणे कार्य केले. पोलंडमध्ये त्यांना ‘चांगला महाराजा’ म्हणून ओळखले जाते. वॉर्सा येथे महाराजांचे स्मारक उभारून त्यांचा सन्मान केला आहे. वारसॉमध्ये त्यांच्या नावाची एक शाळा आणि ‘महाराजा स्क्वेअर’ नावाचा चौक आहे. वर्ष २०२२ मध्ये त्यांच्या नावाची एक रेल्वेगाडीही चालू करण्यात आली आहे. वर्ष २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंड भेटीच्या वेळी या स्मारकाला अभिवादन केले होते.