आज सर्वत्र भेडसावणारी समस्या म्हणजे प्रदूषणाची समस्या ! प्रत्येक प्रसारमाध्यम, टीव्ही चॅनेल, विविध ठिकाणी चालणारी चर्चासत्रे इत्यादी ठिकाणी प्रदूषण या विषयावर आक्रंदन चालू असते. यात मग कधी हवेचे प्रदूषण, तर कधी ध्वनीप्रदूषण हा विषय असतो. प्रतिवर्षी विविध संस्थांचे शोधनिबंध, अहवाल सादर होत असतात. त्यात उपाययोजनाही दिलेल्या असतात. जोपर्यंत विषय ताजा आहे, तोपर्यंत फार मोठी समस्या आपल्यासमोर निर्माण झालेली आहे, अशा पद्धतीने आपण गंभीर होतो. कालांतराने नवीन विषय समोर आल्यावर त्यात गुरफटतो. अशा पद्धतीने प्रक्रिया होत असल्याने खरोखरच आपण प्रदूषणाच्या समस्येविषयी गंभीर आहोत का ? असा प्रश्न निर्माण होतो. याचा आपण सर्वांनी आज अंतर्मुख राहून विचार केला नाही, तर उद्या आपल्याला पश्चात्ताप करायलाही वेळ मिळणार नाही. यास्तव हा लेखप्रपंच !

१. केवळ मोठ्या प्रमाणात होणार्या प्रदूषणाचा विचार करून उपयोग नाही !
सर्वसाधारणतः प्रदूषण हा विषय चर्चेला येतो, तेव्हा मोठमोठी रासायनिक आस्थापने, मोठ्या शहरांतील सांडपाणी व्यवस्था, वाढत्या लोकसंख्येमुळे वाढलेल्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण, काही प्रमाणात डॉल्बी ध्वनीवर्धक यंत्रणा यांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण अशा वरच्या स्तरावर चर्चा होते. नंतर ‘त्यावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था, रोजगार, दैनंदिन गरजा, सुखसुविधा इत्यादी सकारात्मक गोष्टी समोर येऊन प्रदूषण होते; परंतु हा सकारात्मक भागही आहे, अशा विचारप्रक्रियेतून इतके तर चालायचेच’, असे आपण स्वतःचेच समाधान करून शांत बसतो. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाला आपण कसे कारणीभूत ठरत आहोत ? या अंतर्मुखतेच्या विचारापर्यंत आपण पोचतच नाही. त्यामुळे ‘मोठ्या आस्थापनांकडून होणारे प्रदूषण, सरकारी निष्क्रीयता म्हणा किंवा उदासीनता’, याचा विचार सोडा. आज आवश्यकता आहे, ती आपण स्वतः कसे प्रदूषण करतो, याचा विचार करण्याची.
२. प्रदूषणाची माहिती असलेली सर्वसाधारण कारणे

एका अहवालानुसार उच्छ्वासाद्वारे एक माणूस प्रतिदिन साधारणपणे १ किलो कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. या व्यतिरिक्त प्रदूषणाची अनेक कारणे आहेत, ज्याला सरळसरळ आपणच उत्तरदायी आहोत. भलेही कळत न कळत म्हणा, नाईलाजाने म्हणा किंवा आवश्यकता म्हणा ! हवा प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण, ही याची काही ढोबळ उदाहरणे.
अ. कारखाने आणि अन्य रासायनिक उद्योग यांमुळे होणारे प्रदूषण : कारखाने आणि उद्योग यांमधून बाहेर पडणारे धूर, विषारी वायू, रासायनिक कण, औद्योगिक सांडपाणी हे हवा, पाणी अन् माती प्रदूषित करतात. बर्याच आस्थापनांकडून औद्योगिक कचरा आणि टाकाऊ पदार्थांवर योग्य प्रक्रिया न करता ते नदी, तलाव किंवा भूमीवर टाकले जातात. त्यामुळेही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.
आ. वाढत्या लोकसंख्येमुळे होणारे प्रदूषण : वाढत्या लोकसंख्येमुळे घरगुती कचरा, सांडपाणी आणि इतर टाकाऊ पदार्थांचे प्रमाण वाढते, ज्यांची योग्य विल्हेवाट न लावल्यास प्रदूषण होते. शहरांमध्ये सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नद्यांमध्ये किंवा समुद्रात सोडले जाते, ज्यामुळे जल प्रदूषण वाढते. वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची आवश्यकता वाढली, शहरांत जागा न्यून पडू लागल्याने समाज गावाकडे वळला. यातून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू झाली. शेतभूमी प्लॉटमध्ये रूपांतरित करून तेथे मोठ्या इमारती उभारल्या जाऊ लागल्या. बांधकाम आणि खोदकाम यांमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे कण हवेत मिसळून हवा प्रदूषित झाली. बांधकामासाठी जंगलतोड वाढली. वास्तवतः झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन बाहेर टाकतात; परंतु जंगलतोड झाल्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले. झाडे न्यून झाल्यामुळे भूमीची धूप होऊन मातीची गुणवत्ता खालावली. जग तापमानवाढीच्या झळा सोसू लागले.
इ. वाहनांमुळे होणारे प्रदूषण : मोटारी, बसेस, ट्रक आणि अन्य वाहनांमधून निघणार्या धुरामुळे निर्माण होणारे वायूप्रदूषण भयावह आहे, जे आपण प्रतिदिन अनुभवतो. वाहनांचे आवाज, हॉर्न, रेल्वे आणि विमान आदींचा आवाज ध्वनीप्रदूषण करतो.
