आज सर्वत्र भेडसावणारी समस्या म्हणजे प्रदूषणाची समस्या ! प्रत्येक प्रसारमाध्यम, टीव्ही चॅनेल, विविध ठिकाणी चालणारी चर्चासत्रे इत्यादी ठिकाणी प्रदूषण या विषयावर आक्रंदन चालू असते. यात मग कधी वायूप्रदूषण, तर कधी ध्वनीप्रदूषण हा विषय असतो. प्रतिवर्षी विविध संस्थांचे शोधनिबंध, अहवाल सादर होत असतात. त्यात उपाययोजनाही दिलेल्या असतात. जोपर्यंत विषय ताजा आहे, तोपर्यंत फार मोठी समस्या आपल्यासमोर निर्माण झालेली आहे, अशा पद्धतीने आपण गंभीर होतो. कालांतराने नवीन विषय समोर आल्यावर त्यात गुरफटतो. अशा पद्धतीने प्रक्रिया होत असल्याने खरोखरच आपण प्रदूषणाच्या समस्येविषयी गंभीर आहोत का ? असा प्रश्न निर्माण होतो. याचा आपण सर्वांनी आज अंतर्मुख राहून विचार केला नाही, तर उद्या आपल्याला पश्चात्ताप करायलाही वेळ उरणार नाही. यास्तव हा लेखप्रपंच !
९ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘केवळ मोठ्या प्रमाणात होणार्या प्रदूषणाचा विचार करून उपयोग नाही, प्रदूषणाची सर्वसाधारण कारणे, तसेच क्षणिक सुखासाठी विविध वस्तूंचा वापर करून करत असलेले प्रदूषण’ यांतील ‘शीतकपाट (फ्रिज) आणि वातानुकूलित यंत्र (एसी) यांचा मोठ्या प्रमाणात वापर अन् ‘वापरा आणि फेका’ वस्तूंचा अतीवापर’ यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/975074.html

३. क्षणिक सुखासाठी विविध वस्तूंचा वापर करून होत असलेले प्रदूषण !
इ. शीतपेयांचे (कोल्ड्रींकचे) सेवन : आज शीतपेय सेवनाची टूमही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शीतपेयाच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी भूगर्भातून उपसले जाते, त्यामुळे पाण्याच्या पातळीत घट होते. या कारखान्यांमधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी बाहेर पडते, जे नद्या, तलाव आणि भूजल दूषित करते. उपकरणांच्या स्वच्छतेसाठी विविध रसायने वापरली जातात. या रसायनांचे अवशेष सांडपाण्यातून बाहेर पडतात. काही अभ्यासानुसार शीतपेयांच्या कारखान्यांच्या आसपासच्या मातीत आणि पाण्यात क्रोमियम, कॅडमियम अन् शिसे यांसारख्या जड धातूंचे उच्च प्रमाण आढळले आहे. हे जड धातू मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत हानीकारक असतात. शीतपेयांच्या बहुतांश बाटल्या प्लास्टिकच्या बनलेल्या असतात. प्लास्टिकच्या निर्मितीमुळे आणि विल्हेवाटीमुळे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते. प्लास्टिक कचरा भूमी आणि समुद्रात प्रदूषण करतो, सागरी जिवांना हानी पोचवतो आणि सूक्ष्म प्लास्टिकच्या स्वरूपात अन्नसाखळीत प्रवेश करतो. शीतपेयांचे उत्पादन, पॅकेजिंग, वाहतूक आणि शीतगृहात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. यामुळे हवामानात पालट होतात. शीतपेयात वापरले जाणारे कृत्रिम रंग, सुगंध किंवा संरक्षक रसायने यांमुळे होणारे प्रदूषणाचे काय सांगावे ! शीतपेय पितांना आपण याचा विचार करतो का ? त्यामुळे होणारी स्वतःच्या शरिराची हानी सोडा; पण आपण समाजाची किती हानी करत आहोत, हा विचार तरी मनात यावा कि नको ? आणि मूलभूत प्रश्न, म्हणजे शीतपेय ही आपली आवश्यकता आहे का ?

ई. बाजारात जातांना कापडी पिशवी न नेता दुकानदाराकडून मिळणार्या प्लास्टिकच्या पिशवीचा वापर ! : पूर्वी बाजारात जातांना लोक कापडी पिशवी समवेत नेत असत. दूध आणायला जातांना स्टीलचे भांडे किंवा किटली नेत. आता मात्र प्रत्येक कुटुंब बाजारात जातांना रिकाम्या हाताने जाऊन येतांना भरगच्च प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन येतात. हे करत असतांना आपण त्या प्लास्टिकची विल्हेवाट कशी लागणार ?, त्याचे पर्यावरणीय दुष्परिणाम काय होतील ? या गोष्टींचा विचार करतो का ?
उ. आपण घरातील कचर्याची योग्य विल्हेवाट लावतो कि कचर्याची प्लास्टिक पिशवी रस्त्याच्या कडेला फेकतो ? : आज छोट्या गावातच नव्हे, मोठ्या शहरांमध्ये कचरा विल्हेवाटीची समस्या भीषण झाली आहे. कधीतरी बाहेर फिरत असतांना आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा कचर्याच्या, खरकटे, शिळे अन्न असलेल्या पिशव्या पडलेल्या आढळतात. या पिशव्या काय आपसूक रस्त्यावर येतात ? आपणच टाकतो ना ? या पिशव्या रस्त्यावर फेकतांना त्यातून आपण पर्यावरणाची, मुक्या जनावरांची, अन्य समाज घटकांची अशी किती मोठी हानी करत असतो, याचा विचार आपण करतो का ? गुटखा, पान खाऊन रस्त्यावर थुंकणारे लोक त्यातून किती रोगजंतू आपण वातावरणात पसरवत आहोत, याचा विचार करतात का ?
पर्यावरणावर होणारे प्रदूषणाचे दुष्परिणाम न्यून करण्यासाठी उपाय !