ई. शेतांमध्ये रासायनिक खतांचा वापर : शेतीत रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा अतीवापर केल्याने भूमीची सुपीकता न्यून होते अन् ही रसायने पावसाच्या पाण्यासह नदी, तलावांमध्ये मिसळून जल प्रदूषण करतात. पिकांचे अवशेष किंवा शेतीतील कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात धूर आणि सूक्ष्म कण हवेत मिसळतात.
उ. ऊर्जा निर्मिती करणार्या प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण : औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळसा, पेट्रोल, डिझेल यांसारख्या जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साइड आणि अन्य विषारी वायू बाहेर पडतात. त्यामुळे हवा प्रदूषित होते. भारतासारख्या अनेक देशांमध्ये विजेची निर्मिती अजूनही कोळसा, तेल किंवा नैसर्गिक वायू सारख्या जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातून होते. या इंधनांच्या ज्वलनामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि अन्य प्रदूषणकारी वायू वातावरणात सोडले जातात. त्यामुळे हवा प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ होते.
ऊ. प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक कचरा यांमुळे होणारे प्रदूषण : प्लास्टिकसह जुन्या खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, भ्रमणभाष संच, संगणक इत्यादी कचर्यात टाकल्या जातात. या ई-कचर्यात शिसे, पारा यांसारखे विषारी घटक असतात, जे माती आणि पाणी दूषित करतात.
या सर्व मानवनिर्मित कारणांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे आणि मानवी आरोग्यावर, तसेच जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होत आहेत. हे सर्व आपण समजून आहोत; परंतु या गोष्टींमुळे होणारे प्रदूषण हे आपल्याला काळाची आवश्यकता म्हणून स्वीकारार्ह वाटते किंवा ‘याला इलाज नाही’, असाही विचार मनात येऊन जातो. त्यामुळे हा विषय काळजीचा आणि आपल्या सहभागाचा असला, तरी तूर्तास बाजूला ठेवूया. आज मी आपल्याला आपण स्वतः थेट प्रदूषण कसे करतो, याचे स्मरण करून देतो. किमान हे प्रदूषण न्यून करण्यासाठी तरी आपण थोडी काळजी घेतली, तर प्रदूषण वाढवण्याच्या मोठ्या पापाचे काही प्रमाणात तरी क्षालन होऊ शकेल.
३. क्षणिक सुखासाठी विविध वस्तूंच्या वापरातून करत असलेले प्रदूषण !
अ. शीतकपाट (फ्रिज) आणि वातानुकूलित यंत्र (एसी) यांचा मोठ्या प्रमाणात वापर ! : पूर्वीच्या काळात ‘फ्रिज’ आणि ‘एसी’ यांमध्ये ‘CFCs’ आणि ‘HCFCs’ यांसारख्या वायूंचा वापर केला जात होता. हे वायू वातावरणातील ओझोन थराला हानी पोचवत. या वायूंच्या उत्सर्जनामुळे ओझोन थराला ‘छिद्र’ पडून त्वचेचा कर्करोग, डोळ्यांचे विकार आणि वनस्पतींवर नकारात्मक परिणाम अधिक होत होते. कालांतराने या वायूंचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आला आणि त्या जागी आता ‘CFCs’ आणि ‘HFCs’ यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे ओझोन थराला हानी पोचवत नाहीत; परंतु ते अत्यंत शक्तीशाली हरितगृह वायू आहेत. ते कार्बन डायऑक्साईडपेक्षा कितीतरी पटींनी अधिक उष्णता वातावरणात अडकवून ठेवतात. यामुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामान पालटाची समस्या अधिक गंभीर झाली आहे.
‘फ्रिज’ किंवा ‘एसी’ यांच्यामध्ये वापरले जाणारे ‘रेफ्रिजरंट’ वायू उपकरण जुने झाल्याने किंवा देखभालीच्या अभावामुळे गळतीमुळे वातावरणात मिसळतात. ‘एसी’ वापरल्याने खोली थंड होते; पण त्यामधून बाहेर पडणारी गरम हवा परिसरातील तापमान वाढवते. यामुळे शहरी भागात ‘अर्बन हिट आयलंड’ प्रभाव दिसून येतो. त्यामुळे शहरांचे तापमान आजूबाजूच्या ग्रामीण भागांपेक्षा अधिक असते.
आ. ‘वापरा आणि फेका’ वस्तूंचा अतीवापर ! : पूर्वी लग्नकार्ये आदी समारंभात भाडे केंद्रांतून भांडी इत्यादी साहित्य आणून ते वापरून पुन्हा घासून जमा करण्याची पद्धत होती. कालौघात आता ‘वापरा आणि फेका’ अशा वस्तूंचा वापर होत आहे. आता हा वापर केवळ लग्नकार्यात नाही, तर प्रतिदिनच्या जीवनातही सरसकट चालू झाला आहे. बाहेरून मागवलेले जेवण पॅक करण्यासाठीही सिल्व्हर फॉईल (चंदेरी कागद असलेले) साहित्य वापरले जाते. हे वापरत असतांना त्यातून किती प्रदूषण वाढत आहे, याचा विचार आपल्या मनाला शिवतो का ? (५.११.२०२५)
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसिद्धीमाध्यम.
| संपादकीय भूमिका : कुठे सहस्रो वर्षे पृथ्वी प्रदूषणमुक्त ठेवणारी भारतीय संस्कृती आणि कुठे १०० वर्षांत प्रदूषण वाढवून उपाययोजना न देणारे आधुनिक विज्ञान ! |
पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/977230.html
आक्रमणाचा परिणाम भारत-अमेरिका संबंधांवरही होऊ शकतो !
जेवढे रुपये कमवण्यासाठी आर्यभट्ट यांचा अवमान केला, तेवढे भारत सरकारने दंड म्हणून वसूल करावेत !
आज सोमवती अमावास्या !
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !
समाजासाठी साधूसंतांचे योगदान आणि त्यांच्यावरील आघात !