अ. घरातील विद्युत् उपकरणांचे नियमितपणे ‘सर्व्हिसिंग’ (देखभाल दुरुस्ती) करा, ज्यामुळे वायूंची गळती टाळता येईल.
आ. जुनी उपकरणे टाकून देतांना त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा किंवा ‘रिसायकल’ करा, जेणेकरून त्यातील ‘रेफ्रिजरंट’ वायू वातावरणात मिसळणार नाहीत.
इ. शीतकपाटे आणि वातानुकूलित यंत्र हे आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले असले, तरी त्यांच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात. हे लक्षात घेऊन त्यांचा वापर जपून, काटकसरीने आणि दायित्वाने करा.
ई. शीतपेय पिण्यापेक्षा ताक, दूध, फळांचा रस इत्यादी पेय प्या.
उ. बाजारात जातांना कापडी पिशव्या समवेत नेऊन त्यात धान्य, भाज्या इत्यादी आणा.
ऊ. दूध आणण्यासाठी स्टीलच्या किटलीचा वापर करा.
ए. शरिराला थोडे कष्ट होतील; परंतु यथासंभव ‘वापरा आणि फेका’ या वस्तूंचा वापर टाळून घरी धातूची भांडी वापरून ती नियमित स्वच्छ करा.
ऐ. घरातील ओला आणि सुका कचरा यांची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावा. कचरा नियोजनाविषयी प्रशासकीय अनास्था असेल, तर ते नियोजन नीट होण्यासाठी शासन दरबारी आग्रह करा.
ओ. ओल्या कचर्यापासून घरच्या घरी खतनिर्मिती करता येते. शक्य असल्यास हा प्रयोग करा.
औ. यथासंभव सरसकट वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घ्या. जवळ वाहतूक करण्यासाठी सायकलचा वापर करा किंवा चालत जा.
अं. घरी शेती करत असल्यास रासायनिक खतांचा अतीवापर टाळा.
क. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी अत्यावश्यक असल्यासच करा.
ख. आपल्या घराच्या जवळ तुळस, बेल, दुर्वा, कडुलिंब, पिंपळ, वटवृक्ष, औदुंबर इत्यादींची लागवड करा.
ग. आपल्या उच्छ्वासातून बाहेर पडणार्या दूषित वायूंमुळे होणारे प्रदूषण न्यून होण्यासाठी नियमित अग्निहोत्र करा.
घ. वैचारिक प्रदूषण दूर होण्यासाठी दिवसभर श्लोक, मंत्रपठण, नामजप करणे इत्यादी उपासना करा.
वरील कृती केल्याने आपण आपल्या स्तरावर काही प्रमाणात का होईना, प्रदूषणावर निश्चित मात करू शकू. प्रदूषणाला कारणीभूत याहून अधिक काही कृती आपल्याला स्वतःलाही लक्षात येतील, त्या थांबवण्यासाठी त्वरित कृती करा आणि इतरांनाही सांगा. आपल्या कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे आणि धर्माचे हित आपल्याच हातात आहे. ते साधणे, हे आपले परमकर्तव्य आहे. चला, तर आजपासून आपण आपल्या स्तरावर प्रदूषण न्यून करण्यासाठी प्रयत्नरत राहूया !’
– श्री. योगेश जलतारे
ऊ. विचारांच्या माध्यमातून आपण पसरवत असलेले प्रदूषण आपल्याला लक्षात तरी येते का ? :
आपण प्रदूषणवाढ करत असल्याची वर वानगीदाखल दिलेली काही दृश्य उदाहरणे आहेत. यापेक्षाही प्रदूषण आपण आपल्या विचारांच्या माध्यमातून पसरवत असतो. आपण जेव्हा नकारात्मक विचार करतो किंवा इतरांशी तसे बोलतो, त्या माध्यमातून समाजात नकारात्मक विचार पसरून वातावरण कलुषित होते. काही धर्मद्रोही लोक धर्माच्या विरुद्ध विष ओकून समाजमन दूषित करतात. काही राष्ट्रद्रोही राष्ट्राचा घात करणारे विचार पसरवतात. कळत-नकळत आपण त्यात सहभागी होतो किंवा त्यांच्या विचारांचे मूकसंमतीदार होतो. यामुळे सूक्ष्म स्तरावर वातावरण प्रदूषित होते.
(समाप्त)
– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसिद्धीमाध्यम. (५.११.२०२५)
| संपादकीय भूमिका : नियमितच्या गंभीर प्रदूषणाविषयी मूकसंमती दर्शवणारे पुरो(अधो)गामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी श्री गणेशमूर्ती विर्सजनाच्या वेळी ‘कोल्हेकुई’ करतात ! |
आक्रमणाचा परिणाम भारत-अमेरिका संबंधांवरही होऊ शकतो !
जेवढे रुपये कमवण्यासाठी आर्यभट्ट यांचा अवमान केला, तेवढे भारत सरकारने दंड म्हणून वसूल करावेत !
आज सोमवती अमावास्या !
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !
समाजासाठी साधूसंतांचे योगदान आणि त्यांच्यावरील आघात !